मंत्री नितेश राणे यांचे मत; बालाजी मंदिर वरळी येथे आरंभ गर्जना सोहळा
30-Dec-2024
Total Views |
मुंबई : जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी भावना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी व्यक्त केली. रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर वरळी येथे आयोजित आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधीला ते उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास यांच्यावतीने महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या आरंभ गर्जना सोहळ्यास बालाजी मंदिर वरळी येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी, उपस्थित राहून योगेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या चरणी हे नितेश राणे नतमस्तक झाले. ही आरंभाची गर्जना महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केली. नितेश राणे म्हणाले की, जे आमचे आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजे. त्यावर आमचा अधिकार आहे. प्राचीन काळापासून या देशाची प्रत्येक इंच जमीन ही हिंदू समाजाचीच आहे. त्यानंतर इस्लामिक आक्रमण झाले आणि आमच्याच मंदिरांवर विविध मिशिदी आणि थडगे बांधण्याचा कार्यक्रम इस्लामिक राज्यकर्त्यांनी केला. पण आता ही भूमी आमची आहे. इथली प्रत्येक इंच जमीन आमचीच आहे. जसे आम्ही अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठान मिळवले; तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी आणि श्रीकृष्ण जन्मस्थान हे आमचेच आहे. त्यासाठी जो संघर्षाचा आरंभ आहे, तो आजपासून झाला, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, यासाठी आम्ही एकीकडे कायदेशीर बाजूने चालतच आहोत; पण त्यासोबतच हिंदू समाजात जनजागृती व्हावी आणि आपला अधिकार मिळवण्यासाठी प्रत्येक हिंदूने खांद्याला खांदा लावून काम करून आवाज उचलावा यासाठी हा आरंभ केला आहे.
आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हिंदू हाच उल्लेख
नितेश राणे पुढे म्हणाले की, आमच्या नावापुढे कुठलेही पद लागण्याआधी आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर आम्ही हिंदू आहोत हा उल्लेख आहे, हे विसरता येणार नाही. ही पदे आणि जबाबदारी आहेच; पण हिंदू ही आमची ओळख आहे. आमच्यासाठी आमचा धर्म प्रथम असल्याने ती जबाबदारी मी नेहमी पार पाडणार आहे.
हिरव्या सापांना तिथल्या तिथे ठेचू
मेधा कुलकर्णी यांनी हिंदू म्हणून योग्य भूमिका घेतली आहे. या हिरव्या सापांना तिथल्या तिथे ठेचण्याचे काम आपण हिंदू म्हणून केले पाहिजे. आपल्या राज्यात आज हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. कडवट हिंदुत्वादी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही नाटके या राज्यात सहन होणार नाही, हा संदेश आमचे सरकार स्थापन झाल्यापासून गेला आहे. हिंदू समाजाने मतदान करून हे सरकार आले आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आणि हिरवे आक्रमण तिथल्या तिथे थांबवणे हे आमचे परम कर्तव्य आहे. त्यामुळे पुणे असो किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात कुठेही, अशी मस्ती सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.