भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावरील मसाली गावाला 'सौर गाव' होण्याचा मान
21-Dec-2024
Total Views |
गांधीनगर : गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील मसाली हे गाव ( Solar Village ) सीमावर्ती भागातील सर्वात पहिले 'सौर गाव' ठरले आहे. एकूण ८०० लोकसंख्या असलेले हे मसाली गाव पाकिस्तान सीमेपासून निव्वळ ४० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. मसाली या गावाने १०० टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव म्हणून आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत १.१६ कोटी रुपये खर्च करुन मसाली गावातील प्रत्येक घरावर सौरपॅनल बसवण्यात आले आहेत. मसालीतील ११९ घरे २२५ किलोवॅटहून अधिक वीज निर्मिती करत आहेत. ही वीज निर्मिती प्रत्येक घराच्या गरजेपेक्षा जास्त आहे. महसूल विभाग, UGVCL, बॅंक आणि सोलार कंपनी यांच्या सहकार्याने १.१६ कोटीचा संपुर्ण प्रकल्प पुर्ण झाला आहे. या प्रकल्पाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ५९.८१ लाख अनुदान मिळाले आहे. तसेच २०.५२ लाख सार्वजनिक तर ३५.६७ लाख CSR प्राप्त झाले आहेत.
डीसी मिहिर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सीमेवर वसलेल्या गावांमध्ये २४ तास वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एक समिती स्थापन करण्यात आली होती. सारधी वाव तालुक्यातील ११ गावे व सुइगाम तालुक्यातील ६ गावे अशी एकूण १७ गावे सौरऊर्जेवर चालणारी केंद्रे बनवण्याची ही योजना होती. मिहिर पटेल यांच्या माहितीनुसार मसाली हे राज्यातील दुसरे तर, सीमावर्ती भागातील पहिले 'सौर गाव' म्हणून ओळखले जात आहे. ही अभिमानास्पद बाब आहे असे मिहिर पटेल यांनी व्यक्त केले आहे.
सौरऊर्जेमुळे गावातील वीजेच्या समस्येचे पुर्णपणे निवारण झाले असल्याचे मसाली गावचे सरपंच मगनीराम रावल व ग्रामस्थांनी सांगितले आहे.