‘डोन्ट फिअर, सागर इज हिअर’

    25-Dec-2024   
Total Views |
sagar dahimbekar


अपघात आणि दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावून जाणार्‍या कोलाडच्या सागर विलास दहींबेकर या निडर तरुण मुलाविषयी...

दुर्घटना, अपघात यावेळी राबविण्यात येणार्‍या बचावकार्यांमध्ये आवश्यक असते एकाग्रता, निष्ठा आणि समपर्णाची भावना. आपल्याला काय होईल, असा संयमी विचार मनी बाळगून जो कार्यकर्ता हातोटीने बचावकार्य पार पाडतो, तोच या क्षेत्रात काम करु शकतो. रायगडच्या कोलाड, रोहा, माणगाव या भागात शिताफीने बचावकार्य पार पाडणारा असाच एक कार्यकर्ता म्हणजे सागर दहींबेकर. सागरचा जन्म दि. 12 जुलै, 1999 रोजी रायगड जिल्ह्यातील संभे या गावात झाला. ग्रामीण भागात जन्मलेल्या अनेकांचा पहिला सोबती हा निसर्ग असतो. निसर्ग हा घटक दैनंदिन जीवनाचा भाग असल्याने बर्‍याच जणांना त्याविषयी काही वावगे वाटत नाही. मात्र, सागर त्या वावगे वाटणार्‍यांपैकी नव्हता.

आजोबांसोबत बकर्‍यांना रानात चरण्यासाठी घेऊन जाणार्‍या लहानग्या सागरची निसर्गाशी गट्टी जमली. रानात राहणारे वनवासी त्याचे मित्र झाले आणि निसर्गाशी त्याची घट्ट नाळ जोडत गेली. निसर्गाकडे पाहण्याचे अनेकांचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात. त्यामधील सागरचा दृष्टिकोन हा साहस आणि थरार याकडे झुकलेला होता. संरक्षण दलाविषयी त्याच्या मनात प्रचंड कुतूहल होते. संरक्षण दलातील साहस आणि थराराविषयी त्याला विशेष आकर्षण होते. हेच आकर्षण त्याला निसर्गात फिरतानादेखील जाणवायचे. हे आकर्षण पुढे इतके वाढले की, वयाच्या अवघ्या पाचव्या-सहाव्या वर्षीच सागरने साहसी खेळांचे प्रशिक्षण घेण्याचे नक्की केले. त्यासाठीची वाट त्याला कोलाडच्या ’वाईल्ड वेस्ट’ या संस्थेपर्यंत घेऊन गेली आणि तिथे त्याची ओळख झाली महेश सानप यांच्यासोबत. सागरच्या साहसा प्रतीच्या ओढीची वाट सानप यांनी मोकळी करुन दिली आणि ते त्याचे या क्षेत्रातील गुरु ठरले.

सानप यांच्याकडून सागरने साहसी खेळ आणि बचाव कार्यासंबंधीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सोबत पाण्यासंबंधीच्या बचावकार्याचे मार्गदर्शनही सानप यांच्याकडून त्याला मिळत होते. बचावकार्यांचे वेगवेगळे प्रकार, प्रत्येक प्रकारांमध्ये आवश्यक असलेले अंगीभूत कौशल्य, मानसिक स्थैर्याची गरज या बाबींचा उलगडा हळूहळू सागरसमोर होऊ लागला. या काळात त्याने तटकरे महाविद्यालयामधून विज्ञान शाखेतील आपले शिक्षणही पूर्ण केले. साहसाप्रतीच्या त्याच्या आवडीला मूर्त रुप मिळण्यास सुरुवात झाली होती. कारण, कोलाड आणि आसपासच्या परिसरात घडणार्‍या अपघातांंच्या घटनांच्या वेळी बचावकार्य दलासोबत जाण्यास त्याने सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीवांसंदर्भातील बचाव कार्य आणि जनजागृतीचे काम हाती घेण्याची गरज त्याला जाणवली. म्हणूनच त्याने गावागावांमध्ये सर्प जनजागृतीसंदर्भात उपाययोजनांचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली.

कोलाड, माणगाव, महाड या क्षेत्रातील औद्योगिक भागात सातत्याने विविध अपघात घडत असतात. शिवाय सह्याद्रीच्या राकट डोंगररांगांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यातील दर्‍याखोर्‍यांमध्ये अडकणार्‍या लोकांच्या बचावाची संख्याही अधिक आहे. या सगळ्या घटना लक्षात घेऊनच सागरने आपल्या समविचारी साथीदारांच्या मदतीने पाच वर्षांपूर्वी एका संस्थेची स्थापना केली. ’सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था-रायगड’ या नावाने सुरू केलेल्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे ’सेवा परम धर्म.’ या संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष असलेला सागर या संस्थेला घेऊन पुढील वाटचाल करतो आहे. या संस्थेत 25 सदस्य कार्यरत असून तरुण होतकरु महिला आणि पुरुष धरुन 60 स्वयंसेवक मंडळी संस्थेसोबत जोडली गेली आहेत.


संस्थेच्या निर्मितीमुळे रायगड जिल्ह्यात बचावकार्यासंबंधी निपुण पद्धतीने काम करणारी एक टीम निर्माण झाली आहे. संस्थेच्या माध्यमातून रस्ते अपघात, आगीच्या घटना, नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, वन्यजीव बचाव आणि जनजागृती अशा विविध घटनांमध्ये बचावाचे काम केले जाते. सागर अशा प्रकारच्या घटनांमध्ये हिरिरीने सहभाग घेतो. काहीवेळा हे प्रसंग जीवावर बेतणारे असतात. मात्र, बचावकार्याच्या नियमांचे तंतोतत पालन करणारा सागर या सर्व प्रसंगांना कौशल्यपूर्णतेने सामोरा जातो. रायगड जिल्ह्याच्या डोंगररांगांमध्ये पावसाळ्यात दर्‍याखोर्‍यांमध्ये अडकणार्‍या लोकांच्या बचावाचे कार्य तसे जिकरीचेच. असते. कारण, खोल दर्‍यांमध्ये उतरून अडकलेली जीवंत माणसं किंवा मृतदेहांना वर आणावे लागते. अशा कामांमध्ये सागरचा हातखंडा आहे. यंदाच्या पावसाळ्यात देवकुंड आणि कुंभे धबधब्यात पडून मृत पावलेल्या पर्यटकांचे मृतदेह दरीबाहेर काढण्याची साहसी कामागिरी सागर आणि टीमने खुबीने पार पाडली. महाडच्या पुरातून देखील सागर आणि टीमने 800 माणसांना जीवनदान देण्याचे काम केले होते.
 
वन्यजीव बचाव आणि वनसंरक्षणासाठी देखील सागर कसोशीने प्रयत्न करत आहे. संस्थेमार्फत ’अरण्य अपदव’ ही संकल्पना राबवून वनवणव्यांवर नियंत्रण मिळविण्याचे काम सागरी आणि त्याची टीम करते. यामार्फत 1 हजार 200 वणवे विझवण्याचे काम संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अशा परिसरातील वन्यजीवांच्या बचावाचे काम देखील टीमकडून केले जाते.
 
सागरचे हे काम रायगड जिल्ह्यासाठी पथदर्शी स्वरुपाचे आहे. त्याच्या या कामात असंख्य लोकांचे योगदान आहे. जिल्ह्याचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा संस्थेच्या पाठीशी आहे. शिवाय ’सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थे’ची कणकर टीमदेखील सागरच्या पाठीशी उभी असते. कोणत्याही मोबदल्याचा विचार मनी न बाळगता माणसातले देवत्व ओळखून संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसासाठी धावणार्‍या सागरसारख्या होतकरू तरुणांची आज समाजाला गरज आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.