एमएमआरसीएलकडून झाडांना जिओ टॅगिंग

नागरिकांना क्यूआर कोड न काढण्याचे आवाहन

    16-Dec-2024
Total Views |

mmrcl


मुंबई, दि.१४ : प्रतिनिधी 
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रो३च्या विविध स्थानकांवर इन-सीटू मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत १०००हून अधिक झाडे लावली. ७ वर्षांपेक्षा जास्त वयाची आणि सरासरी १०-१५ फूट उंचीची ही विविध प्रजातींची प्रगत आकाराची झाडे आहेत. ही झाडे महाराष्ट्रातील रोपवाटिकांमध्ये वाढवली गेली आणि विविध मेट्रो३ स्थानकांवर वृक्षारोपणासाठी मुंबईला नेण्यात आली. एमएमआरसी हा वृक्षारोपण कार्यक्रम पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी माहिती एमएमआरसीएलने दिली आहे.


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-३ च्या बांधकामासाठी किमान झाडे बाधित होतील असा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. वृक्ष प्राधिकरणाने ३७७२ झाडे काढण्याची परवानगी दिली असली तरी कॉर्पोरेशनने केवळ ३०९३ झाडे काढली असून ६७९ झाडे मूळ जागेवर ठेवली आहेत. वेळोवेळी उच्च न्यायालय नियुक्त समितीद्वारे या वृक्षारोपणाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. ही झाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रो३च्या विविध स्थानकांवर इन-सीटू मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण केली आहे. इन-सीटू वृक्षारोपण ही एक अनोखी वृक्षरोपण पद्धती आहे. ज्यामध्ये कंत्राटदाराला झाडाची प्रजाती ४६ सेमी परिघापर्यंत पोहोचेपर्यंत वृक्ष वाढवावे लागतात, नंतर विशिष्ट ठिकाणी वृक्षारोपण करावे लागते आणि पुढे त्याची देखभाल करावी लागते. भारतात प्रथमच कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाडे वाढवली गेली आणि इतर ठिकाणी लावली गेली आहेत.


एमएमआरसीने आतापर्यंत २०००हून अधिक झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण केले आहे. एमएमआरसीने लावलेल्या झाडांची माहिती, त्यांच्या स्थानाची माहिती नागरिकांना सिंगल क्लिकवर देण्यासाठी जिओ-टॅगिंग ॲक्टिव्हिटी स्वीकारण्यात आली आहे. झाडावर चिकटवलेला क्यूआर कोड स्कॅन करून नागरिक झाडाची माहिती मिळवू शकतात. नागरिकांना विनंती आहे की क्यूआर कोडमध्ये छेडछाड करू नये किंवा काढू नये, असे आवाहन एमएमआरसीएलने केले आहे.