पाईपलाईन चोरी प्रकरणाच्या आरोपानंतर ठाकरे गटाचा नेता फरार!

नेत्याच्या शोधासाठी नेमलं विशेष तपास पथक

    13-Dec-2024
Total Views |

sunil mahajan
 
जळगाव : (Jalgaon) जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
 
काय आहे प्रकरण?
 
जळगाव शहराला काही काळ पाणी पुरवठा केलेल्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन २ डिसेंबर रोजी जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुढील तपासात प्रमुख सूत्रधार सुनील महाजन यांचे नाव समोर आले.
 
कोण आहेत सुनील महाजन?
 
जळगाव महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे ठाकरे गटात आहे. त्यांच्या पत्नी जयश्री महाजन जळगाव शहराच्या महापौर राहिलेल्या आहेत. जयश्री महाजन यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवली होती. जळगाव शहर मतदारसंघात भाजप उमेदवार सुरेश भोळे यांच्याविरोधात जयश्री महाजन उभ्या होत्या. परंतु जयश्री महाजन यांचा पराभव झाला. त्यांचे पती सुनील महाजन हे आता पाईपलाईन चोरी प्रकरणात अडकल्याची माहिती आहे.