हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, कृती आणि तत्त्वज्ञान जनतेकडून अतिशय आदराने स्वीकारले गेले. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला स्मारकाच्या रुपात अजरामर करण्याच्या जन इच्छेचा मान ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २७ डिसेंबर २०१६ रोजी बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी दिली. त्यासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थेची स्थापनाही करण्यात आली. मात्र, बाळासाहेबांच्या या वारसदाराला इतक्या वर्षांत त्यांचे स्मारक पूर्ण करता आले नाही. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत बाळासाहेबांच्या स्मारकाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. हे काम पूर्ण होण्यासाठी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याची वाट पाहावी लागली.
दि. ६ नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासा’कडे महापौर बंगल्यासहित अडीच एकर जागा हस्तांतरित करण्यात आली. मधल्या काळात राज्यात सत्तांतर झाले. भाजपसोबत युतीत निवडणूक लढवणार्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी संधान साधले आणि मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले. त्याआधी दि. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यास’ आणि समितीच्या अध्यक्षपदाचा ठाकरेंनी राजीनामा दिला. २०२० साली ठाकरे सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार न्यासाचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे देण्यात आले, तर सुभाष देसाई यांची सचिवपदी वर्णी लावण्यात आली. त्यामुळे ही ट्रस्ट (न्यास) ’फॅमिली ट्रस्ट’ आहे का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला. पुत्र मुख्यमंत्री आणि नातू ट्रस्टच्या अध्यक्षपदी असताना बाळासाहेबांचे स्मारक जलदगतीने पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सत्तेची फळे उपभोगणार्यांना वडिलांच्या स्मारकाची फारशी चिंता नव्हतीच. देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील आणि काम पूर्ण करतील, असेच बहुधा त्यांच्या मनात असावे. राजकारण बाजूला ठेवा, पण हिंदुहृदयसम्राटांच्या स्मारकाला फडणवीस यांनी खर्या अर्थाने गती दिली आणि पहिला टप्पा नुकताच पूर्ण करून घेतला. दुसरा टप्पाही लवकरच पूर्ण होईल. पण, यातून ‘उबाठा’शी एकनिष्ठ राहिलेल्यांनी एकच धडा घ्यावा, जो नाही झाला बापाचा, तो काय होईल लोकांचा?
भाजपला विरोध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्याच्या हेतूने काँग्रेसच्या युवराजांनी मागे ‘भारत जोडो’ यात्रा काढली. कॅमेर्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी का होईना, या यात्रेनिमित्ताने राहुल गांधी गल्लीबोळात फिरले. त्याचा बराच गाजावाजाही झाला. बरे, या यात्रेत सहभागी झालेले कोण, तर शहरी नक्षलवाद्यांच्या ४० हून अधिक संघटनांचे लोक. त्यातील अनेकांचे संबंध थेट माओवाद्यांशी असल्याचे अलीकडेच उजेडात आले. अशाप्रकारे नक्षलवाद्यांना सोबत घेऊन राहुल गांधी नेमका भारत जोडायला निघाले की तोडायला, याचे उत्तर ते किंवा त्यांचे चेले कधीच देणार नाहीत. पण, या बुरखाधार्यांचा खरा चेहरा कालच्या बेळगावमधील अधिवेशनातून पुन्हा समोर आला. महात्मा गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसच्या कामकाज समितीची बैठक बेळगावात घेण्यात आली. कार्यक्रमाचा थाट सरंजामी होताच. पण, कार्यक्रमस्थळी जे होर्डिंग लावले, ते समस्त भारतवासीयांना चीड आणणारे होते. होर्डिंगवर छापलेल्या भारताच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनला वगळण्यात आले. त्यामुळे संपूर्ण देश ‘वीर बाल दिवस’ साजरा करीत असताना, काँग्रेस या माध्यमातून काय दर्शवू पाहत आहे? महात्मा गांधींच्या फोटोआडून देशाचे पुन्हा तुकडे पाडण्याचा हा नवा डाव तर नाही ना? असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. अतिशय संवेदनशील विषयात असे प्रकार कधीच नजरचुकीने होत नाहीत. ते जाणीवपूर्वक घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेसकडून हे देशविरोधी कृत्य जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आले का, अशा शंकेलाही वाव आहेच. पण, तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी भारताची बदनामी का करता? सीमेवर प्राण धोक्यात घालून देशसेवा करणार्या जवानांना हे पाहून काय वाटले असेल? आपलेच काही नतद्रष्ट राजकारणी अशाप्रकारे पाकिस्तान आणि चीनची भलामण करीत असलील, तर या वीर जवानांनी छातीवर गोळ्या कशासाठी खायच्या? राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या चेल्यांनो थांबा... हायकमांडसमोर मुजरे झाडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी देशविघातक कृत्ये करू नका, अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकवेल!