दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी १९७१ सालच्या भारत-पाक युद्धातील भारताच्या निर्णायक विजयाला ५३ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने...
चैत्र शु. ८, शके १५८५ म्हणजेच दि. ६ एप्रिल १६६३ या दिवशी शिवरायांनी पुण्याच्या लालमहालावर ‘कमांडो’ छापा घातला. शाहिस्तेखानाच्या अंगावर आपल्या हातातील भवानी तलवारीचा वार व्यवस्थित उतरल्याची खात्री पटल्यावर शिवराय आणि त्यांचे तरबेज कमांडो अतिशय वेगाने आणि सफाईने लालमहालातून, पुण्यातून बाहेर पडले आणि सिंहगडाकडे दौडले.
इकडे पुण्यात मुघली छावणीत प्रचंड गोंधळ उडाला होता. तेवढ्यात पहारेकर्यांनी खबर आणली की, सातार्याकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या कात्रज घाट मार्गावर शेकडो मशाली पेटलेल्या दिसत आहेत. बहुधा पुण्यावर छापा घालणारे शिवाजीचे सैन्य पळून चालले असावे. ताबडतोब मुघली छावणीतल्या काही सैन्य तुकड्या कात्रजच्या दिशेने दौडल्या. त्यांनी त्या मशालींना गाठले. बघतात तर काय-बैलांचा एक भलामोठा तांडा संथपणे गळ्यातली घंटाघुंगरे वाजवत चालला होता. प्रत्येक बैलाच्या दोन्ही शिंगांना मोठमोठ्या मशाली बांधलेल्या होत्या. त्याच लांबवरून दिसत होत्या. कपाळाला हात लावत मुघली तुकड्या पुण्याकडे परतल्या.
दुसर्या दिवशी दोन प्रहरी म्हणजे दुपारी १२ नंतर दोन्ही गोटांमध्ये पक्क्या खबरा आल्या. शाहिस्तेखानाला समजले की, स्वत: शिवाजीने जातीने आपल्यावर छापा घातला होता. त्याच्या भवानी तलवारीच्या तडाख्यातून आपले मुंडके केवळ दैवयोगाने बचावले. उजव्या हाताची तीन बोटे मात्र शहीद झाली. नंतर शिवाजी सिंहगडाकडे दौडला आणि सुखरूप तिथे पोहोचला. पण, आपल्याला शेंडी लावण्यासाठीच त्याने कात्रजच्या घाटात मुद्दाम बैलांच्या शिंगांना मशाली बांधण्याची युक्ती केली. शिवरायांनाही पक्की खबर मिळाली की, लालमहालातला आपला छापा कमालीचा यशस्वी झाला. शाहिस्तेखानाचा खुद्द मुलगा अबुल फत्तेखान याच्यासह मुघलांची एकंदर ५५ माणसे ठार झाली. स्वत: शाहिस्तेखान मात्र बचावला. पण, तो आता उजव्या हातात पुन्हा तलवार धरू शकणार नाही. कारण, भवानीच्या वाराने त्याची मधली तीन बोटे उडाली आहेत आणि आपली कात्रजच्या घाटाची युक्ती तर कमालीचीच यशस्वी ठरली आहे. पाठलागावर येणार्या मुघली फौजा सिंहगडाच्या रस्त्याला येण्याऐवजी विरुद्ध दिशेला सातार्याकडे गेल्या.
शिवरायांच्या या पराक्रमाच्या नि शाहिस्तेखानाच्या फजितीच्या या वार्ता अवघ्या महाराष्ट्रात नव्हे, अख्ख्या हिंदुस्थानात पसरल्या. त्यातून मराठी भाषेत एक नवा वाक्प्रचार निर्माण झाला - ‘कात्रजचा घाट दाखवणे’ म्हणजेच योग्य दिशेऐवजी चुकीची दिशा दाखवून फसवणूक करणे.
औरंगजेबाचा सख्खा मामा असलेला आणि शिवरायांनी साफ ‘मामा’ बनवलेला हा शाहिस्तेखान पुढे बंगालचा सुभेदार बनून सन १६९४ सालापर्यंत जगला. बंगालमध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने कलकत्ता (कोलकाता) हे आपले ठाणे नव्यानेच उभे केले, त्याला शाहिस्तेखान कारणीभूत झाला. पण, तो विषय पुन्हा केव्हातरी.
आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे भारतीय लष्कराच्या ‘१० पॅरा’ या कमांडो पथकाच्या धाडसी कामगिरीबद्दल. पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे ७५ किमी खोलवर घुसून त्यांनी सुमारे १३ हजार चौ.किमीचा परिसर ताब्यात घेतला. ही कारवाई इतकी आकस्मिक होती की, इस्लामाबादमधल्या पाकिस्तानी लष्करी मुख्यालयात घबराट उडाली. त्यांना काश्मीरवरून आपले लक्ष सिंधकडे वळवावे लागले. भारतीय सेनापतींना तेवढेच अपेक्षित होते. दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यामध्ये पाकिस्तानच्या पूर्व विभाग प्रमुख जनरल नियाझीने सपशेल शरणागती स्वीकारल्यामुळे युद्ध थांबले. पण, डिसेंबर १९७२ सालापर्यंत भारतीय सैन्याने वरील छाप्यात मिळवलेला १३ हजार चौ.किमीचा भूभाग आपल्या ताब्यात ठेवला होता. त्यानंतर राज्यकर्त्यांच्या आत्मघातकी धोरणामुळे नाईलाजाने तो परत द्यावा लागला. पण, तो दोष राज्यकर्त्यांचा होता. सेनापतींनी आपले डावपेच पूर्णपणे यशस्वी केले होते.
आधुनिक भारतीय सैन्य ब्रिटिशांच्या तालमीत तयार झालेले आहे. शापातून कधीकधी वरदान मिळते ते असे. ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी भारतीय सैन्य उभारले. त्याला आधुनिक युद्घपद्धती शिकवली. ब्रिटिश निघून गेल्यावर अनेक दृष्ट्या भारतीय सेनापतींनी भारतीय सैन्याला सतत अद्ययावत ठेवले. गंमत म्हणजे, या कामात त्यांना कुणा शत्रूचा नव्हे, तर आपल्याच राज्यकर्त्यांच्या आचरट धोरणांचा विरोध सहन करावा लागला. पण, त्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीतही भारतीय सैन्याला शक्य तितके अद्ययावत ठेवले. त्यामुळेच १९४७-४८ आणि १९६५ सालच्या ‘भारत-पाक’ युद्घात भारतीय सैन्याने पाकवर मात केली.
आता १९७१ सालचे भारत-पाक युद्ध मुख्यत: पूर्व आघाडीवर म्हणजेच बंगालमध्ये लढले जाणार होते. मे १९७१ सालापासूनच युद्घाचे ढग जमून येऊ लागले. मे महिन्यातच भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सरसेनापती जनरल सॅम माणेकशॉ यांना युद्घ सुरू करण्याची सूचना केली होती. जनरल माणेकशॉ यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. कारण, जूनमध्ये पावसाळा सुरू झाला की, बंगालचा सखल प्रदेश हा चिखलाचा समुद्र बनत असे. बंगालमधल्या विशाल नद्या पूर येऊन धो-धो वाहत असत. अशा स्थितीत तिथे युद्घ करणे म्हणजे माणसे आणि युद्घसामग्री यांचा नाश ओढवून घेणे. डिसेंबरपर्यंत पावसाने झालेला चिखल पूर्ण सुकतो. लष्करी वाहने आणि माणसे यांच्या हालचाली सुकर होतात. शिवाय डिसेंबरमध्ये हिमालयीन उतारांवर बर्फ पडतो. चीनकडून भारताकडे येणार्या दुर्गम खिंडी पूर्ण बंद होतात. म्हणजे, चिनी सैन्य आसाममार्गे बंगालमध्ये उतरण्याचा धोका नाही. असा सगळा विचार करून जनरल माणेकशॉ यांनी युद्घाची संभाव्य सुरुवात दि. ६ डिसेंबर १९७१ अशी ठरवली.
भूदल, वायुदल आणि नौदल यांची सगळी युद्घयंत्रणा (वॉर मशिनरी) वेगाने कामाला लागली. बंगालमधील हेर यंत्रणा पूर्व पाकिस्तानातील बंडखोर बंगाली ‘मुक्ति बाहिनी’शी संपर्क साधून, त्यांना गनिमी युद्धाचे प्रशिक्षण देऊ लागली. दि. २१ नोव्हेंबर १९७१ सालापर्यंत भारतीय सेनेचा पूर्व विभाग आणि ‘मुक्ति बाहिनी’ यांची युद्धसज्जता पूर्ण झाली.
पाकिस्तान सेनापतींनाही हे समजतच होते. त्यामुळे त्यांनी दि. ३ डिसेंबर १९७१ रोजीच्या दिवशी अचानकपणे भारताच्या पश्चिम आघाडीवरील एकंदर ११ ठाण्यांवर हवाई हल्ला चढवला. पाकिस्तानचे उद्दिष्ट असे होते की, पूर्वेकडच्या युद्धाप्रमाणेच पाकिस्तान पश्चिमेकडे म्हणजेच काश्मीर-पंजाब-राजस्थान या सीमांवरूनही जोरदार आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, असा भारतीय सेनापतींचा समज व्हावा. त्यांना आपली बरीचशी सेना पश्चिमेकडे गुंतवण्यास भाग पाडावे. काश्मीरसाठी पाकिस्तानचा पहिल्यापासूनच नुसता आटापिटा चाललेला होता, तर या आक्रमपणाने शक्य तितका काश्मीरचा भूभाग हिसकावून घ्यावा.
भारतीय सेनापतींना हे अगदी अपेक्षितच होते. त्यांनी पाकिस्तान्यांना व्यवस्थित कात्रजचा घाट दाखवायचे ठरवले. दुसर्या महायुद्घ काळात, १९४२ साली दोस्त राष्ट्रांचा एक कमांडो सेनापती मेजर डेव्हिड स्टर्लिंग याने एक फार नमुनेदार कमांडो कारवाई केली होती. इजिप्तच्या वाळवंटातील सीदी हानिश नामक विमानतळावर मेजर स्टर्लिंग आणि त्याचे कमांडो अकस्मात जाऊन कोसळले. जर्मनीचा प्रख्यात जनरल रोमेल याच्या सैन्याला रसद पुरवठा करणारी जर्मन वायुदलाची विमाने सीदी हानिशवरून वाहतूक करत असत. मेजर स्टर्लिंगने त्यातली बरीचशी विमाने मारून काढून रोमेलचा रसद पुरवठा अडचणीत आणला.
आता लेफ्टनंट कर्नल भवानी सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराची ‘१० पॅरा’ ही कमांडो तुकडी राजस्थानातून पाकच्या सिंध प्रांतातल्या चचरो या ठाण्याच्या दिशेने निघाली. या तुकडीच्या पुन्हा तीन कंपन्या बनवण्यात आल्या. एका कंपनीने ‘सरूपे का ताला’वरून पुढे सरकत खुद्द चचरो ठाणे आणि तिथली ‘पश्चिम पाकिस्तान रेंजर्स’ या सैन्य पथकाची कोंडी करायची. दुसर्या कंपनीने चचरो ते उमरकोट या ठाण्यांदरम्यानचे दळणवळण बंद पाडायचे. पूल ताब्यात घ्यायचे वा उडवून द्यायचे. तिसर्या कंपनीने रहीम यार खान या ठाण्याकडे जाणारे दोन रेल्वे पूल ताब्यात घेऊन भारताच्या ‘१२ राजपूत रायफल्स’ या सैन्य तुकडीला तनोत, किशनगढ, इस्लामगढ, रहीम यार खान हा मार्ग मोकळा करून द्यायचा. पाकिसानने दि. ३ डिसेंबर रोजी हवाई हल्ले चढवून अधिकृत युद्धाला सुरुवात केल्यावर त्वरित म्हणजे दि. ४ डिसेंबर रोजी अंधार पडल्याबरोबर ‘१० पॅरा’ची धडक कारवाई सुरु झाली. वाळवंटी भागात सहजतेने हालचाली करता येतील, अशी व्यवस्था केलेल्या लष्करी जीप्समधून ‘१० पॅरा’च्या तिन्ही कंपन्या पाकी सिंधी वाळवंटात घुसल्या. ८० किमीचा पल्ला मारून एक कंपनी चचरोवर धडकली. तिथल्या चकित झालेल्या पाकिस्तानी शिबंदीवर ते तुटून पडले. खरे म्हणजे पाकडे संख्येने बरेच जास्त होते. पण, भारतीय कमांडोंचा वेग आणि भयंकर आवेश यामुळे ते भेदरून गेले. शिवाय इतक्या आतपर्यंत भारतीय कमांडो जीप्समधून थेट हल्ला करतील, अशी त्यांना कल्पना नव्हती. चचरोमधली शिबंदी पूर्ण उद्ध्वस्त झाली. दुसर्या कंपनीने तर दिवसाढवळ्या हल्ला चढवून विरवाह आणि नगरपारकर ठाणी ताब्यात आणली, तर तिसर्या कंपनीने इस्लामकोट आणि लुनिओवर कब्जा केला.
ठरल्याप्रमाणे सगळे ‘ऑपरेशन’ तंतोतंत पार पाडून, जिंकलेली ठाणी आणि त्यांच्या पल्ल्यातला १३ हजार चौ. किमीचा पाकी भूभाग राजपूत रायफल्सच्या ताब्यात सोपवून ‘१० पॅरा’ तुकडी सुखरूप भारतीय प्रदेशात परतली. चार किंवा पाच दिवसांच्या या कमांडो कारवाईत भारताने शत्रूचे ३६ सैनिक ठार केले, २२ जण कैद केले आणि स्वतःचा मात्र एकही सैनिक गमावला नाही. ही कामगिरी फारच अप्रतिम होती. त्यासाठी लेफ्टनंट कर्नल भवानी सिंह यांना ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले.
या कारवाईचा खरा परिणाम हा होता की, पाकिस्तानी सेनापती भलतेच हादरले. सिंधच्या वाळवंटी प्रदेशातून भारत आक्रमण करेल, अशी त्यांनी कल्पनाच केली नव्हती. भारताने तसे आक्रमण केले. थेट ७५ ते ८० किमी आत घुसून केले आणि तब्बल १३ हजार चौ. किमीचा प्रदेश ताब्यात घेतला. नुसताच छापा मारून परत गेले नाहीत, हा यांच्या व्यूहरचनेला जबर धक्का होता. यामुळे त्यांना पंजाब-काश्मीरकडील सैन्यपथके सिंधकडे हलवावी लागली. भारताला एवढेच साध्य करायचे होते. त्याला सिंधमधून आणखी आत घुसायचे नव्हतेच. शत्रूला ‘कात्रजचा घाट’ सिंधच्या वैराण वाळवंटात व्यवस्थित दाखवून झाला होता.