'Christmas Market'मध्ये कार घुसवत डॉक्टरने लोकांना चिरडले!
दोघांचा मृत्यू, ६० हून अधिक जखमी
21-Dec-2024
Total Views |
बर्लिन : (Germany christmas market) जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये एक भीषण अपघात झाला असून हा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या अपघातात ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. आरोपी ड्रायव्हर डॉक्टर असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यात सहभागी असलेला ५० वर्षीय संशयित ड्रायव्हर एकटाच होता. ख्रिसमस मार्केटमध्ये गजबजलेल्या भागात त्याने वेगाने गाडी घुसवून अनेकांना यात चिरडले. ड्रायव्हर मूळचा सौदी अरेबियाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. जर्मन पोलिसांनी संबंधित गाडीमध्ये स्फोटके असू शकतात अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त केली होती, परंतु तपासात काहीही निष्पन्न झाले नाही. हल्ला करणारा डॉक्टर जवळपास दोन दशकांपासून जर्मनीत राहत होता. तो जर्मनीचा कायमचा रहिवासी आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने या अपघाताचा निषेध केला आहे.
आठ वर्षांपूर्वी असाच अपघात झाल्याची नोंद
आठ वर्षांपूर्वी, बर्लिनमधील ख्रिसमस मार्केटमध्ये असाच एक अपघात झाला होता, जेव्हा ट्रकने १२ लोकांचा बळी घेतला होता. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध करत जर्मन लोकांशी एकता व्यक्त केली होती.