"काँग्रेसला भारतात आंबेडकरांचे संविधान नकोच!" अकोल्याच्या सभेत मोदींचा घणाघात
09-Nov-2024
Total Views |
अकोला : ( Akola ) महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. अशातच अनेक ठिकाणी प्रचार सभा सुद्धा जोमाने सुरू आहेत. अशातच महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रणांगणात उतरले आहेत. अकोल्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, जनतेसमोर विजयाचा महासंकल्प मांडण्यासाठी मोदींनी सभा घेतली. भगवान राज राजेश्वर आणि संत गजानान महाराजांना वंदन करून मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.
मोदी म्हणाले की " ९ नोव्हेंबर ही ऐतिहासिक तारीख आहे कारण याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरावर निर्णय दिला होता. या निकालानंतर सर्व धर्मातील लोकांनी संवेदनशीलता दाखवली." त्याच बरोबर २०१४ ते २०२४ महाराष्ट्रातील लोकांनी भाजपला आशीर्वाद दिला. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील लोकांची देशभक्ती, त्यांची दूरदृष्टी. महाराष्ट्रासाठी अनेक इन्फ्रा प्रोजेक्टस्चा पाया रचण्यात आला आहे. वाढवण बंदराच्या प्रकल्पासाठी ८० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतातील सर्वात मोठं पोर्ट इथे उभारण्यात येत आहे. माझ्या कार्यकाळात मी गरीब लोकांना ४ कोटी घरं बांधून दिली आहे. हे लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आता आम्ही ३ कोटी घरांचे निर्माण करत आहोत. या लोकांच्या पुण्याचे खरे भागीदार तुम्ही आहात, कारण तुमच्यामुळे आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. आमच्या सरकारने ७० वर्षांवरील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायचा निर्धार केला आहे आणि म्हणूनच वय वंदना आयुष्यमान कार्डचे वाटप करणे सुरू झाले आहे. सबका साथ, सबका विकासच्या भावनेतून ही योजना आखली गेली आहे, असे मोदी म्हणाले.
"आघाडीच्या लोकांना जे जमले नाही ते महायुतीने करून दाखवले. आम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सौभाग्य लाभले. ही मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट आहे. इथे अकोल्यातील लोकांचा आशिर्वाद मागायाला आलो आहे. भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. पुढच्या ५ वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाची योजना काय असेल याची झलक, आपल्याला महायुतीच्या वचननाम्यात बघायला मिळत आहे."
काँग्रेस पक्षावर निशाणा साधत मोदी म्हणाले "ज्या राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार आले ते राज्य काँग्रेसच्या शाही परवान्यासाठी एटीएम बनत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. सध्या तेलंगणा आणि कर्नाटक सारखी राज्ये हे काँग्रेसचे एटीएम बनले आहेत." सध्या कर्नाटकामध्ये वसुली डबल झाली असल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे. कर्नाटकात दारू दुकानदारांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली काँग्रेसने केली असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. घोटाळे करूनच निवडणूक लढवणारा काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करेल, याची कल्पना करा, असे आवाहन मोदींनी केले. महाराष्ट्र महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेससाठी एटीएम बनू देणार नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला देशात आंबेडकरांचे संविधान नकोच!
केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे समर्थन असलेले सरकार आल्यानंतरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळाला होता. काँग्रेसने त्यांना भारतरत्न तोपर्यंत दिला नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव करून त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून अनेक निर्णय घेतले. मात्र त्यांच्या या कार्याचे श्रेय काँग्रेसच्या परिवाराने स्वतःकडे घेतले, असा आरोप देखील मोदी यांनी केला. आमच्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीर्थक्षेत्रांना पंच तीर्थ म्हणून विकसित केले. मात्र, काँग्रेसच्या शाही परिवारातील एकही सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थावर आजपर्यंत गेला नसल्याचा आरोप मोदी यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत लागू करण्याची मागणी करणे म्हणजेच जम्मू-काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू न होण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आजपर्यंत देशात दोन संविधान होते. मात्र आम्ही देशात एकच संविधान लागू केले. संविधान निर्मितीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले जाते, याचा काँग्रेसला त्रास होत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू झाले आहे. भारत विरोधी शक्ती पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्याची मागणी करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला देशात आंबेडकरांचे संविधान नको असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
विविध जातींमध्ये भांडणं लावण्याचे काम काँग्रेस पक्षाने आजवर केले आहे. देश जितका कमकुवत होईल, तितका काँग्रेस पक्ष मजबूत होईल. म्हणून आता २० नोव्हेंबर रोजी तुम्हाला विकासाची निवड करायची आहे. आपण सगळे मिळून समृद्ध महाराष्ट्र घडवूया. कुठलाही सर्वे कामाला येणार नाही. हा विजयाचा विश्वास आहे. आपण सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात त्या बद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.