निवडणूक जवळ आली म्हणून ‘लाडकी बहीण’ दिसते. १ हजार, ५०० रुपये देऊन कोणाचे घर चालते, हे सांगावे.” इति उद्धव ठाकरे. अर्थात, पैशाची किंमत कोणाला? ज्यांना कमतरता आहे त्यांना! तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना १ हजार, ५०० काय, १५ कोटी रुपयेदेखील चिल्लरच वाटतील. १०० कोटींचे प्रकरण ज्यांच्या सत्ताकाळात घडले, त्यांना १ हजार, ५०० रुपयांची काय कदर? काही लोक म्हणतात, उद्धव ठाकरेंना हे विचारण्याचा अधिकार आहे. कारण, त्यांच्या ३४ वर्षांच्या ‘लाडक्या बाळा’ची संपत्ती २३ कोटी आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सोबत्यांनाही त्या १ हजार, ५०० रुपयांची काय किंमत असेल?
या पार्श्वभूमीवर वाटते की, ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ झालेल्या आयाबायांना विचारा. कोरोना काळात सत्ता यांचीच होती. कोरोनाने हाहाकार माजवला. त्यावेळी केवळ ‘कोमट पाणी प्या, घरात राहा’, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे हे म्हणत राहिले. तेही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नाही, तर ‘फेसबुक लाईव्ह’ करून! महाराष्ट्रातील अनेक घरांतील कर्ते पुरुष कोरोनामध्ये बळी गेले. काही घरांत तर केवळ आयाबाया उरल्या. कोरोनापूर्वी त्यांचे चांगले होते. घर-संसार सांभाळत त्या जगत होत्या. कसलीच ददात नव्हती. पण, अचानक घरचा कर्ता पुरुष गेला. या आयाबायांनी लाज सांभाळत मिळेल ते काम केले. एक एक रुपयाला त्या मोहताज झाल्या. त्यावेळी पंतप्रधान मोदींकडून त्यांच्या खात्यात ५०० रुपये आले. आपले कोणीतरी आहे, म्हणून कृतज्ञतेने हमसून हमसून रडताना ज्यांनी या आयाबायांना पाहिले, त्यांना माहीत आहे, या १ हजार, ५०० रुपयांची कदर. ‘लाडकी बहीण योजने’वर प्रश्न उठवणार्या उद्धव ठाकरेंनी दुसरीकडे कोल्हापूरमध्ये लोकांवर आश्वासनांची खैरात केली. पण, ती आश्वासने पूर्ण कशी करणार, याबद्दल काही सुतोवाच केले नाही! सत्तेत आल्यावर महिलांना दर महिन्याला २ हजार, ५०० रुपये देऊ, ‘खटाखट’ ८ हजार, ५०० रुपये देऊ म्हणणारा काँग्रेस पक्षही उद्धव ठाकरेंसोबत आहे. मात्र, कर्नाटकात सत्तेत येताच पटापट ही आश्वासने काँग्रेस विसरून गेले. या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे ब्रदेखील काढत नाहीत. इतकी काय लाचारी असेल? ‘दिल्लीपुढे झुकणार नाही, वाकणार नाही’ म्हणणार्यांची सोनिया काँग्रेस आणि शरद पवार गटापुढे झुकण्याइतकी लाचारी का असेल? हिंदुत्वाचा प्रवास हिंदूविरोधी का झाला? कुणी सांगेल का? ये क्या हुआ?
होय ना साहेब!
दीड वर्षाने राज्यसभेवर जायचे की नाही, याचा तुम्ही विचार करणार आहात साहेब. नकाच जाऊ! सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या हो! पुलोद आघाडीपासून आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यावेळी तुमच्यासोबत असणार्या अनेकांची लाकडे स्मशानात गेली. राख झाली. त्यानंतर त्यांचीच दुसरी-तिसरी पिढीसुद्धा तुमच्यासोबत आहे. मागे ‘घड्याळा’चे काटे मोजत होते, आता ‘तुतारी’ फुंकत आहेत. द्या त्यांना एक डाव संधी. हे सायब तुमचं काय पटं ना बघा! २०१९ साली मुख्यमंत्री कोण होणार, तर तुम्ही उबाठा साहेबांचा हात वर केला. म्हणजे, असे तुम्ही म्हणालात. खासदारकी, आमदारकीसुद्धा तुमच्याच खानदानातल्या सगळ्या वारसदारांना. तुमचे वारसदार हे नेते होण्यासाठीच जन्मले आणि आमचे वारसदार तुमच्यासाठी निवडणूक प्रचार करायला, लोक जमवायला, मोर्चे, आंदोलने करायला जन्मले, असेच आहे.
साहेब, तुम्ही म्हणालात की, तुम्ही आमदार झाल्यावर विचार करायचा की, तुमच्या मतदारसंघात कोणत्या योजना राबवायच्या. पण, पुढे चारवेळा महाराष्ट्राचे मंत्री झाल्यावर महाराष्ट्रात काय घडले? शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत काय घडले? छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन फुटीरतावादी भूमिका घेणारे तुमच्या मांडीला मांडी लावून बसले; तुमच्या गळ्यातील ताईत झाले. आमच्या लेकरांना आम्ही हिंदू म्हणून वाढवतो, संस्कार देतो, आमच्या घरात देव पुजले जातात. पण, तुम्ही तर म्हणालात, साल्यांनो, मी तुमच्या देवाचा बाप आहे! साहेब, तरीपण आम्ही तुम्हालाच नेता मानायचे का? तुम्ही म्हणालात, दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. साहेब, कोणी वयामुळे निवृत्त व्हावे, असे नाही. पण, आपली गरज खरंच आहे का, हा विचार ज्याचा त्याने करावा की नको? साहेब, भाकरी फिरवायला पाहिजे ना? पण, तुम्ही तर भाकरीऐवजी तवा बदलता. आता काय बारामतीमध्ये नेतृत्वबदल करायचा म्हणताय. पण, तुमच्या मते बदलणारे नेतृत्वपण तुमच्याच घरचे युगेंद्र पवार. याचाच अर्थ, पुढे युगेंद्र ५० वर्षे आमदार राहायचे. आम्ही त्यांच्यासाठी काम करायचे. आम्ही मेल्यानंतर आमच्या लेकरांनी आणि लेकरं गेल्यानंतर आमच्या नातवंडांनी त्यांच्यासाठी काम करायचे. होय ना साहेब?
योगिता साळवी
९५९४९६९६३८