बालपणापासून कलेला समर्पित सिद्धी संदीप आंबेकर आज सर्वार्थाने कलेचा हाच समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
कला म्हणजे एखाद्याच्या विचारांची आणि भावनांची अभिव्यक्ती. जेव्हा लोक समान श्रद्धा, दृष्टिकोन आणि मूल्ये सामायिक करतात, तेव्हा ती त्या राष्ट्राची संस्कृती बनते, जी कलाकार त्यांच्या कलेतून पकडण्याचा किंवा प्रकट करण्याचा प्रयत्न करतात. सिद्धी संदीप आंबेकर (माहेरच्या रुपा शिवराम माने) या अशाच एक कलाकार, ज्या आपले घर, कार्यालयातील काम सांभाळून आपली कलादेखील जोपासत आहेत. कलाक्षेत्रासाठी त्यांनी जणू आपले सर्वस्व अर्पण केले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
ग्रॅण्ट रोड, गिरगाव येथे दि. २ ऑगस्ट १९७२ रोजी जन्मलेल्या सिद्धी आंबेकर यांना बालपणापासूनच कलेची आवड. त्यात चित्रकला असो, टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी बनवणे असो, अशा सर्वांची आवड त्यांना बालवयातच लागली होती. एका लहानशा घरात आई, वडील, पाच भावंडे, काका-काकू, त्यांची मुले असे त्यांचे एकत्र कुटुंब. वडिलांचा चपलांचा व्यवसाय होता. एकत्र कुटुंब असल्याने घरातही कायम आनंदी वातावरण. ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या धरमसिंग गोविंदजी ठाकुर शाळेत त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पूर्वीपासूनच चित्रकलेची आवड असल्याने अकरावीनंतर कलाक्षेत्रातच पुढे शिकायचे असे सिद्धी यांनी ठरवले. चर्चगेटच्या एसएनडीटी महाविद्यालयामध्ये त्यांनी ‘फाईन आर्ट्स’मध्ये पदवी प्राप्त केली. त्याकाळात त्याचे वेगळेपण म्हणजे लाकडापासून, रेतीपासून, मेणापासून इतकेच नाही, तर अगदी टिश्यू पेपर आणि लाकडाच्या भुशापासूनही त्यांनी पेंटिंग्ज तयार केल्या आहेत.
मुंबईच्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तिथे त्यांच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक उमेश अहिरे यांनी सिद्धी आंबेकर यांचे काही पेंटिंग्ज ठेवले होते. प्रदर्शनातील इतर तोडीसतोड पेंटिंग्ज असताना त्यांच्या पेंटिंग्जना द्वितीय पारितोषिक मिळणे, ही त्यांच्यासाठी एकाअर्थी अभिमानाची गोष्ट होती. त्यानंतर १९९४ रोजी ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये ’सोसायटी वुमन्स-९४’ म्हणून प्रदर्शन भरले होते. तेव्हा सिद्धी यांनी आपल्या चित्रांचे पहिले प्रदर्शन तिथे भरवले होते. एकूण १५ पेंटिंग्ज त्यांनी मांडल्या होत्या. तेव्हा एका युरोपीय कलाप्रेमीने सिद्धी यांची चार सॅण्ड पेंटिंग्ज (वाळूपासून तयार केलेले चित्र) खरेदी केली होती. परदेशातील व्यक्तीलासुद्धा भारतातील एका कलाकाराचे चित्र भावले, या विचाराने सिद्धी त्याक्षणी भारावून गेल्या होत्या.
१९९६ मध्ये सिद्धी संदीप आंबेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर काही काळ कलेपासून त्या काहीशा दुरावल्याही. मात्र, माहेरच्यांप्रमाणे सासरची मंडळी त्यांच्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभी होती की, सिद्धी यांनी लहान शिशु वर्गापासून ते दहावीपर्यंतच्या मुलांना चित्रकला शिकवण्यास सुरुवात केली. आपल्याला अवगत असलेले कलेचे धडे त्या मुलांपर्यंत पोहोचवू लागल्या. महिन्याला १०० मुलांची शिकवणी त्या न चुकता घेऊ लागल्या. २०११-१२ सालापर्यंत मुलांना शिकवले. टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांना टिकाऊ कसे बनवायचे, हे मुलांना जेव्हा कळायला लागले, तेव्हा त्यांनी प्रत्येक टाकाऊ गोष्टींपासून नवनवीन कलाकृती मांडायला सुरुवात केली. आज सिद्धी अगदी चाळीशी ओलांडलेल्या महिलांनाही कॅनवास पेंटिंग्ज शिकवत आहेत.
त्यांची आपल्या कलेशी जोडलेली नाळ २०१४ ते २०१७ ही तीन वर्षे तुटली होती. २०१४ रोजी त्यांच्या सासूबाईंना कर्करोगाचे निदान झाले. त्यामुळे घरी लक्ष देणे प्राधान्य असल्याने सर्व नियमित शिकवण्या बंद झाल्या. सासू बर्या होत नाहीत, तोवर त्यांच्या आईंनाही कर्करोग झाल्याचे समजले. त्यामुळे २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत इच्छा असतानाही त्यांना आपली कला जोपासता आली नाही. त्यानंतर ‘कोविड’ महामारीचा काळ सुरु झाला. या काळात मात्र त्यांनी ऑनलाईन पद्धतीचा पुरेपूर वापर करून घेतला. ऑनलाईन वर्ग सुरु केले. पुन्हा नव्याने विद्यार्थी जोडले गेले. एकाअर्थी नव्याने श्रीगणेशा झाला. सिद्धी यांच्याबाबतची कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, आजही न चुकता त्या निरनिराळ्या चित्रकला प्रदर्शनांस, कलेशी संबंधित कोणत्याही प्रदर्शनास आवर्जून भेट देतात. कारण, आजच्या पिढीची चित्रे त्या जेव्हा पाहतात, तेव्हा नवीन काहीतशी शिकायला मिळते. त्यांच्या चित्रात तोच तोचपणा नसून काहीतरी वेगळेपण असते, असे त्या म्हणतात.
घर, कार्यालय सांभाळून त्या आपली कला जोपासत आहेत. एखादी ऑर्डर आली की त्या रात्री बसून काम पूर्ण करतात किंवा शनिवार, रविवारी बसून ते मार्गी लावतात. पण, त्यात त्यांनी कधी टाळाटाळ केली नाही. त्यांच्या मते, चित्रकला म्हणजे तणाव नाही, तर मन प्रसन्न करण्याचे ते एक माध्यम आहे. ते पाहूनच मनाला शांतता मिळत असेल, तर चित्र काढण्यातही वेगळीच मजा आहे. विद्यार्थ्यांचे पालक भेटले की ते त्यांच्याकडून येणारी कौतुकाची थाप हीच त्यांच्यासाठी मौल्यवान गोष्ट आहे. ज्याप्रमाणे वाचन जोपासायला हवे, त्याप्रमाणे चित्रकलाही जोपासायला हवी, असे त्या कायम म्हणत असतात. सिद्धी यांनी ‘कलागुर्जरी’ या गुजराती संस्थेची अनेक पारितोषिके पटकावली असून, सध्या ‘गोंड आर्ट’, ‘मधुबनी’, ‘अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज’ यात त्यांचे काम सुरु आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे सिद्धी आंबेकर यांना पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!