महाराष्ट्राच्या विकासासाठी विरोधकांनी सहकार्य करावं! शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी बावनकुळेंचं आवाहन

    05-Dec-2024
Total Views |
 
Bawankule
 
मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी विरोधकांनीसुद्धा सहकार्य करावे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांना राज्य सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी गुरुवार, ५ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधला.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य करण्याची क्षमता असणारे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज शपथ घेत आहेत. विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला दिलेला जाहीरनामा यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत."
 
हे वाचलंत का? -  शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतले बाप्पाचे दर्शन!
 
किती मंत्री शपथ घेणार?
 
यावेळी बावनकुळेंना मंत्र्यांच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "किती मंत्री शपथ घेणार? कोण शपथ घेणार? ही सगळी यादी राज्यपालांकडे जाते. पण आतापर्यंत तरी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे दिसत आहे. वरीष्ठ नेत्यांनी अजून काही निर्णय घेतल्यास त्याची वाट बघू. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी आज शपथ घेतली तरी सरकार बनते. शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहेत. तिन्ही पक्ष आणि केंद्रीय नेते बसून एक चांगले सरकार बनणार आहे. विभागीय समतोल, सामाजिक विकास आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी आमचे सरकार काम करणार आहे."
 
"सरकारने शपथविधीसाठी सर्वांनाच निमंत्रण दिले आहे. देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोलले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी विरोधकांनीसुद्धा सहकार्य करावे. उद्धवजी, शरद पवार साहेब, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे, नाना पटोले या सर्वांनी शपथविधीसाठी उपस्थित राहावे, अशी माझी विनंती आहे. हा कुठल्याही पक्षाचा नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे," असेही ते म्हणाले.