स्व. सतीश प्रधान अनंतात विलीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    30-Dec-2024
Total Views |
 
satish pradhan 
 
ठाणे : (Satish Pradhan) ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवाहर बाग वैकुंठभूमीत त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
ठाणे शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकिय जडणघडणीमध्ये योगदान देणारे सतिश प्रधान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी, दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सतीश प्रधान यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयात येथे ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचा अंतिम दर्शन घेतले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक,खासदार नरेश म्हस्के, भाजप प्रदेश प्रभारी आ. रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिक्षक वर्गांनी सतिश प्रधान यांच्या पार्थिवांचे अंतिम दर्शन घेतले. सतिष प्रधान यांच्यावर आज ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
आमदार रविंद्र चव्हाण यांनी वाहिली श्रद्धांजली
 
ठाणे शहराच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान असलेले माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन माजी मंत्री व भाजप प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात त्यांचे कार्य अभिमानास्पद होते, अशी भावना व्यक्त केली. या वेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती.
 
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
 
ठाण्याचे सुपूत्र सतीश प्रधान यांचे ठाणे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनी ठाणे महापालिकेचे पहिले महापौरपद भुषविले. ते २१.०३.१९८६ ते ३०.०३.१९८७ या काळात महापौर होते. तत्पूर्वी, ठाण्याचे नगराध्यक्ष आणि महापौरपदानंतर राज्यसभेचे दोनदा खासदार झाले. ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात सतीश प्रधान यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली.