पुढील ५ वर्षात टाटा समूह देणार ५ लाख रोजगार देणार!
समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्याकडून विश्वास व्यक्त
27-Dec-2024
Total Views |
मुंबई : येत्या ५ वर्षात टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांकडून ५ लाख रोजगार निर्माण केले जातील असा विश्वास टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. सरत्या २०२४ या वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रशेखर यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. याबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतरही संकटांवर भाष्य केले आहे. येणाऱ्या नवीन वर्षात समुहाकडून कशा पध्दतीने विस्तार केला जाणार आहे याची माहितीही दिली गेली आहे.
टाटा समुहाच्या बॅटरी, सेमीकंडक्टर, विद्युत वाहने, सौरऊर्जा उपकरणे यांमध्ये पुढच्या काही वर्षात अपेक्षित असलेल्या गुंतवणुकीतून ही रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. तसेच कंपनीच्या तंत्रज्ञान विषयक सेवा, हॉस्पीटॅलिटी या क्षेत्रातही मोठी गुंतवणुक अपेक्षित ज्यातूनही मोठी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. याबरोबर हवाई वाहतुक, रिटेल विक्री या क्षेत्रांमध्येही गुंतवणुकीबरोबरच रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
या पत्राच्या सुरूवातीला टाटा समूहाचे दिवंगत अध्यक्ष रतन टाटा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. रतन टाटा यांचे निधन ही समुहातल्या प्रत्येकासाठी खुप वेदनादायी गोष्ट ठरली अशा शब्दांत चंद्रशेखर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. २०२४ हे साल जागतिक पातळीवरील आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीचे ठरले. पुढील वर्षी यात सुधारणा होऊन आर्थिक प्रगतीच्या वाटा खुल्या होतील असा विश्वास चंद्रशेखर यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.