मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sadhvi Ritambhara at Dadar) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी व मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत, मुंबई विभाग) 'मानवंदना संचलन' आयोजित करण्यात आले आहे. साध्वी ऋतंभरा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे मुख्य कार्यक्रम संपन्न होईल. साधारण ६ हजार दुर्गांचे भव्य संचलन यावेळी राजा शिवाजी विद्यालयाच्या मैदानात होणार आहे.
९० च्या दशकात राममंदिर आंदोलनाच्या वेळी साध्वी ऋतंभरा यांचे भाषण असलेली कॅसेट प्रत्येक गावात गुंजत राहिली होती. आपल्या भाषणातून त्यांनी राम मंदिर, राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या समर्थनार्थ अनेकदा युक्तिवादही केला. १९८० च्या दशकात त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. राममंदिर चळवळ ही अशी घटना होती जिथून त्यांनी हिंदू प्रबोधन मोहिमेची कमान आपल्या हाती घेतली. आजची तरुण पिढी तसेच महिलाशक्तीकरीता साध्वी ऋतंभरा यांची अमृतवाणी ऐकण्याची सुवर्ण संधी सर्वांना लाभणार असल्याचे सांगण्यात येत आहे.