मुंबई, दि.२ : विशेष प्रतिनिधी राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत देत राज्याच्या विकासाला आपली पसंती दर्शविली. हे पाहता केंद्र सरकारकडून राज्यभरात विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ आगामी काळात रोवली जाणार आहे. आठवडाभरात कोट्यवधींचे रेल्वे आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना देणारे प्रकल्प केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आले आहे.
देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी २३ राज्यांकडून प्रस्ताव मागविले होते. एकूण प्राप्त प्रस्तावांपैकी २३ राज्यांमधील ४० प्रकल्पांना विशेष साहाय्य योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक व सिंधुदुर्ग या दोन शहरांचा प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्गसाठी ४६.१६ कोटी रुपये तर नाशिकसाठी ९९.१४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
‘रामकाल' पथ प्रकल्पात महत्त्वाचे
- सीता गुंफा ते श्री काळाराम मंदिर सुशोभीकरण
- श्री काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचे सौंदर्यीकरण
- अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधी तलाव, रामकुंड भागात सौंदर्यीकरण
- गांधी तलाव व रामकुंड परिसरात प्रभू श्रीरामाची धनुर्धारी भव्य प्रतिकृती
- टाळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे, शिल्प, स्तंभ, विद्युत रोषणाई
पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गात
सिंधुदुर्गमध्ये अंडर वॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रिफ आणि पाणबुडी पर्यटनासाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात समुद्री पर्यटन विकासासाठी पाणबुडी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, चार पाच वर्षात याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नव्हती. प्रकल्प होण्यासाठी हालचाली झाल्या नव्हत्या. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकाटिपणी करून राजकीय रंग देण्यात आला होता. मात्र केंद्र सरकारने ४६.१६ कोटी रुपये मंजूर करून हा प्रकल्प जिल्ह्यातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईसाठी ३०० लोकल गाड्या तर वसईत मेगा टर्मिनल
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना दिलेल्या मंजुरीची माहिती दिली. जळगाव-मनमाड चौथी लाईन , भुसावळ-खंडवा तिसरी आणि चौथी लाईन आणि माणिकपूर-इरादतगंज तिसरी लाईन यांचा यात समावेश आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधा सुधारणे, मध्य प्रदेशशी संपर्क वाढवणे आणि मुंबई- प्रयागराज - वाराणसी कॉरिडॉर मजबूत करणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर बांधण्यात येईल. मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल उभारण्यात येतील. तर मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत ३०० अतिरिक्त गाड्या जोडल्या जाणार आहेत.