कलम ३७० पुनर्स्थापित करण्यास जम्मू काश्मीरच्या प्रस्तावास विधानसभेत मंजुरी!

    06-Nov-2024
Total Views |
 
JK
 
मुंबई : ( Restoration of Article 370 ) केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथे १० वर्षांनी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी नवीन सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेने बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी केंद्रशासित प्रदेशाचा विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगणाऱ्या ठरावास मंजुरी दिली आहे.
 
विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) आमदार वाहिद पारा यांनी सोमवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी कलम ३७० रद्द करण्याच्या विरोधात ठराव मांडला. तसेच जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा बहाल मिळावा आणि कलम ३७० पूर्ववत व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आमदार पारा यांच्या या प्रस्तावाच्या निषेधार्थ प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत हा सूचीबद्ध कामकाजाचा भाग नसल्याचे सांगितले.
 
या ठरावाला भाजपने सभागृहात विरोध सुरूच ठेवल्याने विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. अखेर विधानसभा अध्यक्ष अब्दुर रहीम राथेर यांनी हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवला आणि बहुमताने प्रस्ताव मंजूर झाला. विरोधी पक्षनेते सुनील शर्मा आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत कामकाजातील बदलावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, "आज विधानसभेत उपराज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार होती, तेव्हा हा प्रस्ताव कसा मांडला गेला?". तसेच "विधानसभेने आपले काम केले आहे", अशी प्रतिक्रिया मंजुरीच्या निर्णयानंतर ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
 
भाजप अध्यक्ष रविंदर रैना यांची संतप्त प्रतिक्रिया
 
जम्मू-काश्मीर विधानसभेने कलम ३७० च्या पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केल्यावर, जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रविंदर रैना समाजमाध्यामांशी बोलताना म्हणाले, "भाजप नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा हा अजेंडा कधीच स्वीकारणार नाही. भाजप कधीच जम्मू-काश्मीर मध्ये कलम ३७० पुन्हा येऊ देणार नाही. कलम ३७० हे इतिहासजमा झाले आहे आणि ते पुन्हा कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही हे स्पष्ट आहे."
 
मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून वाहिद पारा यांचे कौतुक
 
पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी X वर पोस्ट शेअर करत कलम ३७० पुनर्स्थापनेचा प्रस्ताव मांडल्याबद्दल त्यांच्या पक्षाचे आमदार वाहिद पारा यांचे कौतुक केले. ‘जम्मू आणि काश्मीर विधानसभेत कलम ३७० रद्द करण्याला विरोध दर्शवल्याबद्दल आणि विशेष दर्जा बहाल करण्याचा ठराव मांडल्याबद्दल वाहिद पाराचा अभिमान वाटतो.’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.