राष्ट्रपुरुषोत्तम लोकमान्य टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊन ‘गीतारहस्य प्रणित निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान म्हणजे भारतवर्षीय राष्ट्रधर्माची तत्त्वदृष्टी’ हे जनमानसात रुजविण्यासाठी गीतावाचस्पती प्रज्ञाचक्षू कै. सदाशिवशास्त्री भिडे आणि लोकमान्यांचे नातू कै. ग. वि. केतकर यांनी मिळून १०० वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी म्हणजेच दि. २३ जुलै १९२४ रोजी पुण्यात ‘गीताधर्म मंडळा’ची स्थापना केली. कै. भिडे शास्त्री हे या मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते, तर कै. केतकर संस्थापक कार्यवाह होते.
सदाशिवशास्त्री भिडे यांनी त्याकाळी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत स्वतः दौरे करून ‘गीताधर्म मंडळा’चा प्रसार केला. तसेच १९२५ साली हैद्राबाद येथे भरलेल्या ‘हिंदू धर्म परिषदे’त भिडेशास्त्री यांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ही ‘गीताजयंती’ म्हणून साजरी व्हावी, असा ठराव मांडला. सदाशिवशास्त्री भिडे यांनी अविश्रांतपणे केलेल्या दौर्यातून, प्राप्त झालेल्या पैशांतून त्यांनी ‘गीताधर्म मंडळा’चा आर्थिक पाया घातला. स्वतः भिडेशास्त्री हिशोबाच्या बाबतीत इतके काटेकोर होते की, मिळालेली दक्षिणाही त्यांनी मंडळाच्या निधीत जमा केली. शास्त्रीबुवा स्वतः अंध होते, तरी त्यांनी आपल्या प्रज्ञाचक्षूतून, मंडळाच्या स्वतःच्या स्वतंत्र वास्तूचे स्वप्न पाहिले आणि सुदैवाने ते पूर्णही झाले. आता सदाशिव पेठ, पुणे येथे या मंडळाची स्वत:ची ‘गीताभवन’ ही तीन मजली वास्तू आहे. सदाशिवशास्त्री भिडे यांच्या प्रयत्नांना या मंडळाचे संस्थापक कार्यवाह श्री. ग. वि. केतकर यांची मोलाची साथ लाभली. ते स्वतः ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे अभ्यासक आणि उपासक होते. ‘श्रीमद्भगवद्गीता’ या एकाच विषयावर विपुल वृत्तपत्रीय लेखन त्यांनी केले. भारतीय भाषांमध्ये ‘गीता’ या विषयांवर इतके विपुल लेखन बहुदा अन्य कोणी केले नसावे. ‘गीताधर्म मंडळा’च्या स्थापनेनंतर ‘गीताधर्म मंडळा’च्या वाढीसाठी भारतभर दौरा करण्याची आणि यातून प्रचाराची जबाबदारी सदाशिवशास्त्री भिडे यांनी उचलली, तर ग. वि. केतकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून गीताविषयक लेखन करून ‘गीताधर्म मंडळा’च्या कार्याचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी विविध विद्यालयांमध्ये गीता पाठांतराच्या स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस ‘गीताजयंती’ म्हणून साजरा केला जावा, यासाठी सदाशिवशास्त्री भिडे यांच्यासोबत ग. वि. केतकर यांनीही प्रचंड प्रयत्न केले. दरवर्षी भारतभर साजरी केली जाणारी ‘गीताजयंती’ ही त्यांच्याच प्रयत्नांची देणगी आहे.
सदाशिवशास्त्री भिडे यांच्या निधनानंतर मंडळाच्या कार्याची धुरा ग. वि. केतकर यांच्या खांद्यावर पडली. मंडळातील इतर सहकार्यांच्या मदतीने केतकर यांनी मंडळाचे काम जोमाने सुरू ठेवले. ग. वि. केतकर यांच्यानंतर प्रख्यात संघयोगी समाजधुरिण विनायकराव गो. आपटे, वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रसिद्ध गीताभ्यासक माधव गंगाधर महाजन, पी. डी. ए. या प्रसिद्ध नाट्यसंस्थेचे संस्थापक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, भालबा केळकर, सेवानिवृत्त पोलीस कमिशनर आणि संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक श्रीधर प. मराठे, सुप्रसिद्ध संत-साहित्याभ्यासक आणि नामवंत लेखक प्राचार्य डॉ. हेमंत वि. इनामदार, संतसाहित्याच्या ख्यातिप्राप्त अभ्यासक आणि प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सौ. कल्याणी नामजोशी या दिग्गज आणि निष्ठावंत मंडळींनी या मंडळाचे अध्यक्षस्थान भूषविले. या मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या प्रत्येक व्यतीने आपल्या कार्यकाळात मंडळाचा प्रचार आणि प्रसार करून गीतेचे माहात्म्य जनमानसात रुजवण्याचे काम निष्ठेने केले.
प्रतिवर्षी विविध शिक्षण संस्थांतून गीताविषयक परीक्षा घेणे, गीतेच्या प्रचारार्थ गावोगावी व्याख्याने देणे, विद्यार्थ्यांसाठी नियमित संस्कारवर्ग आयोजित करणे, गीताजयंती महोत्सव आणि प्रसंगानुरूप काही व्याख्यानमालांचे आयोजन करणे, गीतेला समर्पित गीतादर्शन या मासिकाची सुरुवात, गीताधर्म मंडळात दैनंदिन ज्ञानसत्राचा अव्याहत उपक्रम राबविणे, कै. सदाशिवशास्त्री भिडे संपादित ‘श्रीमद् भगवद्गीता’ पाठ्यावृत्तीसोबतच अनेक पुस्तकांचे प्रकाशन, प्रतिवर्षी एका विषयावर सलग २१ दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन, संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीतुकाराम, श्रीसमर्थ रामदास तसेच ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘श्रीमद् भगवद्गीता’ या विषयांवर महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे नियोजन असे अनेक उल्लेखनीय उपक्रम या मंडळाने १०० वर्षांच्या कालावधीत विविध अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राबविले आहेत. सध्या २०१० सालापासून डॉ. मुकुंद र. दातार हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. डॉ. मुकुंद दातार हे निवृत्त प्राचार्य, ख्यातनाम वक्ते, तसेच संतसाहित्यविषयक अनेक ग्रंथांचे लेखक आहेत. सांस्कृतिक विचारवंत म्हणून त्यांची प्रसिद्धी असून, त्यांच्या कारकिर्दीत, ‘गीताधर्म मंडळा’ची सर्वांगीण प्रगती लक्षणीय वेगाने होत आहे.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभर गीतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘गीताधर्म मंडळ’ गेल्या १०० वर्षांपासून प्रयत्नशील आहे. १९२४ साली भिडे-केतकर यांनी रुजवलेल्या या बीजातून आज एक मोठा सांस्कृतिक वटवृक्ष उभा राहिला आहे. ‘श्रीमद्भगवद्गीता’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘अध्यात्मचिंतन आणि भारतीय संस्कृति’विषयक ग्रंथांनी युक्त असे संदर्भ ग्रंथालय या मंडळाने उभे केलेले आहे. देश-विदेशात ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने ‘गीता संथा वर्ग मंडळा’तर्फे सातत्याने आयोजित केले जातात. ‘आध्यात्मिक-सांस्कृतिक’ विषयांवर आधारित व्याख्याने-प्रवचने, गीतेवर आधारित विविध स्पर्धा या मंडळातर्फे सातत्याने आयोजित केल्या जातात. ‘गीतादर्शन’ हे गीतेला वाहिलेले मासिक हे मंडळ ५५ वर्षांपासून प्रकाशित करत आहे. ‘गीतातत्त्वव्रती’, ‘ज्ञानेश्वरी प्रबोध’ आणि ‘तुकाराम गाथा’ हे अभ्यासक्रम या मंडळातर्फे घेतले जातात. तसेच २०१४ सालापासून अखंडपणे संपूर्ण ‘गीतापाठ यज्ञा’चे आयोजन हे मंडळ करते. जवळपास दीड ते दोन हजार गीतापाठक या यज्ञाला उपस्थित राहतात. ‘शताब्दी महोत्सवा’च्या निमित्ताने दहा हजार लोकांचा संपूर्ण ‘गीतापाठ’ मंडळाने आयोजित केला होता. बदलत्या काळासोबत अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीही हे मंडळ सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे मंडळाच्या संदर्भ-ग्रंथालयातील ग्रंथांचे संगणकीकरण आणि इतर सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये या मंडळाचे संकेतस्थळ उपलब्ध आहे. ‘गीता धर्म’ या नावाचे यूट्यूब चॅनलही हे मंडळ चालवते.
‘गीताजयंती’ दिवशी मंडळातर्फे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. या दिवशी मंडळातर्फे गीताग्रंथाची पुण्यात शोभायात्रा काढली जाते. तसेच संपूर्ण ‘गीता कंथस्थ स्पर्धा’ आणि विविध ‘गीताध्याय पाठांतर स्पर्धा’ या दिवशी आयोजित केल्या जातात. गीताधर्म मंडळाचे १०० वर्षांपासून सुरू असलेले हे कार्य संस्कृतीच्याच नाही, तर धर्माच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचे आहे. अशा या ‘गीताधर्म मंडळा’च्या महान कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मानाचा मुजरा.
शताब्दीनंतर आता आम्ही संस्कार वर्गांवर भर देत आहोत. संथा वर्ग जसे आमचे सुरू आहेत, तसेच आम्ही लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू करणार आहोत. त्याचा अभ्यासक्रम सुद्धा आम्ही तयार केला आहे. सोबतच महिलांसाठीही वर्ग आम्ही सुरू करत आहोत. ‘गीता सर्वोपयोगी’ हा आमचा आता मुख्य हेतू असणार आहे. म्हणजे गीतेतील फक्त श्लोक नाही, तर दैनंदिन जीवनात गीता कशी मार्गदर्शक ठरेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
-विनया मेहेंदळे
(प्रमुख कार्यवाह आणि गीतादर्शनच्या संपादिका)
दिपाली कानसे