सामान्यांना असामान्य घडवणारे संघटन म्हणजे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' : डॉ. नीलम गोऱ्हे

    19-Dec-2024
Total Views |

Neelam Gorhe at Reshimbagh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Neelam Gorhe on RSS) 
"सामान्यांना असामान्य घडवणारे संघटन म्हणजे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाने नेहमी राष्ट्रासाठी काम केले आहे. हिंदुत्त्वाचा विचार करणारे संघटन म्हणजे संघ.", असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. नागपुर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग कार्यालयास भेट दिली. यावेळी सर्व आमदारांनी आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. संघाच्या प्रचारकांनी आमदारांना बौद्धिक मार्गदर्शनही केले.

हे वाचलंत का? : 'संघ स्वयंसेवकांसमोर डॉ. आंबेडकरांचे बौद्धिक'; डॉ. मोहनजी भागवतांनी उलगडले अविस्मरणीय किस्से

डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, "बाळासाहेब आणि संघाचे विचार सारखे होते. आम्हाला इथे आल्यानंतर कुठेही वेगळ्या ठिकाणी आलो असं जाणवत नाही. “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम” माझं स्वतःचं काही नाही, राष्ट्रासाठी आमचं आयुष्य समर्पित आहे. ही संघाची विचारसरणी आहे. अनेक वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना संघ कशाप्रकारे गुणवत्ता वाढवण्याची दिशा देतो, याचे उदाहरण या ठिकाणी मिळाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण सांगितलं होतं. इथेही अशाच प्रकारची सामाजिक भूमिका सांगितलेली आहे आणि त्यामुळे इथे आल्यावर प्रेरित आणि उत्साही वाटलं."