मागील काही वर्षांत नववर्ष स्वागतास हुल्लडबाजीचे स्वरूप आले असले, तरी जगभरात या इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत अनेक कुटुंबे एकत्र येत, एकमेकांना भेटवस्तू देत किंवा जुन्या आठवणींना उजाळा देत करतात. 31 डिसेंबरच्या रात्री ठीक 12च्या ठोक्यावर जगभरातील लोक नवीन वर्षाच्या आगमनाचा तो क्षण आपल्या संस्कृती, श्रद्धा प्रतिबिंबित करणार्या परंपरांसह साजरा करतात. तेव्हा, जगभरातील नवीन वर्षाच्या अशाच काही मनोरंजक प्रथांची झलक आजच्या लेखातून जाणून घेऊया.
डेन्मार्कमध्ये काचेची भांडी फोडणे हे आपुलकीचे आणि नशिबाचे लक्षण मानले जाते. मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्यांच्या जुन्या काचेच्या प्लेट्स वर्षभर जतन करतात. या वर्षभर वापरलेल्या जुन्या प्लेट्स नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रियजनांच्या दारात आनंदाने फोडतात. त्या तुटलेल्या क्रॉकरीचा ढीग जितका मोठा, तितकीच तुमची लोकप्रियता अधिक, असे मानले जाते. जपानमध्ये घंटा वाजवणे हे नवीन वर्षाच्या आगमनास चिन्हांकित करते. ‘जोया नो केन’ नावाच्या प्रथेमध्ये बौद्ध मंदिरे 108 वेळा घंटा वाजवतात. ही संख्या पृथ्वीवरील इच्छांचे प्रतीक आहे, ज्यामुळे मानवी दुःख नाहीसे होते आणि नवीन सुरुवात करण्यासाठी आत्मा शुद्ध करणे हा यामागचा उद्देश. जपानमधील लोक ‘सोबा नूडल्स’चा स्वाद घेत नवीन वर्षाची सुरुवात करतात. ही परंपरा कामाकुरा काळातील आहे आणि ती गरिबांना नूडल्स देत असलेल्या बौद्ध मंदिराशी जोडलेली आहे.
स्पेनमध्ये मध्यरात्रीच्या वेळी 12 द्राक्षे खाणे ही एक अद्वितीय आणि प्रेमळ परंपरा आहे. प्रत्येक द्राक्ष पुढील वर्षासाठी एक इच्छा किंवा शुभ संकेतांचा महिना दर्शवते. ब्राझीलमध्ये नवीन वर्षाची संध्याकाळ समुद्राची आफ्रो-ब्राझिलियन देवी ‘इमांजा’ यांना अर्पण करून साजरी करते. भक्त पांढरे कपडे परिधान करतात आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फुले, मेणबत्त्या आणि लहान बोटी समुद्रात पाठवतात आणि आगामी वर्षासाठी आशीर्वादाची इच्छा बाळगतात.
दरम्यान, स्कॉटलंडमध्ये ‘फर्स्ट फूटिंग’ची प्राचीन प्रथा सुरू आहे. मध्यरात्रीनंतर घराचा उंबरठा ओलांडणारी पहिली व्यक्ती भाग्य घेऊन येते, असे मानले जाते. पारंपरिकदृष्ट्या हा पाहुणा कोळसा, शॉर्टब्रेड किंवा व्हिस्कीसारख्या भेटवस्तू घेऊन येतो. फिलीपिन्समध्ये गोलाकार फळे या उत्सवांवर वर्चस्व गाजवतात, ज्याकडे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. सिडनीतील फटाक्यांपासून ते ‘टाईम्स स्क्वेअर’मधील रस्त्यावरील पार्ट्यांपर्यंत त्याभागातील प्रथा, परंपरा मानवतेच्या नाविन्याची आणि आशेची इच्छा दर्शवतात.
अशाप्रकारे विविध प्रथा, त्याच्या संस्कृतीत आणि आशावादात रुजलेल्या आहेत. लाखो अमेरिकन नागरिक त्यांच्या टीव्हीभोवती किंवा ‘टाइम्स स्क्वेअर’च्या रस्त्यावर कडाक्याच्या थंडीतही दरवर्षी मध्यरात्री 12च्या ठोक्याला ‘बॉल ड्रॉप’ पाहण्यासाठी जमतात. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे मालक डॉल्फ ओच यांनी ‘टाइम्स’च्या नवीन मुख्यालयाकडे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम तयार केला आणि तेव्हापासून हा वार्षिक देखावा जगातील सर्वात लोकप्रिय आणि नववर्षाच्या उत्सवांपैकी एक आहे.
कॅनडामध्ये कॅनेडियन लोक नवीन वर्षाची सुरुवात बर्फातील मासेमारी या हिवाळ्यातील आवडत्या खेळाने करतात. ‘ग्लोबल न्यूज’च्या मते, यासाठी अनेक कुटुंबे उबदार झोपड्या आणि स्वयंपाक उपकरणे भाड्याने घेतात, जेणेकरून ते आपल्या प्रियजनांसह मेजवानीचा आनंद लुटू शकतील. ग्रीसमध्ये तर नववर्षाला दाराबाहेर कांदा टांगण्याची परंपरा आहे. प्रजनन आणि वाढीचे प्रतीक मानला जातो. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, कोलंबियन घरांमध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या पलंगाखाली तीन बटाटे ठेवण्याची परंपरा आहे, ज्याला ‘अगुएरो’ म्हणतात. यात एक सोललेला, एक न सोललेला आणि शेवटचा फक्त अर्धवट बटाटा असतो. मध्यरात्री प्रत्येक व्यक्ती डोळे मिटून एकाची निवड करते आणि त्यांनी निवडलेल्या बटाट्यावर त्यांचे नवेवर्ष अवलंबून असेल, असा समज. एकतर चांगले नशीब, आर्थिक संघर्ष किंवा दोन्हीच्या मिश्रणाचा अंदाज याद्वारे लावला जातो.
जगभरातील या सर्व प्रथा आणि परंपरा पाहता यातून एक गोष्ट लक्षात येते की, अत्यंत सकारात्मक ऊर्जेसह नव्या वर्षात पदार्पण करताना यातील प्रत्येक प्रथा ही आपल्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र येण्याची संधी आहे. यातील प्रत्येक प्रथा ही कोणत्याही हुल्लडबाजीला स्थान देणारी नसून, निव्वळ नव्या वर्षाच्या स्वागतालाच अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा संदेश देते.