ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्यासाठी मुंबई महापालिका सकारात्मक

आमदार संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक

    30-Dec-2024
Total Views |
Sanjay Kelkar

ठाणे : मुंबई महापालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यादृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेकवेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

आज आमदारकेळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता (प्रचालने) पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, अतुल कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित ५० एमएलडी पाण्यापैकी २५ एमएलडी पाणी आधी तातडीने मिळावे याबाबत आमदारकेळकर यांनी आग्रह धरला. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या आधी ठाणे महापलिकेचे आयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे. त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदारकेळकर यांनी सांगितले. यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचे नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीने २५ एमएलडी पाणी निश्चित मिळेल, असा विश्वास आमदारकेळकर यांनी सांगितले.