मुंबई ,दि.११ : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ तत्वावरील ११ हजार १७६ घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाने २ डिसेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत इच्छुक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले. या विशेष मोहिमेला आठवड्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून ५५०० हून अधिक इच्छुकांनी घरांची चौकशी केली. यापैकी २५० जणांनी अनामत रक्कमेसह अर्जही सादर केले आहेत. आणखी काही इच्छुक अर्ज दाखल करतील, अशी मंडळाला अपेक्षा आहे. बुधवार, दि.११ हा या विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस असणार आहे.
कोकणातील १४ हजारांहून अधिक घरे रिक्त असून यामुळे मंडळाला अंदाजे तीन हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. या घरांच्या विक्रीसाठी मंडळाने ११ हजार १७६ घरांची ‘प्रथम प्रधान्य’ तत्वाने विक्री सुरू केली. घरांची माहिती प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि स्वत: इच्छुक ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांना घरविक्रीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी मंडळाला अखेर विशेष मोहीम हाती घ्यावी लागली आहे. त्यानुसार २ डिसेंबरपासून विशेष मोहिमेला सुरुवात झाली असून बुधवार ११ डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
आठवड्याभरात ५५०० हून अधिक जणांनी घरासाठी चौकशी केली आहे. यापैकी २५० जणांनी अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल केले आहेत. तर ५५०० पैकी आणखी काही जण लवकरच अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रतिसाद चांगला असल्याने या मोहिमेला बऱ्यापैकी यश मिळत असल्याची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.