प्रवाशांसाठी सुखकारक डिजिटल व्हिसा

    27-Dec-2024   
Total Views |
Digital Visa

इंग्रजी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी एव्हाना अनेक जणांची सहलीची तयारीही झाली असेल, तर काही जण सहलीसाठी रवानाही झाले असतील. हल्ली देशांतर्गत सहलींबरोबरच भारतीयांना सातासमुद्रापारचे देशही खुणावू लागले आहेत. तेव्हा, अशा आंतरराष्ट्रीय सहलींचे नियोजन करताना व्हिसाचा प्रश्नही उद्भवतो. त्यानिमित्ताने डिजिटल व्हिसासंदर्भात माहिती देणारा हा लेख...

व्हिसा म्हणजे काय? व्हिसा हा एक अधिकृत दस्तऐवज आहे, जो प्रवाशाला कायदेशीररित्या परदेशात प्रवेश करण्याची परवानगी देतो. प्रत्येक देशासाठी वेगवेगळा व्हिसा लागतो. व्हिसा हा सामान्यतः प्रवाशाच्या पारपत्रावर शिक्का मारून किंवा पारपत्राला चिकटवून दिला जातो. व्हिसाचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी प्रत्येक पर्यटकाला-प्रवाशाला त्या त्या परकीय देशात वेगवेगळे अधिकार देतात. व्हिसा हा ठराविक कालावधीसाठी दिला जातो. त्यामुळे एखाद्याचा व्हिसा कालबाह्य झाला किंवा त्याची मुदत संपली, तर तो परत कायदेशीर होण्यासाठी प्रवाशाला ताबडतोब ‘ब्रिजिंग व्हिसा’साठी अर्ज करावा लागतो.

एखाद्याला व्हिसा दोन कारणांसाठी नाकारला जाऊ शकतो. पहिले कारण म्हणजे, व्हिसासाठी अर्ज केलेला पात्र नसतो किंवा केलेला अर्ज अपूर्ण असल्यास, कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्यास व्हिसा नाकारला जाऊ शकतो.

जग आता खुले झाले आहे आणि भारतीयही जास्तीत जास्त देशांना भेटी देण्यासाठी मोठ्या संख्येने परदेशात पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतात. भारतीयांना भारतातून जगातील २९ देशांत व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. या देशांत ‘व्हिसा फ्री ट्रॅव्हल’ करता येतो. २८ देशांत तेथे पोहोचल्यावर व्हिसा मिळतो. याला ‘व्हिसा ऑन अरायवल’ असे म्हणतात. प्रवाशांच्या सोयीसाठी ‘ई-व्हिसा’ व ‘इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन्स’ या सोप्या प्रक्रियाही आहेत.

‘इलेक्ट्रॉनिक व्हिसा’ म्हणजेच ‘ई-व्हिसा’ पटकन मिळतो. त्यामुळे भारतीय प्रवासी ‘ई-व्हिसा’चाच मार्ग चोखाळतात. यासाठी घरूनही अर्ज करता येतो. ‘ई-व्हिसा’मुळे त्या देशाच्या दूतावासाच्या कार्यालयात जाऊन पारपत्रावर शिक्का मारून घ्यावा लागत नाही. मध्य-पूर्व, दक्षिण आशिया व आग्नेय आशियात जाणारे भारतीय प्रवासी हल्ली ‘ई-व्हिसा’च घेतात. ‘ई-व्हिसा’चे सध्या प्रमाण ६० टक्के असून, येत्या काळात ते वाढतच जाणार आहे.

‘ई-व्हिसा’ नाकारला जाऊ नये, म्हणून त्याचा अर्ज बरोबर भरावा. तुमची मूळ कागदपत्रे खरी हवीत. तुमच्या कागदपत्रांतील तपशील व ‘ई-व्हिसा’ अर्जातील तपशील यात साम्य हवे. प्रवासाला निघण्याच्या तारखेपूर्वी फार अगोदर ‘ई-व्हिसा’ला अर्ज करावा. कारण, जर ‘ई-व्हिसा’ नाकारला गेला, तर परत अर्ज करावा लागणार. म्हणून प्रवासाला निघण्यापूर्वी बरेच दिवस हातात हवेत. ‘ई-व्हिसा’साठी अर्ज करताना तुम्ही दिलेले कागदोपत्री पुरावे हे खोटे होते, तसेच चुकीची माहिती देणारे होते, असे सिद्ध झाल्यास व या कारणांमुळे ‘ई-व्हिसा’ नाकारला गेला असेल, तर परत अर्ज करता येत नाही. ‘ई-व्हिसा’ तसेच ‘इटीए’ हे नावातील स्पेलिंगच्या चुकीमुळे नामंजूर होण्याचे प्रमाणही जास्त आहे. ‘ई-व्हिसा’ किंवा ‘डिजिटल व्हिसा’साठी तुम्ही कुठूनही अर्ज करू शकता. भारतातून एखाद्याला एका विशिष्ट देशात जाण्यासाठी ‘ई-व्हिसा’साठी अर्ज करावयाचा आहे व अर्ज करताना तो भारतात नसून, वेगळ्याच कोणत्यातरी देशात आहे, अशा वेळीदेखील त्या वेगळ्या देशातून भारतातून ज्या देशात जाणार आहे, त्यासाठी ‘ई-व्हिसा’चा अर्ज करू शकतो.

अर्जासोबत आर्थिक स्थैर्याचा पुरावा, तिकीट, हॉटेल बुकिंगचे पुरावे व पारपत्राचा तपशील ‘ई-व्हिसा’चा अर्ज सादर करताना द्यावा लागतो. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया हे देश व्हिसा अर्जाबरोबर बर्‍याच प्रकारची कागदपत्रेही मागतात.

इटीए

‘इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन’ अर्थात ‘इटीए’ ही प्रक्रिया ‘ई-व्हिसा’ सारखीच आहे. पण, या प्रक्रियेत कागदपत्रे कमी लागतात व प्रक्रिया जलद होते. काही प्रकरणांत ‘इटीए’ अर्ज केल्याबरोबर तत्काळ मिळते. हे नामंजूर होण्याचे प्रमाण कमी असते. ही प्रक्रिया फक्त ऑनलाईनच करता येते. ‘इटीए’मध्ये तुम्ही ज्या देशात जाणार आहात, तो देश तुमच्या येण्याची फक्त नोंद करतो. पण, ‘ई-व्हिसा’ देताना तुम्ही दिलेल्या माहितीची पूर्ण पडताळणी केली जाते आणि सत्यता तपासली जाते. काही देशांत ‘इटीए’साठी शुल्क आकारले जात नाही, तर काही देश आकारतात. भारतीयांना श्रीलंकेत जायचे असेल, तर व्हिसा लागत नाही. पण, ‘इटीए’ लागतो. हा नियम भारतीय पारपत्रधारकांसाठी आहे. भारतीय नागरिकांसाठी येथे ‘इटीए’ विनाशुल्क आहे. यासाठी अर्ज करताना पारपत्र क्रमांक, पारपत्र अमलात आल्याची तारीख, पारपत्राची अंतिम तारीख, श्रीलंकेत जाण्याचे कारण-हेतू व तेथे ज्या हॉटेलमध्ये राहणार, त्या हॉटेलचा तपशील ही माहिती द्यावी लागते. श्रीलंकेत ‘इटीए’च्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत प्रवेश करावा लागतो. ‘इटीए’ मिळण्यासाठी (कोणत्याही देशासाठी) जास्तीत जास्त २४ तास लागतात. भारतीय पारपत्रधारकांना मालदीव व इंडोनेशियात गेल्यावर ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ मिळतो. ‘इटीए’ लागत नाही. इंडोनेशियात पोहोचल्यावर ‘ई-व्हिसा’ही मिळू शकतो. पण, त्यासाठी भारतात असतानाच भारतातून अर्ज करावा लागतो.

भारतीय पारपत्रधारकांना विनाशुल्क
‘ई-व्हिसा’ देणारे देश

मलेशिया (व्हिसाचा कालावधी ३० दिवस), थायलंड (व्हिसाचा कालावधी ६० दिवस), फिजी (व्हिसाचा कालावधी १२० दिवस), मॉरिशस (९० दिवस) व श्रीलंका (३० दिवस).

ई-व्हिसा नामंजूर होऊ नये म्हणून?

अर्ज करण्यापूर्वी यासंबंधीच्या सर्व सूचना सरकारी-इमिग्रेशन पोर्टल्सवर व्यवस्थित वाचून घ्याव्या. ‘ई-व्हिसा’ अर्जाचा तपशील समजून घ्यावा व त्यात खरी व योग्य माहिती द्या. ‘फिड अ‍ॅण्ड लोड’ करण्यात येणारा अर्ज व तुमची कागदपत्रेे यात काही तफावत नाही ना, हे तपासावे. बँक खात्याचा तपशील व खात्यात सतत असलेली शिल्लक याची माहिती घ्या. ज्या देशात जाणार त्या देशाचे नियम पाळा. पारपत्राचा कालावधी पाहा. काही देशांत पहिले नाव आधी लिहितात, तर काही देशांत आडनाव आधी लिहितात; याबाबत त्या देशाचा नियम पाळा.

‘ई-व्हिसा’ची प्रक्रिया

ईमेल मध्ये ‘ई-व्हिसा’च्या अर्जाची डिजिटल कॉपी डाऊनलोड करा. पारपत्रावर व्हिसाचा शिक्का गरजेचा नाही. ही कागदपत्रे अर्जासोबत लोड करा. जायचे व यायचे तिकीट, पारपत्र, कुठे राहणार हॉटेलात की कोणाच्या घरी, कुठे फिरणार, शुल्क असेल तर ते पाठवा.

‘इटीए’ची प्रक्रिया

यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ‘ई-व्हिसा’साठी जी कागदपत्र लोड करावी लागतात, तीच या प्रक्रियेतही लोड करावी लागतात. ‘ई-व्हिसा’ ७२ तासांनंतर मिळू शकतो, तर ‘इटीए’ २४ ते ७२ तासांत मिळू शकते.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.