मागील काही दिवसांपासून ‘नेहरुंची पत्रे’ हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, देशाचे प्रथम पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांची पत्रे पंतप्रधान संग्रहालयाकडे नसून, ती सोनिया गांधींच्या ताब्यात आहेत. त्यामुळे असे या पत्रांमध्ये नेमके काय आहे? ती पत्रे सार्वजनिक होऊ नये, म्हणून हा सगळा खटाटोप आहे का? यांसारख्या प्रश्नांचा शोध घेणारा हा लेख...
देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित उपाख्य चाचाजी जवाहरलाल नेहरू आणि पत्रे, यांचा अतिशय निकटचा संबंध. अर्थात, त्या काळात संपर्कासाठी पत्र हाच मुख्य मार्ग उपलब्ध होता. त्यामुळे त्या काळातील सर्वसामान्य नागरिक असोत की, नेतेमंडळी असो, सर्वच जण पत्रे लिहीत असत आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी आणि देशाचे प्रथम पंतप्रधान या नात्याने तर पं. नेहरूंनी अगणित पत्रे लिहिली असणार. त्यातील बहुतांशी पत्रे ही तर त्या काळातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकणारी असतील, काही अन्य देशांतील नेत्यांना लिहिलेली असतीस, काही देशांतील नेत्यांना लिहिलेली असतील, तर काही अगदी वैयक्तिकही असतील. त्यामुळे पं. नेहरू आणि पत्रे हा देशासाठी महत्त्वाचा विषय असून, त्यावर कोणते एक कुटुंब हक्क सांगूच शकत नाही. मात्र, सध्या तसाच काहीसा प्रकार घडला आहे.
पं. नेहरू आणि पत्रे याविषयी देशातील फार मोठे पत्रकार आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयामध्ये उच्चायुक्त असलेले दिवंगत कुलदीप नैयर यांनी त्यांच्या एका पुस्तकात याच पत्रांचा मोठा रंजक किस्सा सांगितला आहे. नैयरसाहेब म्हणतात, “नेहरू पर एडविना माउंटबेटन के प्रभाव की जाँच-पडताल में मेरी दिलचस्पी आगे चलकर भी बनी रही। 1990 में लन्दन में भारत के हाई कमिशनर के रूप में अपनी नियुक्ती के दौरान मैंने बिखरे हुए सूत्रों को समेटने की कोशिश की। मुझे पता चला कि एयर इंडिया की उडानें हर दिन नेहरू का एक पत्र लेकर लन्दन जाती थी, जिसे वहा का हाई कमिशन बडी तत्परता से लेडी माऊंटबेटन तक पहुंचा देता था। कमिशन हर दिन एडविना से उनका जवाब भी ले आता था, जिसे नेहरू को भेज दिया जाता था। जब कभी एडविना का पत्र पहुँचने में देर हो जाती तो नेहरू अधिकारियों पर जमकर बरसते थे।” (संदर्भ-एक जिन्दगी काफी नहीं-आजादी से आज तक के भारत की अन्दरूनी कहानी, पृष्ठ क्रमांक-69.) आता खास विमानाने ही पत्रे पाठविली जात असल्यास या पत्रव्यवहारामध्ये नक्कीच देशहिताचे अथवा आंतरराष्ट्रीय हिताचेच काहीतरी असणार, असे मानण्यास हरकत नसावी. कारण, देशाच्या पंतप्रधानपदी असलेला व्यक्ती काही शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी, तर विमानाद्वारे पत्रे पाठवणार नाही. असो.
तर सध्या पं. जवाहरलाल नेहरूंची अशी अनेक पत्रे आज 51 पेट्यांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पडून आहेत. या पेट्यांमध्ये सुमारे 2.80 लाख पानांची कागदपत्रे आहेत. ही सर्व पत्रे जवाहरलाल नेहरूंची वैयक्तिक पत्रे आहेत, जी त्यांनी एडविना माऊंटबॅटन, अल्बर्ट आइनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद बल्लभ पंत यांसारख्या व्यक्तिमत्त्वांना लिहिलेली आहेत. या 51 पेट्यांमध्ये भारताच्या इतिहासाशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्यासाठी, ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालया’ने (पीएमएमएल) दि. 10 डिसेंबर 2024 रोजी राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी सोनिया गांधींना या 51 पेट्यांमधील पत्रे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाला परत करण्यासाठी सांगावे. ‘पीएमएमएल’ने राहुल गांधींना पत्र, दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले होते. मात्र, या पत्राला सोनिया गांधींनी प्रतिसाद न दिल्याने ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय मंडळा’चे सदस्य आणि सुप्रसिद्ध इतिहासकार रिजवान कादरी यांनी हे पत्र लिहिले आहे. राहुल गांधी हे सोनिया गांधी यांचे पुत्र आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते असले, तरी या दोन्ही कारणांमुळे त्यांना हे पत्र लिहिले गेले नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सर्व पत्रांचे आणि कागदपत्रांचे राहुल गांधी हे वारसदार असल्यामुळे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या मंडळाने त्यांना हे पत्र लिहिले आहे.
सध्या गांधी कुटुंबाच्या प्रमुख असल्याने या सर्व कागदपत्रांच्या संरक्षक सोनिया गांधी आहेत. ही पत्रे आणि दस्तऐवजांचे संरक्षक म्हणून सोनिया गांधी यांनी सहकारी एमव्ही राजन यांना नेहरू संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या अधिकार्यांना भेटण्यास सांगितले होते. मार्च 2008 साली त्यांना अधिकारपत्र देऊन पं. नेहरूंची वैयक्तिक पत्रे आणि कागदपत्रे देण्यास सांगितले होते. मार्च ते मे दरम्यान सुमारे दोन महिने ही कागदपत्रे 51 पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये वर्गवारी करून ठेवण्यात आली. संग्रहालयाच्या तत्कालीन संचालकांनी दि. 10 मे 200 रोजी या सर्व पेट्यांची वाहतूक करण्यास परवानगी दिली. राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात रिझवान कादरी यांनी या सर्व घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व पत्रे इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय ठेव्याच्या स्वरुपात तेव्हाच्या नेहरू संग्रहालयास दान स्वरूपात दिली होती. त्यामुळे अशाप्रकारे दान केलेली पत्रे गांधी कुटुंबाने आपल्या ताब्यात ठेवणे योग्य नाही.
अर्थात, ही बाब गांधी कुटुंबास माहीत नसेल, असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळेच ही पत्रे संग्रहालयास परत न करण्यामागे असे कोणते कारण असेल, याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण, या पत्रांमध्ये तत्कालीन अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा उल्लेख असणार यात शंका नाही. कारण, तो काळच मोठा धामधुमीचा होता. देशाची फाळणी, भारताचे स्वातंत्र्य, संस्थानांचे एकीकरण, पाकचा हल्ला, संविधानाची निर्मिती, पहिली निवडणूक, पहिले मंत्रिमंडळ, भारताचे तत्कालीन परराष्ट्र संबंध, चिनी आक्रमण या आणि अशा अनेक घटनांचे प्रतिबिंब या पत्रव्यवहारात असणार. त्याचवेळी या पत्रव्यवहारातून पं. नेहरूंच्या धोरणाचे मूल्यमापनही करता येणार आहे. मात्र, हेच मूल्यमापन गांधी कुटुंबास नको आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बेछुट आरोप करणारे गांधी कुटुंब देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा पत्रव्यवहार असा लपवून ठेवत असेल, तर ते देशासाठी नक्कीच भूषणावह नाही.