खिडक्या बंद केल्या तरी!

    31-Dec-2024   
Total Views |
Zabihullah Mujahid

स्वयंपाक करणार्‍या किंवा पाणी भरणार्‍या स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात पाप येऊ शकते. त्यामुळे स्वयंपाक घर, अंगण किंवा विहीर नव्हे, तर घरातील महिलांचा वावर जिथे जिथे असतो, त्या त्या ठिकाणी घरात खिडकी बनवू नये, असा नवा फतवा तालिबान्यांनी नुकताच जारी केला. तालिबानी प्रशासनाचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने नुकताच तालिबानी सरकारचा हा अजब कायदा जाहीर केला. स्वयंपाकघर, अंगण आणि विहीर या ठिकाणी महिलांचा दिवसभर वावर म्हणजे, त्या दिवसभर तिथेच राबत असतात. त्या ठिकाणी खिडकी असेल, तर बाहेरचे पुरूष त्या खिडकीतून महिलांना पाहू शकतात. मग त्या पुरूषांच्या मनात या महिलांबद्दल लैंगिक संबंधासंदर्भात भावना उत्पन्न झाल्या तर? त्यापेक्षा बाहेरच्या पुरूषांनी महिलांना पाहूच नये, यासाठी ‘घरात जिथे महिलांचा वावर असतो, तिथे खिडकीच नको,’ असा कायदा तालिबान्यांनी काढला.

खरे तर बाहेरचे पुरूष घरातल्या महिलांना पाहतील न पाहतील. मात्र, घरातल्या महिलांना मात्र बाहेर काय घडत आहे, बाहेर काय आहे, याबाबत कणभरही बातमी मिळू नये, महिलांना बाहेर पाहता येऊच नये, अशी तजवीज तालिबान्यांनी केली आहे.
भयंकर! महिलांनी घराबाहेर पडू नये, पडले तर पिता, भाऊ, पती आणि पुत्र यांच्यासोबतच बाहेर निघावे, उद्यान किंवा उपहारगृह यामध्ये महिलांनी जाऊ नये, महिलांनी उच्च शिक्षण घेऊ नये, महिलांनी नोकरी करू नये, जगभरातल्या महिलांना सौंदर्य प्रसाधनांची आवड असते. मात्र, तालिबान्यांच्या राज्यात सौंदर्य प्रसाधनांच्या वापराला आणि ब्युटी पार्लरवही बंदी, महिलांनी अंगभर कपडे, त्यातही डोक्यावरचा एक केसही दिसणार नाही, असा हिजाब-बुरखा घालावा. कारण, महिलांच्या केसामध्ये सैतान असतो. तो सैतान पुरूषांना आकर्षित करतो म्हणे. तर तालिबानी ‘शरिया’ राजवटीत महिलांचे हे असे जगणे. उत्साह, जिज्ञासा, कल्पना यावर माणूस जगत असतो. आजूबाजूच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आणि बाहेरच्या जगामध्ये समन्वय साधत कल्पना करत तो प्रगती करतो. मात्र, बाहेरचे जगच दिसले नाही तर?

तालिबान्यांनी नेमके हेच अफगाण स्त्रियांसोबत केले. महिलांचा वावर असलेल्या जागी खिडक्याही नसाव्यात, अशी तजवीज केली आहे. घरातला पुरूष आणि त्याची मर्जी याव्यतिरिक्त या महिलांचे कोणतेच जग असू नये, तिच्यावर अत्याचार झाला, तरीसुद्धा त्याबाबत कुणा बाहेरच्यांना कळू नये, तिच्या घरातल्या पुरूषांच्या इच्छेविरोधात बाहेरही कोणते जग असते, याचा तिला अजिबात वारा लागू नये, यासाठी तालिबान्यांनी असा चोख बंदोबस्त केला. कमाल आहे त्या स्वयंपाक बनवणार्‍या, पाणी भरणार्‍या, घरात राबणार्‍या महिलेला खिडकीतून पाहून तिच्याविषयी मनात पाप आणणार्‍या पुरूषांना सजा नाही, बंदी नाही. मात्र बंदी कुणाला? तर आधीच तालिबानी राजवटीत मृतप्राय असलेल्या महिलांना? ‘शरिया’, ‘तीन तलाक’ वगैरेचे समर्थन करणार्‍या आपल्या भारतातील त्या आपाजान, खालाजान, खातून यांना हा तालिबान्यांचा नवा नियम मान्य आहे का?

या अनुषंगाने आठवले की, नव्या ‘प्यू रिसर्च’नुसार सध्या ख्रिश्चनधर्मीय लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहेत, तर मुस्लिमांची लोकसंख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, २०५० साली मुसलमान लोकसंख्येच्या बाबतीत जगात क्रमांक एकवर असणार आहेत. स्त्री जमीन आहे. तिचा जन्मच प्रसवण्यासाठी म्हणजे, मुलांना जन्म देण्यासाठी झाला, असे ठाम मत असल्यावर लोकसंख्या वाढणारच! जोपर्यंत मुलांना जन्म देता येतो, तोपर्यंत मुलांना जन्म देणार्‍या त्या स्त्रीची जी मानसिक-शारीरिक अवस्था होते, त्याचे काय? खरे तर तिलाही वाटते यासाठीच आपला जन्म आहे. तिचे हे वाटणे कायम राहावे, तिने जगात काय चालले, याबद्दल अज्ञानी राहून केवळ गुलामी करावी, यासाठी या खिडक्या बंद केल्या आहेत का?

एक मात्र आहे, खिडक्या बंद करा, दरवाजे बंद करा, अगदी महिलांसाठी घर आणि देश एक मोठे तुरूंग बनवा. पण, अंधार जाळणारा सूर्य काय केवळ आकाशातच उगवतो? नाही, अत्याचाराविरोधातला सूर्य शोषित-पीडितांच्या मनात उगवल्याशिवाय राहत नाही. जगभरातल्या मुस्लीम स्त्रियांच्या मनातही हा सूर्य उगवायला हवा. खिडक्या बंद केल्या तरीही!!

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.