सीरियामध्ये बशर अल असद यांची राजवट वाचवण्यासाठी इराण आणि रशिया कोणत्याही थराला जातील. दुसरीकडे ‘हयात अल तहरीर’ला यश मिळावे, म्हणून तुर्की प्रयत्नशील असून यात पाश्चिमात्य देशही मदत करु शकतात. गेल्या १४ वर्षांच्या यादवी युद्धामध्ये सीरिया होरपळला असला, तरी बशर अल असद स्वतःची खुर्ची सोडण्याची शक्यता तशी कमीच.
सीरियामध्ये ‘हयात अल तहरीर’ या दहशतवादी संघटनेने अवघ्या चार दिवसांत अलेप्पोवर विजय मिळवून सगळ्या जगाला धक्का दिला. अलेप्पो हे सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. इस्रायल आणि ‘हिजबुल्ला’ यांच्यामध्ये युद्धविराम झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात ही घटना झाली आहे. सीरियाच्या सैन्याने प्रतिकार केल्याशिवाय माघार घेतल्याने सीरियावर तसेच सीरियाला मदत करणार्या रशियावर टीकेची झोड उठली. या नामुष्कीदायक माघारीला जबाबदार असलेल्यांची खरडपट्टी काढल्यानंतर आता रशिया आणि सीरियाने गेलेला प्रदेश परत मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये गेल्या १४ महिन्यांपासून चाललेले युद्ध प्रादेशिक स्तरावर पसरणार का, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. ‘हयात अल तहरीर’ ही संघटना २०१२ साली स्थापन झालेल्या ‘जबहाट अल नुसरा’ या संघटनेचे नवीन रुप आहे. ‘जबहाट अल नुसरा’ने ‘अल’ कायदाला समर्थन दिले होते.
२०११ साली सुरु झालेल्या यादवी युद्धामध्ये सीरिया पूर्णपणे होरपळून गेला. या युद्धात आजवर पाच लाखांहून अधिक लोक मारले गेले आहेत. देशाच्या २.१ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे १.२ कोटी लोक विस्थापित झाले आहेत. त्यातील सुमारे ५० लाख लोक इतर देशांमध्ये शरणार्थी म्हणून गेले आहेत. रशिया आणि इराणच्या मदतीने बशर अल असद यांनी आपली सत्ता टिकवली. सीरियाच्या ईशान्येकडील एक तृतीयांश भागामध्ये कुर्दिश लोकांनी स्वतःचे स्वायत्त राज्य प्रस्थापित केले असून, तिथे असद यांची सत्ता चालत नाही. पण, यादवी युद्धाच्या मध्याला केवळ राजधानी दमास्कस आणि परिसरावर प्रभुत्व असणार्या असद यांच्या राजवटीने कालांतराने देशाच्या दोन तृतीयांश भागावर ताबा मिळवला. २०२० सालापासून रशिया आणि तुर्कीच्या प्रयत्नांतून युद्धविराम झाला असून, ‘हयात अल तहरीर’ या संघटनेच्या ताब्यात वायव्येकडील छोटासा प्रदेश होता.
सीरियामध्ये गेली अनेक दशके बाथ पक्षाची सत्ता आहे. १९७१ ते २००० हाफेझ अल असाद सीरियाचे अध्यक्ष होते, तर त्यानंतर आजपर्यंत त्यांचा मुलगा बशर अल असद अध्यक्ष आहे. सुन्नी बहुसंख्य असलेल्या सीरियामध्ये सत्ताधारी असद कुटुंबीय ‘अलावी’ या पंथाचे असून राजकीयदृष्ट्या ते शियापंथीय इराणच्या जवळचे आहेत. प्रचंड दडपशाही करुन, प्रसंगी आपल्याच नागरिकांवर रासायनिक अस्त्रांचा मारा करुन असद कुटुंबाने आपली सत्ता टिकवली आहे. इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतर सीरिया आणि इस्रायल यांच्यामध्ये तीन युद्धे झाली. पण, १९७३ सालच्या ‘यॉम किप्पुर’ युद्धात पराभव झाल्यानंतर सीरिया आणि इस्रायलची सीमा शांत आहे. २००३ साली अमेरिकेने इराकमध्ये सद्दाम हुसेनचा पराभव करुन लोकशाही स्थापन केली. त्यामुळे शियाबहुल इराक-इराणच्या प्रभवाखाली आला. इराणने सीरियाच्या माध्यमातून लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’ आणि गाझा पट्टीतील ‘हमास’ला ताकद पुरवली. एकेकाळी ‘हमास’चा राजकीय प्रमुख खालेद मशाल सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये वास्तव्याला होता. त्यामुळे एकीकडे इस्रायल, तर दुसरीकडे आखातातील सुन्नी अरब देशांना सीरिया सलत होता.
२०१० सालच्या अखेरीस ट्युनिशियामध्ये अरब राज्यक्रांतीची ठिणगी पडली आणि अल्पावधीतच त्याचे लोण इजिप्त, लिबिया आणि सीरियामध्ये पोहोचले. सुरुवातीला बशर अल असद यांची भ्रष्ट राजवट उलथवून लोकशाही आणण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनांचे त्याचे स्वरूप लवकरच पालटून त्याला ‘सुन्नी विरुद्ध शिया’ असे स्वरूप प्राप्त झाले. सीरियामधील उठावाला सौदी अरेबिया, तुर्की, कतार आणि अन्य अनेक देशांनी शस्त्रास्त्रे आणि पैशाची मदत पुरवली, तर अध्यक्ष बशर असद यांच्यापाठी शिया इराण आणि लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’ उभा राहिला. सीरियातील बंडाळीत ‘अल-कायदा’शी संलग्न गटांनी स्वतःचे बस्तान बसवले. सीरियातील बंडखोरांनी देशाच्या पूर्व भागात स्वतःचा अंमल प्रस्थापित केला असला, तरी असद यांची राजवट उलथवून टाकण्यात त्यांना अपयश आले. इराकमध्ये एप्रिल २०१४ साली झालेल्या निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा फायदा घेत, या दहशतवादी गटांनी स्वतःचे लक्ष तिकडे वळवले. इराकच्या सुन्नीबहुल भागातील सद्दाम हुसेनशी एकनिष्ठ असलेल्या गटांचा पाठिंबा मिळाल्याने अल्पावधीत पाच, दहा हजारांचे संख्याबळ असलेल्या ‘इसिस’ची ताकद ५० हजारांवर जाऊन पोहोचली. इस्लामी खलिफत स्थापन करण्यासाठी आपण हे सर्व करत असल्याचा आविर्भाव त्यांनी उत्पन्न केल्यामुळे सुन्नी मुस्लीम राष्ट्रांसोबत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा अनेक युरोपीय राष्ट्रांतूनही शेकडो-हजारो कट्टर तरूण लढण्यासाठी इराक आणि सीरियामध्ये गेले. अल्पावधीतच ‘इसिस’ने इराक आणि सीरियातील एक तृतीयांश तर इराकमधील ४० टक्के भूभाग ताब्यात घेतला.
२०१५ सालापासून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी ‘इसिस’विरुद्ध हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे रशियानेही बशर अल असद यांच्या राजवटीच्या बाजूने या युद्धामध्ये उडी घेतली. असद यांची राजवट पडू नये यासाठी इराणने ‘हिजबुल्ला’च्या मार्फत सीरियात सैन्य पाठवले. ‘हिजबुल्ला’कडे सुमारे एक लाखांचे सैन्य असून, त्यांच्याकडे इस्रायलविरुद्ध अनेक दशकांच्या युद्धाचा अनुभव होता. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘इसिस’चा टिकाव लागू शकला नाही. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर अमेरिकेचा या भागातील रस संपला आणि ती पोकळी रशियाने भरुन काढली. रशियाच्या मदतीने बशर अल असद यांनी गेलेली भूमी परत मिळवली. असे असले, तरी देशाच्या एक तृतीयांश भागावर कुर्दिश लोकांचे नियंत्रण होते. तुर्कीमध्येही कुर्दिश लोकांची संख्या लक्षणीय असून, कुर्दिश लोकांचा एक देश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सीरियातील कुर्दिश भागातील लोकांचा उपद्रव नको म्हणून तुर्कीने सीरियाच्या उत्तर सीमेवरील प्रदेशावर स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. असद सरकारने वायव्य सीमेवरील बंडखोरांचा बिमोड करण्यापूर्वीच २०२० साली रशिया आणि तुर्की यांनी सीरियामध्ये युद्धविराम घडवून आणला. तेव्हाही इडलिब हे शहर ‘हयात अल तहरीर’च्या ताब्यात होते. अलेप्पो ताब्यात आल्यानंतर जर आता बंडखोरांनी दक्षिणेकडील हमा आणि होम्स ही शहरे ताब्यात घेतली, तर असद यांचे प्रभुत्व फक्त राजधानी दमास्कसच्या अवतीभवती राहील. असे झाल्यास रशियाचेही मोठे नुकसान होणार आहे. सीरियाच्या असद सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात रशियाला सीरियाच्या भूमध्य समुद्राच्या किनार्यावरील बंदरांचा वापर करता येतो. हमा आणि होम्स बंडखोरांच्या ताब्यात गेल्यास रशियाला भूमध्य समुद्राचा वापर करणे अवघड होईल. इराण आणि ‘हिजबुल्ला’साठीही हा मोठा धक्का असेल. इस्रायलविरुद्धच्या युद्धामध्ये ‘हिजबुल्ला’चे प्रचंड नुकसान झाले आहे. इराणकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण मिळाल्याशिवाय ‘हिजबुल्ला’ला स्वतःच्या पायावर उभे राहाणे अवघड होईल. सीरिया हातातून गेला, तर एक प्रादेशिक महासत्ता होण्याचे इराणचे स्वप्न चक्काचूर होईल. त्यामुळे बशर अल असद यांची राजवट वाचवण्यासाठी इराण आणि रशिया कोणत्याही थराला जातील. दुसरीकडे ‘हयात अल तहरीर’ला यश मिळावे, म्हणून तुर्की प्रयत्नशील असून यात पाश्चिमात्य देशही मदत करु शकतात. गेल्या १४ वर्षांच्या युद्ध आणि यादवी युद्धामध्ये सीरिया होरपळला असला, तरी बशर अल असद स्वतःची खुर्ची सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सीरियातील युद्ध अन्यत्र पसरुन प्रादेशिक युद्धात रुपांतरित होते का, हे पाहावे लागेल.