"पक्षाशी गद्दारी व कृतघ्नता याला माफी नाहीच", मोहिते-पाटलांना भाजपच्या नोटीशीनंतर राम सातपुतेंनी मानले आभार
17-Dec-2024
Total Views |
सोलापूर : (Ram Satpute) भाजपशी विश्वासघात करणाऱ्या रणजितसिंह मोहिते-पाटलांवर कारवाईचा बडगा उचलल्याबद्दल भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी महाराष्ट्र भाजपचे आभार मानले आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून पक्षविरोधी भूमिकेबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
"भाजपच्या माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दिलेल्या धमक्या याची दखल पक्षाने घेतल्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठींचे आभारी आहोत. पक्षाशी गद्दारी व कृतघ्नता याला माफी नाहीच" असेही सातपुते म्हणाले आहेत.
मोहिते पाटलांच्या पक्षविरोधी कामांमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये माढा तर विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरस येथील भाजप उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याने त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत पक्षाने आता मोहिते पाटलांना ही नोटीस पाठवली आहे. तसेच काही स्पष्टीकरण असल्यास ते पुढील सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यानावे ही नोटीस बजावण्यात आली आहे.