लीपिन्स या देशाच्या मेरी जेन फिएस्टा वेलोसोला इंडोनेशियामध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, तब्बल 15 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर तिची मृत्युदंडाची शिक्षा रद्द झाली. इंडोनेशिया आणि फिलीपिन्स या दोन देशांतर्गत ही घटना मानवी तस्करीचे बळी गेलेल्या जगभरातल्या दुर्बलांचे प्रतिनिधित्व करते.
फिलीपिन्स देशाची मेरी वेलोसोला ही एकल पालक होती. तिला दोन मुले. गरिबीमुळे मुलांचे भरणभोषण कसे करायचे, या विचारात ती होती. तिने कसेबसे पैसे जमवले आणि एंजटमार्फत तिने दुबईला जायचे ठरले. दुबईला घरकाम करण्याचे काम आहे, असे तिला सांगण्यात आले. 2010 सालापूर्वीची ही घटना. ती मोलकरीण म्हणून तिथे गेली होती, मात्र तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. तिच्यावरच्या अत्याचाराची दाद कुणाकडे मागणार? शेवटी ती कशीबशी प्रदीर्घ प्रयत्न करून दुबईहून फिलीपिन्सला आली. दुबईहून ती रिकाम्या हाताने आणि दुःखी मनाने परतली.
फिलीपिन्समध्ये ती पुन्हा छोटी-मोठी कामे करू लागली. तिला एके दिवशी कळले की, फिलीपिन्समधीलच मारिया क्रिस्टीनो सार्जियो ही गरीब महिलांना परदेशात रोजगार मिळवून देते. सार्जियोमार्फत बाहेरगावी गेलेल्या महिलांनी तिला खात्री दिली की, त्या सार्जियोमार्फत परदेशात चांगले काम करत आहेत. वेलोसेने सार्जियोशी संपर्क केला. वेलोसेला आता आखाती देशात जायचे नव्हते. सार्जियोने वेलोसेला मलेशियामध्ये नोकरी देणार, असे सांगितले. वेलोसे मलेशियाला गेली. मात्र, तिथे गेल्यावर कळले की, तिथे तिच्यासाठी नोकरी उपलब्ध नव्हती. सार्जियोने तिला परत फिलीपिन्सला सुखरुप परत आणले. सार्जियो प्रामाणिक महिला आहे, असे वेलोसेला वाटले. पुढे 2010 साली सार्जियोने वेलोसेला सांगितले की, ती इंडोनेशियाला फिरायला जात आहे. वेलोसे तिच्यासोबत आली तर मैत्रीण म्हणून सगळा खर्च सार्जियो करेल, तसेच इंडोनेशियामध्ये नोकरी मिळवण्याचाही प्रयत्न करता येईल, असे तिने आश्वासन दिले. वेलोसेला नोकरीची गरज होती आणि सार्जियोवर तिचा विश्वास होता. ती सार्जियोबरोबर इंडोनेशियाला गेली. मात्र, विमानतळावर सुरक्षा तपासणी करताना सुरक्षारक्षकांना वेलोसेच्या बॅगमध्ये करोडो रुपयाचे 2.6 किलोग्रॅम हेरॉईन सापडले. इंडोनेशियामध्ये वेलोसेला अटक झाली. पुढे 2015 साली तिला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. मात्र, वेलोसेच्या म्हणण्यानुसार ती बॅग सॉर्जियोने तिला दिली होती. तिच्या खुलाशाचा काही उपयोग झाला नाही.
दरम्यान फिलीपिन्सची जनता वेलोसेला न्याय मिळावा म्हणून एकवटली. कारण, फिलीपिन्समधल्या लाखो महिला परदेशात अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या बळी गेल्या होत्या. जनआक्रोशाचा धसका घेऊन फिलीपिन्स सत्ताधार्यांनी इंडोेनेशियाकडे वेलोसेच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. वेलोसेचे नशीब बलवत्तर की फिलीपिन्समध्ये मानवी तस्करी गुन्ह्यांसदर्भात सार्जियोला अटक झाली. वेलोसेला तिने फसवले हे सिद्ध झाले आणि वेलोसेची सुटका झाली.
या अनुषंगाने काल-परवाच्या घटना पाहूया. नुकतेच मुंबईची हमिदा पाकिस्तानहून 22 वर्षांनी परत आली. दुबईला काम मिळवून देतो, असे एजंटने तिला सांगितले. मात्र, त्याने तिला पाकिस्तानमध्ये सोडून दिले होते. तिथे तिला खूप काही भोगावे लागले. पण, 22 वर्षांनंतर ती केंद्र सरकारच्या कृपेमुळे भारतात परतली. काल-परवाच ओमान मस्कतवरून पंजाबच्या सात महिलांची सुटका करण्यात आली. ओमानला या; चांगले काम आहे, असे या सात महिलांना त्यांच्या परिचित महिलेने सांगितले होते. त्यामुळे त्या एजंटमार्फत तिथे गेल्या. तिथे गेल्यावर त्यांना कळले की, गुलामीसाठी त्यांना तिथे आणले गेले होते. ज्या महिलेने त्यांना तिथे बोलावले होते, त्या महिलेला असेच फसवून तिथे आणले गेले होते. तुझ्या ओळखीच्या आणखीन बाल, युवती आणि महिलांना इथे बोलवून घे, असे तिला सांगण्यात आले होते. तसे केले नाही, तर तिच्यावर दररोज अमानुष अत्याचार होत होते. त्यामुळे तिने या महिलांना फसवून तिथे बोलावले होते. भयंकर! आखाती देशांत नोकरीच्या आमिषाने गेलेल्या लोकांचे पुढे काय होते, याचा मागोवा घेतला तर? तर आखाती देशांतील आधुनिक गुलामीचे अत्यंत दुःखद आणि संतापजनक वास्तव उघड होईल. मानवी तस्करीने जगभराचा नकाशा काळवंडला आहे. वेलोसेच्या सुटकेच्या निमित्ताने हा भयाण चेहरा पुन्हा उघड झाला, इतकेच.