उडाले ससाणे, एकवटले तुर्क

Total Views |
 
World Nomad Games
 
जगामध्ये समान विचाराने भारलेले लोक एकत्र येऊन, एक विचाराने ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये विचारांचा प्रसार अधिक व्हावा, आणि अधिकाधिक पाठिंबा आपल्या विचारांना मिळावा यासाठी विविध संघटना तयार होतात. त्यांच्यामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात.‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’ हा त्याचाच एक प्रकार होय. त्याचा घेतलेला धांडोळा...
 
ते पाहा शहर अस्ताना. कझाकस्तान देशाची राजधानी. शहरालगत एका खूपच विस्तीर्ण मैदानावर खूपच गडबड, गोंधळ, धावपळ चालू आहे. मात्र, त्या गोंधळाला एक शिस्त आहे. घोडे वेड्यावाकड्या आणि तरीही शिस्तबद्ध उड्या मारत आहेत. कारण, त्यांचे लगाम ज्यांच्या हातात आहेत, ते घोडेस्वार फारच निष्णात आहेत. घोड्याला वाटेल तसा वळवून ते बकर्‍याची शिकार शत्रूकडून, आपल्या ताब्यात घेण्याचा निकराचा प्रयत्न करत आहेत. अरे, पण हे काय? तो मेलेला बकरा रबराचा बनवलेला वाटतोय, खरा वाटत नाहीये आणि इकडे ही कसली बेफाम दंगल सुरू आहे? बाप रे! दोन चपळ आणि दांडग्या बायका घोड्यांवरुन दौडत एका रिंगणात आल्या आहेत, नि घोड्यावर बसल्याबसल्याच त्या चक्क एकमेकींशी कुस्ती खेळत आहेत. एकमेकींना घोड्यावरुन खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे करताना त्या शहरी बायकांच्या नळावरच्या सुप्रसिद्ध भांडणांप्रमाणे ना एकमेकींच्या झिंजा उपटत आहेत, ना एकमेकींच्या बेचाळीस पिढ्या उद्धरत आहेत. जीव खाऊन भांडणार्‍या दोन बायका अगदी अगदी गप्प राहून भांडतायत हे आर्श्चयच. अरे, ती पाहा बाजूच्या रिंगणात आणखी एक महिला घोड्यावरुन दौडत आली. रिंगणात येताक्षणी तिने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणली आणि दौडत्या घोड्यावरुन सरासर तीन बाण सोडून, अचूक लक्ष्य टिपले. अरे, त्या पलीकडच्या रिंगणात पाहा, मुघल पेन्टिंगमध्ये तो पोट सुटलेला अकबर बादशहा दाखवतात ना, उजव्या हातात शिकारी ससाणा वगैरे घेऊन उभा असलेला, तसे बरेच जवान पोर्‍ये तिथे उभे आहेत. काहींच्या हातांवर किंवा खांद्यावर गरुड आहे; काहींच्या हातांवर ससाणा आहे; तर काहींच्या हातांवर बहिरी ससाणा आहे. गरुड किंवा साधा ससाणा यांच्यापेक्षाही, बहिरी ससाणा हा जास्त तरबेज शिकारी पक्षी असतो. हे सगळे पक्षी आणि त्यांचे मालक पोर्‍ये वाट पाहातायत पंचांच्या शिट्टीची.
 
होय, हा सगळा गोंधळ शिस्तीत चाललाय. कारण, हे मैदान आहे. ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स २०२४’ या क्रिडास्पर्धेचे. सप्टेंबर २०२४ मध्ये ही स्पर्धा कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे पार पडली सुद्धा. यात आपला भारत देश सुद्धा सहभागी झाला होता आणि एक सुवर्ण, पाच कांस्य अशी एकूण सहा पदकांची कमाई आपण इथे केली.
 
आपल्याला याचा पत्ताच नाही, कारण आपल्या प्रसारमाध्यमांना दुर्दैवाने क्रिकेट खेरीज दुसरे काही दिसतच नाही. मार्च २०२४ मध्ये आय.पी.एल. क्रिकेट स्पर्धा झाल्या. जुलै २०२४ मध्ये प्रथम ऑलिम्पिक आणि मग पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पाडल्या. त्यामुळे सप्टेंबर २०२४ मधल्या ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’कडे, माध्यमांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही.
 
भारताच्या उत्तरेला हिमालयाच्या पलीकडे चीन आहे. चीनच्याही उत्तरेला मंगोलिया हा देश आहे. या मंगोलियापासून पश्चिमेकडे रशिया-कझाकस्तान ते युरोपात युक्रेनपर्यंतच्या प्रदेशाला, ‘स्टेप्स’ असे म्हणतात. या प्रदेशात मैलोन मैल नुसते गवत किंवा खुरटी झुडपे उगवतात. या प्रदेशात शतकानुशतके अनेक टोळीवाले लोक राहतात. जमीन शेतीयोग्य नसल्यामुळे, हे लोक सतत भटकत असतात. त्यांच्या ‘भटके’ पणातही काही प्रकार आहेत. काही टोळ्या शिकार आणि कंदमुळे यावर जगतात, तर काही टोळ्या शेळ्या-मेंढ्यांचे मोठमोठे कळप बाळगतात. काही टोळ्या उत्तम लोहारकाम करतात, तर काही टोळ्या कॅस्पियन समुद्रात नि काळ्या समुद्रात मच्छिमारी सुद्धा करतात. या भटक्या टोळीवाल्यांना युरोपात ‘नोमॅड’ असे म्हटले जाते. साधारपणे सगळेच भटके लोक उत्तम शिकारी, उत्तम घोडेस्वार, उत्तम तिरंदाज आणि पक्के लढवय्ये असतात. शतकानुशतकांचा त्यांचा जीवनक्रमच असा आहे की, सतत संघर्ष करुनच ते जगत आले आहेत.
 
ज्यांच्या नावाच्या शेवटी ‘स्तान’ हे उपपद लावले जाते, असे सात देश आजमितीला जगात आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, किरगिजस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि कझाकस्तान. आता गंमत पाहा हं, यात हिंदुस्तान नाही. कारण, इंग्रजांच्या काळात ते आपल्याला हिंदुस्तान किंवा इंडिया म्हणायचे. स्वातंत्र्यानंतर आपणच हिंदुस्तान ऐवजी, ‘इंडिया दॅट इज भारत’ असे नाव घेतले. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे देश मूळचे भारताचेच प्रदेश आहेत. तिथल्या आजच्या रहिवाशांनी कितीही हुशार्‍या मारल्या, तरी ते मूळचे हिंदू आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, हे उरलेले जे पाच देश आहेत, तिथले रहिवासी हे तुर्क वंशाचे आहेत.
 
पण, मग त्यांच्या देशांच्या नावात ‘स्तान’ हा ‘स्थान’ म्हणजे ठिकाण अशा अर्थाचा संस्कृत शब्द कुठून आला? छे, छे! तो संस्कृतचा अपभ्रंश शब्द नव्हेच मुळी. स्तान हा फारसी भाषेतला शब्द आहे. इंग्रज सरकार भारताला हिंदु‘स्तान’ म्हणत असे, हिंदु ‘स्थान’ नव्हे. कारण, त्यांनी भारत हिंदूकडून नव्हे, तर मुघलांकडून जिंकून घेतला होता आणि मुघली कागदपत्रांत भारताला हिंदु‘स्तान’ म्हटले जात असे.
 
नुसत्या एका शब्दावरून इंग्रजांनी पारसी भाषा संस्कृतपेक्षा प्राचीन कशी ठरवली, हा अतिशय सूक्ष्म नॅरेटिव्ह लक्षात आला का? त्याचप्रमाणे, अरे हिंदू राष्ट्रीय नेत्यांनो, जास्त गडबड करु नका; आम्ही भारत तुमच्याकडून नव्हे, तर मुघलांकडून जिंकून घेतला, हा इंग्रजी विकृत दावा लक्षात आला का?
 
असो. तर या पाच तुर्कवंशीय राष्ट्रांमध्ये कझाकस्तान हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा, तर ताजिकिस्तान हा सर्वात छोटा देश आहे. या देशांसह शेजारचे चीन, मंगोलिया हे आशियाई देश नि रशिया अझरबैजान, हंगेरी, सायप्रस या युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुर्कवंशीय लोक राहतात. त्यांच्यापैकी अनेक जणभटके सुद्धा आहेत. उदा. रशियातले तार्तार किंवा तातार लोक पाहा. काही तार्तार टोळ्या आता एका जागी स्थिरावून शेती किंवा तत्सम स्थिर उद्योगधंदा करत आहेत, तर काही तार्तार टोळ्या आजही भटके जीवन जगत आहेत.
 
या भटक्या टोळीवाल्यांचे स्वतःचे असे काही खास खेळ, क्रीडाप्रकार आहेत. बहुतेक प्रकार त्यांच्या दैनंदिन आयुष्यासारखेच लढाईचे, शिकारीचे, आडदांड दांडगाईचे आहेत. किरगिजस्तानचे राष्ट्राध्यक्ष अल्माझबेक आलमबायेव्ह यांना कल्पना सुचली की, केवळ या भटक्यांच्या खेळांची एक जागतिक स्पर्धा भरवावी. २०१४ साली त्यांनी स्वतःच्याच देशात तशी स्पर्धा भरवली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त मध्य आशियाच नव्हे, तर युरोप आणि अमेरिकेतल्या भटक्या जमातींचे खेळाडूही त्या-त्या देशांनी आवर्जून पाठवले. मग २०१६, २०१८ अशा दर दोन वर्षांनी भरवलेल्या स्पर्धा पार पडल्या. २०२० साली कोविडमुळे सगळाच कारभार ठप्प होता. २०२२ साली चौथी क्रीडास्पर्धा तुर्कस्तान देशाने आपल्याकडे घेतली. आता २०१४ साली पार पडलेल्या पाचव्या स्पर्धेत, भारत प्रथमच सहभागी झाला होता. निदान यावेळी तरी, लडाख आणि नागालँड या दोनच प्रांतातल्या भटक्या जमातीच्या खेळाडूंना भारत पाठवू शकला. २०२६ साली ही संख्या नक्कीच वाढलेली दिसेल.
 
आता आपण जरा तुर्कस्तान देशाची गंमत पाहू. तुर्कस्तान या देशाला आपण केमाल पाशांचा देश म्हणून ओळखतो. केमालने तुर्कस्थानला मध्ययुगीन मुसलमानी बोकडदाढ्या, फेज टोप्या, धुर्रट घाण वास मारणारे बुरखे यांच्या जंजाळातून मोकळे करुन, एकदम अद्ययावत युरोपीय बनवले, हे आपल्याला माहीत असते. पण, आपण ज्याला तुर्कस्तान म्हणतो, तो देश स्वतःला ‘टर्की‘ म्हणवतो आणि मध्य आशियातल्या वर उल्लेख केलेल्या पाच तुर्कवंशीय देशांचा उल्लेख ’तुर्कस्तान’ या सामान्य शब्दाने करतो. कारण, हे मध्य आशियाई देश ही तुर्कवंशीय टोळ्यांची मूळ भूमी होती. इसवी सनाच्या ८ व्या-९ व्या शतकापर्यंत हे लोक, चीनच्या सम्राटाचे अंकित होते. साधारण ९ व्या शतकात अरबांनी त्यांना जिंकले आणि मुसलमान बनवले. मग त्यांच्या अनेक टोळ्यांपैकी सेल्जुक तुर्क नावाची टोळी, कॅस्पियन समुद्र ओलांडून अनानोलिया या प्रदेशात आली. तिथल्या ग्रीकांना आणि रोमनांना त्यांनी पिटावून लावले. पुढे हे सेल्जुक तुर्क अनानोलियातच स्थिरावले. त्यांनी त्यांचे मालक असणार्‍या अरबांचाही पराभव केला आणि इस्लामचे सर्वोच्च पद जे खलिफा ते अरबांच्या बगदादहून अनानोलियाच्या इंस्तंबूलमध्ये खेचून आणले. हे तुर्क साम्राज्य ७०० वर्षे टिकले. त्यामुळे जगाला, अनानोलिया हाच मूळ तुर्कस्तान वाटू लागला. याउलट मध्य आशियातले मूळ तुर्कवंशीय देश हळूहळू रशियाच्या झार सम्राटांनी गिळंकृत केले. झारशाही संपल्यावर ते देश आपोआपच सोव्हिएत रशियाचे अंकित देश झाले. १९९१ साली सोव्हिएत साम्राज्य कोसळल्यावर त्यांनी मोकळा श्वास घेतला.
 
२००६ साली कझाकस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नूरसुलतान नजरबायेव्ह यांच्या डोक्यात आले की, अरब वंशीय देशांची एक संघटना आहे; मग, तुर्कवंशीय देशांची का नसावी? त्यांनी त्यानुसार हालचाली सुरू केल्या आणि २००९ साली ’ऑर्गनायझेेशन ऑफ टर्किक स्टेटस्’ उर्फ ‘ओ.टी.एस.’ ही संघटना अस्तित्वात आली. तिच्यात मध्य आशियातल्या पाच देशांसह अझरबैजान, हंगेरी, तुर्कस्तान (टर्की) आणि उत्तर सायप्रस एवढे देश आहेत. या देशांचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की, गेली किमान अडीचशे वर्षे त्यांच्या देशावर रशियाचा (प्रथम झार आणि मग सोव्हिएत) जो प्रचंड प्रभाव आहे, तो दूर करणे आणि रसीप तय्यीप एर्दोगन यांच्या टर्की देशाशी संबंध वाढवणे. ’वर्ल्ड नोमॅड गेम्स’ स्पर्धेला हादेखील एक पैलू आहे.
 
पण, गंमत अशी आहे की, एखादा किरगिझ व्यापारी नि उझबेक व्यापारी धंद्याच्या वाटाघाटी करायला बसले, तर त्यांना स्व-भाषे खेरीज ना तुर्की येते, ना इंग्लिश येते, रशियन मात्र उत्तम येते. मग, ते व्यवहार त्याच भाषेत करणार ना! ते कसेही असले, तरी मध्य आशिया टर्कीशी संबंध वाढवतोय, हे निश्चित.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.