पाकिस्तानी अजेंडा नहीं चलेगा! जम्मू काश्मीर विधानसभेत भाजपचा घणाघात
कलम ३७० लागू करण्यास भाजपचा कडाडून विरोध, प्रस्तावाच्या केल्या चिंध्या
07-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली :(Jammu and Kashmir Legislative Assembly) 'जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा हैं’, ‘पाकिस्तानी अजेंडा नहीं चलेगा’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन भाजप आमदारांनी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेस सरकारच्या ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याच्या प्रस्तावास कडाडून विरोध करून प्रस्तावाच्या बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी चिंध्या केल्या.
‘कलम ३७०’ संपुष्टात आणल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात नॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला हे सरकारचे नेतृत्व करत आहेत. नव्या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात सत्ताधार्यांनी आपले खरे रंग दाखवून, भारतविरोधी अजेंडा रेटण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, आता भाजपच्या रुपात सक्षम आणि धडाडीचा विरोधी पक्ष समोर असल्याने भारतविरोधी अजेंडा रेटणे सोपे नसल्याची जाणीवही सत्ताधार्यांना झाली आहे.
सत्ता आल्यास ‘कलम ३७०'पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन नॅशनल कॉन्फरन्सने दिले होते. त्यानुसार, बुधवारी नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभेचे कामकाज सुरू होताच, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी विशेष दर्जा पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामध्ये दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी काढण्यात आलेले ‘कलम ३७० पुन्हा बहाल करण्याचा मनसुबा होता. प्रस्तावात म्हटले की, “राज्याचा विशेष दर्जा आणि घटनात्मक हमी महत्त्वाच्या आहेत. हे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या अस्मिता, संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करते. हे कलम एकतर्फी काढून टाकल्याविषयी ही विधानसभा चिंता व्यक्त करत आहे. राज्याच्या विशेष दर्जाबाबत केंद्र सरकारने येथील प्रतिनिधींशी चर्चा करावी. त्याचप्रमाणे, घटनात्मक बहाली कशी देता येईल, यावर काम होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या इच्छा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन व्हायला हवे, यावर विधानसभा भर देते.”
या प्रस्तावास अपक्ष आ. शेख खुर्शीद आणि शब्बीर कुल्ले, ‘पीपल्स कॉन्फरन्स’चे प्रमुख सज्जाद लोन आणि पीडीपी आमदारांनी पाठिंबा दिला. जम्मू विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला विरोध केला. “विधानसभा अध्यक्षांनीच मंगळवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सभापतींनी मंत्र्यांची बैठक बोलावून स्वतः प्रस्ताव तयार केल्याची माहिती आपल्याकडे आहे,” असे शर्मा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, “नायब राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचे कामकाज ठरलेले असताना अचानक हा प्रस्ताव कसा आणला?” असाही सवाल शर्मा यांनी विचारला. विधानसभेत झालेल्या गदारोळातच विधानसभेचे अध्यक्ष अब्दुर रहीम राथेर यांनी या प्रस्तावावर मतदान केले, त्यानंतर हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.
धूडगूस आणि बॅनरबाजी
इंजीनर रशीद आणि अपक्ष आमदार शेख खुरशीद यांनी बॅनरबाजी करत गुरूवारी दिनांक ७ नोव्हेंबर सकाळी पुन्हा एकदा संघर्षाला तोंड फोडलं. सर्व राजकीय कैद्यांची सुटका करावी आणि राज्याला कलम ३७० पुन्हा बहाल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधक अशातच एकमेकांच्या समोर उभे ठाकले आणि याचे पर्यावसन वादात झाले. हा सगळा प्रकार सुरू असतानाच, पीडीपीचा वहीद पारा, फियाज मीर, सजीद गोन लोन यांनी पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्याची मागणी करण्यात आली. सत्तेत आल्यावर अखेर नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसने आपले खरे रंग दाखवले अशी चर्चा आता होत आहे.
सभागृहात आणि सभागृहाबाहेरही भाजप आक्रमक
भाजप सदस्यांनी सत्ताधार्यांच्या या प्रस्तावास विधानसभेत विरोध केला. भाजप आमदारांनी गदारोळ केला. त्याचप्रमाणे, विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन प्रस्तावाच्या प्रती फाडून त्याच्या चिंध्या केल्या. ‘ऑगस्ट ५ झिंदाबाद’, ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम्’, ‘अँटीनॅशनल अजेंडा नहीं चलेगा’, ‘अँटी जम्मू अंजेडा नहीं चलेगा’, ‘पाकिस्तानी अजेंडा नहीं चलेगा’ अशी घोषणाबाजी केली. सभागृहाबाहेरही भाजपने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या पुतळ्यास चपला मारून आणि पुतळा जाळून निषेध केला.