रामायण आणि आधुनिकतेचा उत्तम संगम!

Total Views |
 
singham again
 
सणासुदीला चित्रपटगृहात जाऊन कोण चित्रपट पाहणार ,असा प्रश्न कधीतरी मनात नक्कीच येतो. कारण, सणांनाच घरातील नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळते. त्यामुळे गप्पांमध्ये कसा दिवस जातो ते कळतच नाही. मात्र, यंदाची दिवाळी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचे काम, खर्‍या अर्थाने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने केले. दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४३ कोटी कमावले होते. जाणून घेऊया नेमका चित्रपट आहे तरी कसा?
 
‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची कथा रामायणाच्या कथेसोबत,समांतर सुरू असलेली दाखवली आहे. चित्रपटाची सुरूवात होते, ‘सुर्यवंशी’ या चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगापासून. जिथे दहशतवादी उमार हफिज अर्थात अभिनेते जॅकी श्रॉफ आपल्या दोन्ही मुलांना गमावल्यामुळे, त्यांचा संताप अधिकच वाढलेला असतो आणि सिंघमशी त्यांचे गणित अधिकच वाकडे होते. तर दुसरीकडे सिंघमची बदली थेट काश्मीरमध्ये झालेली दाखवली आहे. एक प्रसंग असा येतो, जिथे सिंघमला मारण्याचा प्रयत्न केला जातो. तो मारणारा व्यक्ती म्हणजेच उमार हफिज हा असतो आणि सिंघम त्याला ताब्यातही घेतो. यावेळी काश्मीरमधील युवापिढी सिंघमच्या दिशेने चालत येताना दिसते. पण, एक तरुण मुलगा आता काश्मीरची युवा पिढी बदलली आहे असे म्हणतो आणि दहशतवादाविरोधात आम्हीही पोलिसांच्या आणि देशाच्या सोबत आहोत, असा संदेश तो मुलगा इथे देतो. सध्याचा बदलता काश्मीर या प्रसंगातून दाखवला आहे. उमारला ताब्यात घेतल्यानंतर, खरी चित्रपटाची कथा सुरू होते. चित्रपटात करिना कपूर हिने, अवनी ही भूमिका साकारली आहे. ती जगभरात रामायणाची कथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे प्रयोग करत असते. शिवाय, रामायणात ज्या ठिकाणांचा उल्लेख आहे, तिथे जाऊन त्याचे चित्रीकरण करुन, पुराव्यासह ते लोकांपर्यंत सादर करत असते. एकीकडे तिचे हे काम सुरू असताना, सिंघमला त्रास देण्यासाठी रावणरुपी खलनायक अर्थात अर्जून कपूर हा अवनीचे अपहरण करतो आणि त्यानंतर रामरुपी सिंघम, लक्ष्मणरुपी इंस्पेक्टर सत्या अर्थात टायगर श्रॉफ, हनुमानरुपी सिंबा अर्थात रणवीर सिंग, जटायूरुपी इन्सपेक्टर दया आणि जटायूचे मोठे बंधू गरुड रुपात अक्षय कुमार करिनाला वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करतात, ते दाखवले आहे. शिवाय या चित्रपटातून लेडी सिंघम दीपिका पदूकोणला कॉप युनिवर्समध्ये घेतले आहे खरे. पण, तिचे नेमके रामायणातील कोणते पात्र होते, हे समजणे जरा अवघड आहे. मात्र, रावणाच्या कचाट्यातून, सीता मातेला प्रभू श्रीरामाने कसे सोडवले होते आणि अहंकारापायी त्याचा कसा वध केला होता, हे सारे काही २१व्या शतकातील दहशतवाद आणि तो संपवण्यासाठी भारत देश करत असलेले सातत्याचे प्रयत्न, या माध्यामातून दाखवण्यात आला आहे.
 
हिंदी चित्रपटसृष्टीत कथेचा ताळमेळ साधत तयार करणार्‍या दिग्दर्शकांपैकी एक उत्तम दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. कारण, ज्या पद्धतीने त्याने, ‘सिंघम १’ आणि ‘सिंघम अगेन’मधील काही प्रसंग जोडले आहेत, त्याचा खरच प्रेक्षकांनी विचारही केला नसेल. सिंबा या पात्राचा पहिल्या भागाची नेमका काय संबंध होता हे जाणून घेतल्यावर, तर प्रेक्षक अचंबित झाले नसतील, असे होणारच नाही. मुळात अ‍ॅक्शन चित्रपट पाहण्यासाठी, प्रेक्षकांच्या असलेल्या अपेक्षा दिग्दर्शक म्हणून रोहितने, याही चित्रपटात पूर्ण केल्या आहेत, यात शंकाच नाही. मुळात चित्रपटाची कथा सुरू असताना, कुठेही रामायणाच्या मूळ कथेला धक्का लागणार नाही याची विशेष काळजी दिग्दर्शक आणि मराठमोळे लेखक क्षितीज पटवर्धन यांनी घेतली आहे.
 
‘सिंघम अगेन’ चित्रपट पाहण्याची काही कारणे आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिले कारण म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम सीक्वेल चित्रपटासाठी हा चित्रपट नक्की पाहावा. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, आपल्या भारतीय संस्कृतीचा गौरवशाली इतिहास अर्थात रामायण हे कसे घडले होते? ते आधुनिक पद्धतीच्या कथेची पकड घेत, त्याची केलेली उत्तम मांडणी आणि एक सुंदर सिनेमॅटीक अनुभव घेण्यासाठी, हा चित्रपट पाहावा. त्यानंतर आश्चर्याची बाब म्हणजे खलनायक अर्थात रावणरुपात दिसलेला अर्जून कपूर याने, उत्तम अभिनय केला आहे. आजवर त्याने केलेली कामे फारशी उठावदार नव्हती. पण, ‘सिंघम अगेन’मध्ये त्याला खर्‍या अर्थाने एक नवी संधी मिळाली आणि त्याचे अभिनय कौशल्य त्याला दाखवता आले, असे नक्कीच म्हणावे लागेल.
 
संपूर्ण चित्रपटात १-२ प्रसंग मनाला पटणारे नव्हते. किंवा कथेनुसार फार तो प्रसंग फार ताणून धरण्याचीही गरज नव्हती, असे वाटणार्‍या आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे टायगर श्रॉफ हा लक्ष्मणरुपात दाखवला असून, त्याचे फायटिंग सीन्स जरा जास्तच खेचल्यासारखे आणि केवळ त्याला येणारी कला दाखवता यावी, म्हणून चित्रित केल्यासारखे वाटते. दुसरे म्हणजे लेडी सिंघम अर्थात दीपिकाला रोहितने कॉप युनिवर्समध्ये आणले खरे पण, संपूर्ण चित्रपटात तिची कॅमेरा स्पेस फारच कमी होती. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, या चित्रपटात गाण्यातून कथा पुढे नेण्याची चूक केली नसल्याने, कथा अधिकच रंजक वाटते. मात्र, सिंघमच्या आधीच्या भागांसोबत पार्श्वसंगीताची तुलना केल्यास,‘सिंघम अगेन’चे पार्श्वसंगीत तितके मनाला भावत नाही.
 
जाता जाता वळूया अभिनयाकडे. सिंघमची भूमिका साकारणार्‍या अजय देवगणने तर कमालच काम केले आहे. शिवाय करिना, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि अर्जून कपूर यांनीही अतिशय उत्तम काम केले आहे. टायगर श्रॉफ केवळ अ‍ॅक्शन करताना आवडतो. पण, त्याचा अभिनय तितका भावत नाही. या सगळ्या कलाकारांमध्ये चित्रपटात रंगत आणली आहे, ती रणवीर सिंग याने. हनुमानरुपी रणवीरने हनुमान जेव्हा, सीता माता सुखरुप आहे का? हे पाहण्यासाठी रावणाच्या लंकेत जातो, तेव्हा तिथे जे घडते ते सारे काही अ‍ॅक्शनच्या माध्यमातून उत्तमरित्या दाखवले आहे. ज्याप्रमाणे आपल्या शेपटीने हनुमानाने लंकेला आग लावली होती, तशीच आग आधुनिकपद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आल्याच्या प्रसंगांमुळे, खरोखरीच अंगावर काटा येतो.
‘सिंघम अगेन’ हा चित्रपट रामायणातील प्रत्येक प्रसंग आधुनिक देशात घडत असणार्‍या घटनांना जोडूल्यामुळे अधिक प्रभावी वाटतो. रामायणातील प्रत्येक ठिकाणांची अचूक माहिती गोळा करुन, त्यांचे अस्तित्वदेखील यात दाखवण्यात आल्यामुळे नव्या पिढीला देशाचा अलौकिक इतिहासही जाणून घेण्यास मदत होते.
 
चित्रपट - सिंघम अगेन
दिग्दर्शक - रोहित शेट्टी
कलाकार - अजय देवगण, करिना कपूर, दीपिका पदूकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जून कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ
रेटींग - ⭐⭐⭐

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.