मतदारांच्या नोंदणीविषयीच्या महाराष्ट्र काँग्रेसच्या दाव्यात तथ्य नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचे काँग्रेसला ६६ पानांचे उत्तर

    24-Dec-2024
Total Views |

eci
 
नवी दिल्ली : (Election Commission of India) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदानाबाबतचे गैरसमज दूर केले आहेत. काँग्रेस पक्षाला दिलेल्या सविस्तर प्रतिसादात आयोगाने मतदारांची नोंदणी अथवा नावे हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
 
मतदारांची अनियंत्रित भर घालण्याच्या किंवा हटवण्याच्या काँग्रेसच्या आरोपांवर आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाने म्हटले की, महाराष्ट्रात कोणतीही अनियंत्रित वाढ होणे किंवा नावे हटविण्याचा प्रकार घडलेला नाही. त्याचप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ५० विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ५०००० मतदारांची भर पडली आणि त्यापैकी ४७ जागा महायुतीने जिंकल्या आहेत, ही तक्रारही वस्तुस्थितीनुसार चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. कारण, केवळ सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५० हजार मतदारांची भर पडली. मात्र, या आधारावर ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे मतदारांच्या नोंदणीची आणि नावे हटविण्याची प्रक्रिया टप्प्यावर राजकीय पक्षांच्या पूर्ण सहभागासह काटेकोरपणे केली जात असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.
 
महाराष्ट्रात मतदार यादीतून नावे हटविण्याचा विशिष्ट पॅटर्न दिसून आल्याचाही आरोप आयोगाने फेटाळला आहे. राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे हटविण्याचा प्रकार आढळून आलेला नाही. काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींच्या सहभागासह योग्य प्रक्रियेनंतर मृत्यू अथवा हस्तांतरण आणि डुप्लिकेट नोंदीमुळे प्रति विधानसभा मतदारसंघातील सरासरी २ हजार ७७९ मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत, असे आयोगाने पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने मागणी केल्यानुसार, महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांशी संबंधित सर्व डेटा आणि फॉर्म २० आयोगाच्या महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो डाउनलोड केला जाऊ शकतो, असेही आयोगाने म्हटले आहे.
 
काँग्रेस पक्षाला लिहिलेल्या पत्रात आयोगाने हे देखील स्पष्ट केले आहे की सायंकाळी ५ ते रात्री ११.४५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढणे हे मतदानाच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून कसे सामान्य आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पुष्टी केली की वास्तविक मतदान बदलणे अशक्य आहे. कारण फॉर्म १७ सी मतदान केंद्रावर मतदान संपण्याच्या वेळी उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे मतदार मतदानाचा तपशील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या मतदानाच्या प्रत्येक प्राथमिक भागाची माहिती, तपशीलवार नोट आणि एफएक्यूदेखील जारी केले आहेत, असेही आयोगाने म्हटले आहे.