२०२५ मध्ये एआय तंत्रज्ञान सर्व भारतीय उद्योग क्षेत्र व्यापणार !

माहिती तंत्रज्ञान, विदा स्वामित्व यांसारख्या सर्वच क्षेत्रांना व्यापणार

    29-Dec-2024
Total Views |
 
 
ai
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय उद्योग क्षेत्रात एआय म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्ता जवळपास सर्वच क्षेत्र व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. २०२५ हे वर्ष त्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरणार आहे. एआय तंत्रज्ञान वापराने व्यवसाय वृध्दीसाठी प्रचंड उपयुक्त ठरत असल्याने सर्वच उद्योगांकडून या तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. परंतु साहजिकच यांमुळे नोकऱ्यांवर गदा येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबद्दलची मतमतांतरे असली तरी एआय तंत्रज्ञान आता सर्वच क्षेत्रांमध्ये फोफावणार याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास व्यक्त करत आहेत.
 
 
एआय तंत्रज्ञानाची जगभरातील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्याच्या २३५ बिलीयन डॉलर्सचे मूल्य असलेली ही बाजारपेठ २०२८ पर्यंत तब्बल ६३१ बिलीयन डॉलर्स पर्यंतचे मूल्य गाठण्याची शक्यता आहे. यावरूनच आपल्याला याच्या विस्ताराचा अंदाज बांधता येऊ शकतो. कृषी,वैद्यकीय सेवा, या आणि अशा कित्येक क्षेत्रात एआयचा वापर होऊ शकतो. एआयच्या वापराने वेळ आणि पैसे या दोघांचीही बचत होत असल्यामुळे उद्योगक्षेत्राचा कल एआयच्या वापराकडे झुकतो. फक्त तंत्रज्ञान क्षेत्रच नव्हे तर बँकींग, विदा संपादन, विदा स्वामित्व तसेच उत्पादन क्षेत्रातही एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे.
 
 
एआय तंत्रज्ञानाचा नवीन रोजगार निर्मितीवर नेमका काय परिणाम करणार याबाबत अजूनही पुरेसे आकलन झाले नसल्यामुळे अजूनही तज्ज्ञ याबाबत काहीच अंदाज व्यक्त करत नाहीत. याउलट एआय तंत्रज्ञान कर्मचारी, उपभोक्ते ग्राहक, उत्पादनात सुधारणा, महसूलवाढीचे नवे मार्ग शोधणे यांसाठी एआय तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर शक्य आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाच्या वापराने नवीन रोजगार निर्मिती शक्य होणार आहे असे बऱ्याच उद्योजकांचे म्हणणे आहे. रोजगार निर्मितीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेणे ही काळाची गरज बनणार आहे. सर्व्हिस नाऊ आणि पीअर्सन यांच्या नोव्हें.२०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या भारतावरील अहवालात २०२८ पर्यंत एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वापराने भारतात २.७३ दशलक्ष नवे रोजगार तयार होणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
एकूणच एआय तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल भारतीय उद्योगक्षेत्र तयार असल्याचे दिसून येत आहे. लवकरच स्वायत्त बुद्धीमत्ता, क्लाउड कंप्युटिंग, विक्री व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञान वापरले जाताना दिसेल. पुढील काळात होणाऱ्या सर्वांगिण बदलास सामोरे जाण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागेल हे निश्चित.