रोजगार मेळ्यात मोदींकडून ७१ हजारहून अधिक नेमणूकपत्रांचे वाटप

    23-Dec-2024
Total Views |

pm rojgar

नवी दिल्ली (PM Rojgar Mela): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ डिसेंबरच्या सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नवीन भरती झालेल्या ७१ हजार नेमणूक पत्रांचे वितरण केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी रोजगाराच्या नवीन संधीबद्दल तरूणांशी संवाद साधला. रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना देशाच्या विकासासाठी, आणि तरूणांना चांगल्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. देशभरात एकूण ४५ ठिकाणी हा मेळावा, पार पाडला, ज्यामध्ये विविध मंत्रालयांच्या विभागांमध्ये नवीन नियुक्ती केल्या गेल्या. रोजगार मेळाव्याच्या अंर्तगत गृह मंत्रालय, पोस्ट विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग अशा विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. या रोजगार मेळाव्यामुळे सरकारी क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. गेल्या वर्षी रोजगार मेळाव्यात ५१ हजार तरूणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले होते.
 
भारताचा तरूण नवा आत्मविश्वास घेऊन जगतोय! 
माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की "आज या देशातला तरूण नवा आत्मविश्वास घेऊन जगतोय. प्रत्येक क्षेत्रात तो उत्कृष्ट कामगिरी बजावतोय. त्यांच्या प्रतिभेला वाव देणे हे सरकारचे काम आहे. आज आपल्या सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भारतातही रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने विमा सखी योजना सुरू केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षणाशी जोडणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील."