‘कोविड’मध्ये लागलेल्या ‘लॉकडाऊन’ने अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले. परिणामी रोजगार बुडाला. एकीकडे महामारीचे संकट, तर दुसरीकडे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. होत्याचे नव्हते झाले. अशात अनेक सामाजिक संस्थांना घरघर लागून त्याही नामशेष झाल्या. पण, अशा संकटकाळातही शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाचा संकल्प ठेवून उदयाला आलेली ‘अनुनाद फाऊंडेशन’ ही संस्था गरजूंसाठी एक संजीवनी ठरली आहे. या संस्थेविषयी...
नुनाद फाऊंडेशन’ ही संस्था शैक्षणिक आणि ग्रामीण समृद्धी हे उद्दिष्ट समोर ठेवून 2021 साली स्थापन करण्यात आली. ज्या काळात जागतिक महामारीने अनेक संस्था बंद पडत होत्या, त्या काळात ‘अनुनाद’ची स्थापना झाली. साहजिकच सुरुवातीच्या दिवसांत परिस्थितीशी सुसंगत असे उपक्रम ‘अनुनाद’ने केले. ‘अनुनाद’ने ‘कोरोना’संदर्भात ऑनलाईन जागृती कार्यक्रम सुरू केले. कोरोना काळात शैक्षणिक पद्धतीत झालेले बदल लक्षात घेऊन रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांतील 77 शाळांना ई-लर्निंग किट देण्यात आले आहेत. तसेच, खंडाळा तालुक्यातील काही शाळांना बाक संस्थेने दिले आहेत. याच भागात संस्थेकडून विद्यार्थ्यांना वह्यावाटपही करण्यात आले आहे. ‘अनुनाद’तर्फे काही शाळांना वैज्ञानिक उपकरणे देऊन त्या प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. काही शाळांच्या मागणीनुसार त्यांना क्रीडासाहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोकणच्या नकाशावर शोधूनही सापडणार नाही असे गाव म्हणजे ‘किरबेट’. या ठिकाणी माध्यमिक शाळेशाळेच्या प्रत्येक वर्गखोलीत ट्यूबलाईट आणि पंख्यांची सोय संस्थेने केली. पुढे याच शाळेला कॅरम, गोळा, थाळी, बुद्धिबळ असे क्रीडासाहित्यही संस्थेकडून देण्यात आले.
ग्रामीण भागातील महिला उद्योजक या अनेक समस्यांना सामोर्या जात असतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेतर्फे संगमेश्वर तालुक्यात देवरुख इथे महिला उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. बचतगटांच्या महिलांनी त्या शिबिरात मोठा सहभाग घेतला आणि मार्गदर्शन मिळवले.
शाळेच्या भौतिक गरजांपेक्षाही आवश्यक आहे, ती विद्यार्थ्यांची मानसिक आणि वैचारिक गरज. ती लक्षात घेऊन ‘अनुनाद’तर्फे काही वेगळे उपक्रम काही शाळांमध्ये राबविण्यात आले. साखरपा (ता. संगमेश्वर) येथील शाळेत मूल्यशिक्षणाचा उपक्रम संस्थेतर्फे दोन वर्षे राबविण्यात आला. भविष्यात साखरपा या गावात एक स्वतंत्र वाचनालय संस्थेतर्फे सुरू करण्याचा मानस आहे.
विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण सुप्तावस्थेत असतात. त्यांना त्यांची ओळख करून दिल्यास ते प्रकर्षाने पुढे येतात. हाच विचार लक्षात घेऊन गेल्या शैक्षणिक वर्षात साखरपा येथे ‘आकार’ या कला कार्यशाळेचे आयोजन ‘अनुनाद’ने केले होते. यात मातीच्या मूर्ती करणे, कॅनव्हास पेंटिंग, स्टोन पेंटिंग, कॅलिग्राफी, कागदी फुले बनवणे, चारकोल पेंटिंग, निसर्ग रांगोळी, बांबूपासून शोभिवंत वस्तू बनवणे या कला शिकवण्यात आल्या.
तशाच कार्यशाळेचे आयोजन यंदा दिवाळीच्या सुटीत डोंबिवली येथे करण्यात आले. सातत्याने नवीनतेचा शोध घेणार्या ‘अनुनाद’ने या कार्यशाळेत कलेबरोबरच संभाषण कलेची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न केला. यात काव्य सादरीकरण, श्रवण कौशल्य, भावनांचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन हे विषय विद्यार्थ्यांना त्या त्या विषयतज्ञांकडून शिकवण्यात आले.
ज्येष्ठांचे केवळ मार्गदर्शन पुरेसे ठरत नाही. त्याबरोबरच त्याला कार्याची जोडही आवश्यक असते. हा विचार मध्यवर्ती ठेवून ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांची दोन दिवसीय लेखन कार्यशाळा ‘अनुनाद’तर्फे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संवाद लेखन, कथा लेखन, मनातील विचारांची लिखित मांडणी असे विषय तांबे यांच्यासारख्या बालकुमार साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांकडून विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी ‘पक्षीनिरीक्षण’ ही तीन स्लाईडची मालिका नुकतीच संस्थेतर्फे कोकणात आयोजित केली होती. दहावीतील विद्यार्थी आणि बालपक्षीनिरीक्षक अर्णव पटवर्धन याच्या स्लाईड शोचे तीन कार्यक्रम राजापूर, साखरपा आणि देवळे या गावात संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले. अर्णवकडून त्याने काढलेल्या विविध पक्षांचे फोटो आणि त्याच्याच निवेदनात मिळालेली माहिती यात विद्यार्थ्यांनी ऐकली.
परभणीसारख्या ठिकाणी ‘अनुनाद’कडून स्पोकन इंग्लिश हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता. याशिवाय, ‘कोविड’ काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंची कमतरता भासू नये, म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण शहरात 500 शैक्षणिक किटचे वाटप संस्थेने केले. शालेय प्रगतीत तुलनेने कमी असलेल्या ग्रामीण भागातील युवकाला संस्थेतर्फे घरघंटी देण्यात आली आहे. शारीरिक दिव्यांग असलेल्या अशाच एका युवकाला केशकर्तनालयाचा त्याचा व्यवसाय सुकर व्हावा, यासाठी विशेष सोय असलेली खुर्ची लवकरच देण्यात येणार आहे.
ग्रामीण आणि त्यातही वनवासी भागात सणवार साजरे करणे हे सहजसाध्य नसते. याचाच विचार करून ‘अनुनाद’तर्फे गेली तीन वर्षे ऐन दिवाळीत अशा वस्ती पाड्यांवरील लोकांना कपडे, फराळवाटप करून त्यांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या समस्या विशेषतः वाढीस लागल्याचे पाहण्यात येते. यावर नेत्रतपासणी शिबिरे संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणार आहेत. असेच एक शिबीर बावधन येथे याआधी संस्थेने आयोजित करून त्या शिबिरात गरजूंना मोफत चष्मे वाटपही करण्यात आले होते.
आगामी काळात संस्थेचे काही उपक्रम नियोजित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचे प्रश्न उभे रहातात. यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ‘अनुनाद’तर्फे पुढील महिन्यांत आयोजित केला आहे. यात पत्रकारिता, ‘एआय’, कंटेण्ट रायटिंग आणि कृषी हे काहीसे वेगळे विषय घेऊन ‘अनुनाद’ तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शनाची व्याख्याने आयोजित करत आहे. गडचिरोलीसारख्या नक्षली आणि अति दुर्गम ठिकाणी लवकरच तेथील गरज लक्षात घेऊन सौरदीप आणि कपडे देण्यात येणार आहेत. प्लास्टिक व्यवस्थापन या विषयावर ‘अनुनाद’तर्फे आगामी काळात काम करण्यात येणार आहे. काहीच महिन्यांपूर्वी ’अनुनाद इंडिया डॉट ओ आर जी’ ही संस्थेची वेबसाईटदेखील तयार करण्यात आली आहे. संस्थेचा आजवरचा प्रवास आणि भविष्यातील उपक्रम या सगळ्याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क : 9321658571)