मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Eknath Shinde at Reshimbagh) "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे हे संघ परिवाराकडून शिकावं. संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही.", अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नागपूर येथे सुरु असललेल्या महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन त्यांनी गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदेंनी दरम्यान संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार व संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीसही अभिवादन केले. पुढे ते म्हणाले, " संघाच्या शाखेतूनच माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांची शिकवण त्यात जोडली गेली. कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करत असतो. देशभरात संघाच्या लाखो शाखा आहेत. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत, हे विशेष आहे. एखादी संस्था सुरु होऊन १०० वर्ष देशाच्या उभारणीत कार्यरत आहे. राष्ट्रसेवेत असलेले संघाचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही."
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा संघ स्वयंसेवक आहेत, ते पुन्हा मुख्यमंत्री झाले याचा मला आनंद आहे. याठिकाणी आल्यावर एक विशेष प्रेरणा, ऊर्जा मिळते. जो खऱ्या अर्थाने निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणारा आहे, त्याने एकदातरी याठिकाणी यावे आणि प्रेरणा घेऊन जावी.", असे म्हणत एकनाथ शिंदेंनी रेशिमबागेतील आपला अनुभव व्यक्त केला.