सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या पलायनानंतर देशात हयात ‘तहरीर अल-शाम’ (एचटीएस) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. असे म्हणतात की, “सीरिया हा एकेकाळी ख्रिश्चनांचा बालेकिल्ला होता. मात्र, तोच सीरिया आज इस्लामिक केंद्र म्हणून तयार झाले आहे.” सीरियामध्ये धर्मांची विविधता आहे. जिथे आजच्या घडीला बहुसंख्य सीरियन लोक सुन्नी मुस्लीम आहेत. तर शिया, ड्रुज आणि ख्रिश्चन हे अल्पसंख्याक आहेत. सीरियातील ख्रिश्चन समुदाय सीरियन लोकसंख्येपैकी सुमारे दोन टक्के आहे. सीरियातील गृहयुद्ध आणि इस्लामिक दहशतवाद्यांच्या छळामुळे ख्रिश्चनांची संख्या झपाट्याने घटत गेली.
बांगलादेशची सद्यस्थिती पाहता याठिकाणी एकेकाळी हिंदू बहुसंख्य होते. मात्र, कालांतराने इस्लामिक समुदाय बहुसंख्य होत गेला आणि हिंदू अल्पसंख्याक होत गेले. बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यावर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आले आणि याच काळात हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले. हिंदूंचे सण, हिंदुत्वाची प्रतिके, मठ, मंदिरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न बांगलादेशमध्ये होऊ लागला. नवरात्रोत्सवादरम्यान येथील इस्लामिक कट्टरपंथींकडून देवींच्या मूर्तिंची विटंबना करण्यात आली. एकूणच काय तर, हिंदूंचे सण आले की, यात काहीतरी कुरघोडी करायची, असे प्रयत्न येथील समाजकंटकांकडून होऊ लागले.
सीरियामध्येही ख्रिश्चन हे अल्पसंख्याक राहिल्यामुळे ते आपले सण उत्सव इस्लामिक जाचाच्या भितीखाली साजरे करत आले आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद सत्तेतून गेल्यानंतर सीरियन ख्रिश्चनांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आपला सण साजरा केला. सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल, असे सीरियाचे नेते अहमद अल-शरा यांनी घोषणा केल्यानंतर, आता देशात नाताळ साजरा केला जाणार असल्याचे चित्र तयार झाले. दमास्कसच्या मध्यभागी असलेल्या एका ऐतिहासिक चर्चमध्ये मोठी गर्दी जमली होती. जी कोणत्याही निर्बंधाशिवाय या ठिकाणी उपस्थित होती. असे असले तरी इस्लामिक बंडखोरांच्या राजवटीबद्दल अल्पसंख्याक समाजातील मोठ्या वर्गात अजूनही भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.
सीरियामध्ये एके ठिकाणी हे चित्र होते. परंतु, दुसर्या ठिकाणी गंभीर घटना घडल्याचे निदर्शनास आले. नाताळचे प्रतीक मानले जाणारे ‘ख्रिसमस ट्री’ जाळण्याचा प्रयत्न येथील काही समाजकंटकांकडून करण्यात आला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये मध्य सीरियातील सुकायल्बिया या ख्रिश्चनबहुल शहरात ‘ख्रिसमस ट्री’ जळताना दिसत आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरले. झाड कोणी जाळले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सीरियातील अनेक शहरांवर नियंत्रण ठेवणार्या ‘एचटीएस’ संघटनेने देशात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे, तर त्याच्या प्रतिनिधींनी धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्याचीही शपथ घेतली आहे.
बांगलादेशमध्ये जेव्हा हिंदूंच्या प्रतिकांवर हल्ले झाले, तेव्हा माध्यमांनी त्या घटनांची दखल घेतली. त्यानंतर हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. मात्र, त्या चुकीच्या असल्याचा दावा करत युनूस सरकारने उलट माध्यमांनाच सुनावले. परंतु, भारताच्या विदेश मंत्र्यांच्या झालेल्या दौर्यानंतर मोहम्मद युनूस सरकारला आपल्या कार्यकाळात हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढल्याचे स्वीकारावे लागले.
आज जगात अशी एक अधर्मीय शक्ती आहे, जी कायम अराजकता पसरवण्यात सक्रिय आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्याची आज नित्तांत गरज आहे. यासाठी सार्या विश्व समुदायाला अशा अधर्मीय शक्तींविरोधात संघटित व्हावे लागेल. एकीकडे आपले सण-उत्सव आनंदाने साजरे होत असले, तरी दुसरीकडे त्यावर ना ना प्रकारे हल्ले होत आहेत. विश्व समुदाय एक झाला, जगात कुठेही अशा घटना घडल्या, तर दंगेखोरांना वेळीच योग्य धडा शिकवला जाईल यात शंका नाही. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर आज युनूस सरकारच्या काळात जी वेळ आली आहे, तशी सीरियातील ‘तहरीर अल-शाम’ यांच्या कार्यकाळात ख्रिश्चन अल्पसंख्याकांवर येऊ नये, हीच अपेक्षा.