‘हेल्थ मॉनिटर’ प्रोग्राम फॉर दिव्यांग

    10-Dec-2024
Total Views |

Health Monitor
 
 
दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणार्‍या ‘स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’ या मुंबईतील बोरिवली (पूर्व) येथील संस्थेने दि. ३ डिसेंबर रोजी हा ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा केला. त्यावेळी १०० दिव्यांग व्यक्ती आणि ४० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत...
 
व्यांग व्यक्तीला आलेल्या अपंगत्वामुळे वयपरत्वे त्याच्या शारीरिक अडचणी वाढत जातात आणि या शारीरिक व्याधी त्याचे जीवन अत्यंत त्रासाचे करतात आणि म्हणूनच जर वेळीच प्राथमिक आरोग्य तपासणी, डॉक्टरांचे मार्गदर्शन, योग्य ती औषधे, आवश्यक फिजिओथेरपी अशी प्राथमिक आरोग्य सुविधा जर दिव्यांग व्यक्तींना अत्यंत वाजवी दरात उपलब्ध झाली, तर त्यांचे एकंदरीत शारीरिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होईल. या एकमेव उद्देशाने ‘हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग’ (HMPD)हा अभिनव उपक्रम ‘स्नेहज्योत’ संस्थेने हाती घेतला, ज्याचा शुभारंभ ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,’ बोरिवली (पूर्व) येथील एनआयसी ऑडिटोरियममध्ये ‘जागतिक दिव्यांग दिना’निमित्त करण्यात आला. जवळजवळ ३५ वर्षांहून जास्त मेडिकल क्षेत्रात अनुभव असणारे प्रो. डॉ. हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वाला आला. एचएनजी पॅथोलॉजी आणि डायग्नोस्टिक हेल्थकेअर, आशा हेल्थकेअर, एनएम मेडिकल सेंटर या उपक्रमाशी संलग्न आहेत. या उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना ‘आयुष्मान कार्ड’ काढून देण्यात येते. आवश्यक असणार्‍या चाचण्या वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, त्यांच्या विभागात वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आवश्यकता भासल्यास मोठ्या शस्त्रक्रिया मोफत करून घेण्यात येऊ शकतील का? या दिशेने या उपक्रमाचा विस्तार होत आहे.
 
तर या उपक्रमाच्या सकाळच्या सत्रात उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर दुपारच्या सत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल करणार्‍या दृष्टिहीन तायक्वांडो खेळाडू कृष्णा शेठ यांचा ‘स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्त्व पुरस्कार 2024’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच अपंगत्वावर मात करून झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे काम करत स्वतःचे आयुष्य स्वावलंबनाने जगणार्‍या हरिशंकर शर्मा यांचा ‘स्नेहज्योत धैर्यशील व्यक्तिमत्त्व पुरस्कार 2024’ देऊन गौरव करण्यात आला. या दोघांनी आपले अनुभव कथन करत उपस्थितांसमोर जिद्दीचे आणि मनोबलाचे उदाहरण ठेवले. त्यानंतर सर्व दिव्यांग मुलांना ‘नॅशनल पार्क’मधील लायन सफारी टूर घडवून आणली. आयुष्यात कधीही घराबाहेर फिरायला न पडलेल्या या मंडळींच्या आयुष्यात हा दिवस ‘स्नेहज्योत संस्थे’च्या कार्यकर्त्यांनी अविस्मरणीय करून टाकला. ‘नॅशनल पार्क’च्या सर्व अधिकार्‍यांनी संपूर्ण सहकार्य केल्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. या कार्यक्रमाला ‘संजय गांधी निराधार पेन्शन योजने’चे तहसीलदार अतुल सावे, अकाऊन्टन्ट रविदास गवळी, तलाठी चिराग सुळे, फेरो इक्विपचे रोड्रिक्स फर्डी, सुविद्या प्रसारक संघाचे महादेव रानडे, एन. एम. मेडिकल सेंटरचे प्रतिनिधी हर्षिल परमार, स्नेहज्योत शुभचिंतक अहिल्या कुलकर्णी, डॉ. श्रीकांत ठाकूर, एस. एस. बॅग्सचे संजय दळवी तसेच प्रा. हेमंत शिंदे आणि त्यांची टीम उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त विजय कलमकर यांनी केले. सकाळचा नाश्ता ‘स्नेहज्योत’ शुभचिंतक मंगला यांच्याकडून तर दुपारचे जेवण संजय दळवी यांच्याकडून तसेच लायन सफारी ही ‘इनरव्हील क्लब ऑफ मुंबई, दहिसर’ यांच्याकडून प्रायोजित करण्यात आली होती. संस्थेची संस्थापिका आणि सचिव म्हणून मला वाटते की, हे दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य ‘स्नेहज्योत’ परिवारातील सर्व सेवाव्रतींमुळेच होऊ शकते.
 
सुधा वाघ