भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठेल!
डॉ. मोहनजी भागवत यांचा विश्वास
20-Dec-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sarsanghachalak Vishwaguru Bharat) "सर्व प्रकारची साधनसंपत्ती उपलब्ध असूनही जगात शांती नाही, म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. तो गुरू भारतच व्हावा ही जगाची अपेक्षा आहे. यासाठी भारतीयांना आपल्या गुणांचा किमान स्तर निर्माण करून तसे आचरण करावे लागेल. असे केल्यास विश्व गुरूचे स्थान आपण येत्या २० वर्षात गाठू शकू", असा विश्र्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला.
पुणे येथील तुळशीबागवाले कॉलनीत गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते 'विश्वगुरू भारत' या विषयवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे हे २३ वे वर्ष आहे. ग्लोबल स्ट्रॅटेजीक पॉलिसी फाऊंडेशनचे डॉ. अनंत भागवत यांनी सरसंघचालकांचे यावेळी स्वागत केले.
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, गेल्या काही वर्षापासून भारताची भौतिक प्रगती गतीने सुरू आहे. त्याबरोबरच नैतिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे. असे झाल्यास स्वामी विवेकानंदांनी विश्व गुरू भारताचे जे स्वप्न पाहिले ते आपल्याला प्रत्यक्षात आलेले पाहता येईल. आपल्या देशाने निर्माण केलेले संविधान आणि त्यानुसार आचरण होणे अत्यंत महत्वाचे आहे. संविधानाला धरून प्रामाणिकपणे वाटचाल व्हावी. संविधानाची मार्गदर्शक तत्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचरण केले गेले पाहिजे. या कर्तव्यांची समाजात व घरात देखील चर्चा होणे अपेक्षित आहे.
"आपले राष्ट्र परोपकाराकरिता निर्माण झाले आहे. परंपरा शाश्वत आहे. आमचेच खरे असे म्हणणारे आपण नाही. आपण सर्वाविषयी श्रद्धा ठेवणारे आहोत. पण म्हणून आमच्या देवतांवर आक्रमण करून अरेरावी करून कोणी मतांतरण करणार असेल तर ते चालणार नाही", असे स्पष्ट मत सरसंघचालकांनी यावेळी व्यक्त केले.