माणुसकीची उत्तुंग सीमा

Total Views |
seema ramkrishnan



एक कर्तव्यदक्ष गृहिणी ते एक व्यावसायिक स्त्री हा यशस्वी प्रवास पूर्ण करत सामाजिक भान जपणार्‍या मॅरेथॉन धावपटू सीमा रामकृष्णन यांच्याविषयी.....

धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासोबत सामाजिक उपक्रमातून आपण समाजासाठीही एखादी चळवळ उभी करावी, हा विचारच मुळात खूप सकारात्मक आहे. वयाच्या 40व्या वर्षांपर्यंत एक कर्तव्यदक्ष गृहिणी ते एक व्यावसायिक स्त्री, हा यशस्वी प्रवास पूर्ण करताना सामाजिक भान जपणार्‍या मॅरेथॉन धावपटू सीमा रामकृष्णन म्हणजे एक उत्साही व्यक्तिमत्त्व. सीमा रामकृष्णन या केवळ धावपटूच नाही, त्या एक सर्जनशील कलाकार, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेणार्‍या आहेत.
 
मूळच्या ठाण्याच्या रहिवासी असणार्‍या सीमा रामकृष्णन यांचे बालपण, ठाण्यातच गेले. बीई कम्प्युटर सायन्स करून सीमा युकेमध्ये संयुक्त राष्ट्रातील नोकरीच्या निमित्ताने सहा वर्षे वास्तव्यास होत्या. सन 2005 मध्ये सीमा यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सन 2006 मध्ये सीमा यांच्या परिचयातील एक व्यक्ती ‘स्टॅण्डर्ड चार्टर’ या नामांकित बँकेत, चांगल्या पदावर होती. त्यादरम्यान, बँकेच्या वतीने एका मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सीमा यांना मिळाली. या स्पर्धेत विशेषतः अंध मुलांचा एक वर्ग ‘फन रन’ करणार आहे. त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक अंध धावपटूंसोबत एक स्वयंसेवक हवा आहे, त्यासाठी आपण याला का? अशी विचारणा बँकेतील त्या व्यक्तीने सीमा यांच्याकडे केली. तेव्हा ही कल्पना ऐकून, सीमा यांना आनंद झाला.

एक भन्नाट आणि धाडसी मॅरेथॉनमध्ये आपण उत्साहाने सहभाग नोंदवून मुलांना सहकार्य करू या भावनेने त्या सहभागी झाल्या. मुळात मॅरेथॉन आणि त्यात हिरीरीने सहभागी होणारा वर्ग ही एक नवी संकल्पना येत होती. त्यामुळे काहीतरी वेगळे करता येईल, या भावनेने सीमा यामध्ये सहभागी झाल्या. अंध मुलांसोबत स्पर्धेत सीमा आणि आणि त्यांचे पती उतरले. पण, या स्पर्धेत आणखी काही धावपटू 21 किलोमीटर धावत असल्याचे, त्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे त्यांच्या पतीचा आणि सीमा यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढला. या स्पर्धेत त्यांनी पुढच्यावर्षी सहभागी होण्याचा निर्धार केला. त्यानंतर दोघेही 21 किलोमीटरच्या गटामध्ये सहभागी झाले. यानंतर पुढील काही काळ सीमा आणि त्यांचे पती वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये धावू लागले. ज्यामुळे त्यांना एका धावपटूसारखा आनंद मिळू लागला. यानंतर सीमा मुंबई मॅरेथॉनया स्पर्धेचा एक भागच झाल्या. 2010 सालापासून, 2019 सालापर्यंत दरवर्षी सीमा या दरवर्षी 21 किलोमीटर धावत होत्या. यावेळी 20पेक्षा जास्त हाफ मॅरेथॉन आणि 8 फुल मॅरेथॉन धावल्या आहेत. 2010 सालापासून आजतागायत, सीमा यांच्या खात्यात 300 ते 400 मेडल जमा झाले आहेत.

2019 साली सीमा यांनी स्वतःची ‘लिव्ह फिट’ नावाची फिटनेस आणि मॅरेथॉन कंपनीची स्थापना करत , या क्षेत्राची व्याप्ती वाढविली. ’सर्वसमावेशक धावपटू पूर्ण तयारीनिशी मॅरेथॉनमध्ये उतरावे’ हा या कंपनीमागील उद्देश होता. देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून , मुलींसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेची माहिती मिळताच, सीमा यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना एका विशिष्ट उद्देशाने आणि सामाजिक उपक्रमासह संदेश देत धावण्याचे ठरवले. गेल्या काही वर्षात ठाणे, रायगड जिल्ह्यातील मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधण्याच्या उद्देशाने, सीमा या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान, सीमा आणि त्यांचे पती नागरिकांना निधीसाठी आवाहन करतात. दरवर्षी अनेक हात या बहुमोल कार्यात हातभार लावतात. यामध्ये स्वत:चा वाटा देऊन ग्रामीण भागात स्वछतागृह उभारले जाते. सीमा आणि त्यांच्या टीमने आजतागायत जवळपास 20 स्वच्छतागृहे बांधली आहेत. ज्यातून दोन हजारांहून, अधिक मुलींना स्वच्छता आणि आरोग्य यामुळे शिक्षणाची आवड निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मॅरेथॉनची सीमा ओलांडून त्यांना शास्त्रीय संगीताचीही आवड आहे. त्या स्वतः उत्तम गातात. सीमा यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कायमच सकारात्मक राहिला आहे. सीमा या प्रत्येक क्षण हा माझा शेवटचा क्षण आहे, असे मानून जगतात. यामुळेच त्यांना कायम समाजासाठी काहीतरी करावे ही भावना जागृत राहते. यासोबतच पेन्टिंग, स्केचिंग, स्कल्प्चर आणि विविध कलाकृतींच्या निर्मितीतही त्या मागे नाहीत. सीमा यांनी काही वर्षांपूर्वी वृत्तपत्र दान घेण्याचा, उपक्रमदेखील सुरू केला आहे. ज्यामध्ये त्या ओळखीच्या लोकांना त्यांची जुनी वर्तमानपत्रे, काही निवडक रद्दीवाल्यांकडे दान करण्याची विनंती केली आहे. या जमा रद्दीच्या येणार्‍या पैशांतून, सीमा आणि त्यांची टीम टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालय, परळ येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करतात. सीमा या मुलुंडमधील ‘निर्मलज्योत ट्रस्ट’ या एनजीओशी देखील जोडलेल्या आहेत. यामाध्यमातून सीमा झोपडपट्टीतील मुलांसाठी काम करतात. सीमा या मागील दोन वर्षांपासून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी, दर महिन्याला प्लेटलेट्स दान करत आहे. सीमा आपली आवड जपत आणि उत्तमरित्या कुटुंबही सांभाळत आहेत. सीमा यांना 24 वर्षांची एक मुलगी आहे.
 
एखाद्या व्यक्तीच्या कानावर आलेली नवी माहिती तिचा उद्देश, प्रत्यक्षातील चित्र हे व्यक्तीला खरोखरच किती नव्या वेगळ्या वाटेवर घेऊन जाऊ शकत, हे रामकृष्णन दाम्पत्याने आपल्यापुढे मांडले आहे. म्हणून आवडीला, इच्छेला आणि प्रयत्नांना कधीच ‘सीमा’ नसावी. सीमा रामकृष्णन यांना भविष्यातील नव्या उपक्रमांसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.