नवी दिल्ली : ( Canada ) कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान्यांनी हल्ला केल्यानंतर ‘कॅनडियन नॅशनल काऊन्सिल ऑफ हिंदू’ (सीएनसीएच) या संघटनेने कॅनडियन राजकारण्यांना मंदिरात प्रवेश करू न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘सीएनएचएच’तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “ब्रॅम्प्टनमधील गोर रोडवर असलेल्या हिंदू मंदिराला हिंसक घटनेदरम्यान खलिस्तान समर्थक आंदोलकांनी लक्ष्य केले होते.
ज्याने कॅनडातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आंदोलक मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमले, बळजबरीने आवारात घुसले आणि मंदिराच्या सदस्यांवर शारीरिक हल्ला केला, ज्यामुळे हिंदू समाज हादरला आहे. हिंदू कॅनडियन लोकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. हिंदूंवरील धोकादायक घटनांच्या मालिकेचे हे ताजे उदाहरण आहे.”
हिंदू धर्मस्थळांच्या संरक्षणासाठी मजबूत सुरक्षा उपायांसाठी समुदायाने नेत्यांना वारंवार आवाहन करूनही त्यांनी वाढत्या शत्रुत्वाचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे संपूर्ण कॅनडामधील हिंदू मंदिरे आणि संस्था यापुढे राजकारण्यांना मंदिराच्या सुविधांचा राजकीय हेतूंसाठी वापर करू देणार नाहीत. जोपर्यंत ते खलिस्तानी अतिरेक्याचा मुद्दा सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंदिरात प्रवेश देणार नसल्याचा निर्णय हिंदूंनी घेतला आहे.