सुधीर रसाळ यांच्या ’विंदांचे गद्यरुप’ला साहित्य अकादमी पुरस्कार
18-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ ( Sudhir Rasal ) यांना ’विंदांचे गद्यरुप’ पुस्तकासाठी यंदा हा जाहीर झाला आहे. आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
प्रतिष्ठेचा समजला जाणार्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने २० भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात मराठीत ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीने २१ भाषांमध्ये ८ काव्यंसग्रह, तीन कादंबरी, २ लघुकथा संग्रह, ३ साहित्य समीक्षक,१ नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार दिला. बंगाली, डोगरी आणि उर्दू भाषेसाठीचे पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. दि. ८ मार्च २०२५ रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
इतर भाषांसाठी पुरस्कार जाहीर
आसामी भाषेत समीर तांती, बोडो- अरोन राजा, इंग्लिश -इस्टरिन किरे, गुजराती- दिलीप झवेरी, हिंदी- गगन गिल , कन्नड- के.व्ही. नारायण, काश्मिरी-सोहन कौल, कोंकणी-मुकेश थली, मैथिली- महेंद्र मलांगिया, मल्याळम- जयकुमार, मणिपूरी- हाओबम सत्यवती देवी, मराठी-सुधीर रसाळ, नेपाळी- युवा बराल, ओडिया- वैष्णव चरण समल, पंजाबी- पॉल कौर, राजस्थानी-मुकुट मनिराज, संस्कृत- दीपक कुमार शर्मा, संथाळी- महेश्वर सोरेन, सिंधी- हुंदराज बलवानी, तामिळ - एआर व्यंकटचलपथी, तेलुगु - पेनुगौंडा लक्ष्मीनारायण यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुधीर रसाळ यांची ओळख
डॉ. सुधीर रसाळ यांना ’विंदांचे गद्यरूप’ या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ हे ९१ वर्षांचे असून या वयातही अलिकडेच त्यांच्या १६ व्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी शासकीय कला महाविद्यालय आणि मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे.