अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    30-Dec-2024
Total Views |
 
PRAJAKTA MALI
 
मुंबई : (Prajakta Mali) प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याकडून जाहीर माफीची मागणी करणारे निवेदनपत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तसेच त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले.
 
बीड मस्साजोग सरपंच देशमुख हत्येप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आमदार सुरेश धस यांनी सिनेक्षेत्रातील अभिनेत्रींची नावे घेत टिप्पणी केली होती. यामध्ये हिंदी अभिनेत्रींसह मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला. यानंतर आमदार धस यांच्या या विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला. राजकीय वादात विनाकारण आपले नाव घेऊन चारित्र्य डागाळण्याचा प्रयत्न केल्याने आमदार सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना दिले आहे.