मावळत्या २०२४ या वर्षात भारताने बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यात यश मिळविले. पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक, पॅरा-ऑलिम्पिक यांसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये दणदणीत यश संपादित करत पदकांची लयलूट केली. तब्बल १७ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक टीम इंडियाला जिंकता आला. दुसरीकडे, ‘फ्रेंच ओपन’चा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची टेनिसमधली निवृत्ती टेनिसप्रेमींच्या स्मरणात राहील. एकूणातच जगातील सर्वात युवा जगज्जेता ग्रँडमास्टर डी. गुकेशच्या अतुलनीय कामगिरीसह सरत्या वर्षातील अन्य संस्मरणीय क्रीडा घडामोडींचा घेतलेला धांडोळा..."
जगज्जेता ग्रँडमास्टर डी. गुकेश
बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर डी. गुकेशने सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत विश्वविजेतेपद आपल्या नावे केले. जगातील सर्वात युवा जगज्जेता, रशियन बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव्ह यांचा २२व्या वर्षी सर्वात कमी वयात विश्वविजेता बनण्याचा विक्रम मोडीत काढला.
नेमबाज मनू भाकरला दोन पदके!
महिला नेमबाज मनू भाकरने दहा मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले. तसेच, मनू भाकरने नेमबाज सरबजीतच्या जोडीने दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. नेमबाज मनू भाकरने नेत्रदीपक कामगिरी करत यंदाच्या जगप्रतिष्ठित ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेत दोन पदकांची कमाई केली.
स्वप्नील कुसाळेची 'कांस्य'कमाई
मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक गाजवले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ‘५० मीटर रायफल थ्री-पोझिशन’ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकाविले.
नीरज चोप्राला रौप्यपदक
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य कामगिरीसह दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. नीरज चोप्रा यंदा भालाफेक क्रीडाप्रकारात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ‘थ्रो’ खेळण्यात यशस्वी ठरला, ज्यात ८९.४५ मीटर लांब फेकीसह त्याला रौप्यपदक मिळाले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात एक रौप्यपदक, पाच कांस्यपदके अशा एकूण सहा पदकांचा समावेश आहे.
रोनाल्डोचे सोशल मीडियावर एक अब्ज फॉलोअर्स!
जगद्विख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर एक अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठला.
अंडर-१९ आशिया कप विजेतेपद
महिला अंडर-१९ ‘टी-२०’ आशिया कप भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशवर ४१ धावांनी मात करत इतिहास रचला.
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४
‘टी-२० विश्वचषक २०२४’ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे अव्वल कामगिरी करत विश्वचषक पटकावला. वेस्ट इंडीजमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत, गेल्या १७ वर्षांपासून असलेला ‘टी-२०’ चषकांचा दुष्काळ अखेर दूर केला.
पुरुष हॉकी संघाला कांस्यपदक
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक कायम ठेवण्यात यश आले. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा ‘२-१’ असा पराभव केला.
भारतीय हॉकी संघाचा दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली. दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या हॉकीमधील योगदानाची दखल घेत ‘हॉकी इंडिया’ने त्याची १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.
१० वर्षांनंतर 'केकेआर'ने जिंकली आयपीएल
‘आयपीएल’च्या १७व्या मोसमातील अंतिम सामन्यात ‘कोलकाता नाईट रायडर्स’ विजेता संघ ठरला. महाअंतिम सामन्यात दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात ‘सनरायजर्स हैदराबाद’वर आठ विकेट्सने विजय मिळवित ट्रॉफी आपल्या नावे केली.
आर. अश्विनचा क्रिकेटला रामराम
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची दि. १८ डिसेंबर रोजी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील चालू कसोटी मालिकेदरम्यान अश्विनचा क्रिकेटला रामराम.
सुनील छेत्री यावर्षी खेळला अंतिम सामना
भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू व कर्णधार सुनील छेत्रीने यावर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. सुनील छेत्रीने दि. ६ जून रोजी कुवेत विरुध्द अंतिम सामना खेळला. या सामन्यासह त्याच्या १९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला.
परळमधील स्नेहा वायकर ‘पॅरिस ऑलिम्पिक २०२४’ द्वारे आयोजित ‘सांस्कृतिक ऑलिम्पियाड’मधील ‘चेस बॉक्सिंग’ लढत जिंकून वाढविला देशाचा अभिमान.
अलविदा नदाल
‘क्ले कोर्ट’चा बादशाह, स्पेनचा जगद्विख्यात टेनिसपटू राफेल नदालने दि. १० ऑक्टोबर रोजी ‘इन्स्टाग्राम’वर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना निवृत्तीची माहिती दिली. विशेषतः फ्रेंच ओपन जेतेपद १४ वेळा जिंकणारा पुरुष खेळाडू म्हणून नदालची गणना आहे.
संकलन : रोहित कदम
मांडणी/सजावट : हर्षद परब, परिक्षीत करंबेळे