मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय मागे!

    03-Dec-2024
Total Views |

MARKADWADI
 
सोलापूर : (Markadwadi) माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
 
नेमकं काय आहे प्रकरण ?
 
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गावातून कमी मतदान झाल्याने गावकऱ्यांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला होता. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपच्या राम सातपुतेंना चांगले मताधिक्य मिळाले, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच मारकडवाडी येथे ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याची परवानगी मागितली होती. परंतू, प्रशासनाने यासाठी परवानगी नाकारली.
 
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला. या गावात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला. तसेच मतदानापूर्वी पोलिसांनी ग्रामस्थांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे आवाहनही केले होते. तरीही गावकरी माघार घेण्यास तयार नव्हते. पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास तसेच मतदान प्रक्रिया मागे न घेतल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन येथील बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
काय म्हणाले जानकर?
 
"आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, तुम्ही एक मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करु. आम्ही अगोदरच १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल," असे पोलिसांनी उत्तमराव जानकर यांना सांगितले. यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले. जर पोलीस मतदान करु देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरुन ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील, असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले. त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदानप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले.