अत्ता हि अत्तनो नाथो!

    04-Nov-2024   
Total Views |
 
Vijay Mohite
 
‘अत्ता हि अत्तनो नाथो’ म्हणजे ‘तुच तुझ्या जीवनाचा कर्ताधर्ता’ या सूत्रानुसार स्वत:सोबतच, तरूणाईमध्ये रूजणारे तसेच पाली भाषा संवर्धक प्रा. विजय मोहिते यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
बाबा वारले. त्यानंतर तीन वर्षांनी आई वारली. नायगावच्या बीडीडी चाळीत आता खर्‍या अर्थाने अनाथ झालेले विजय एकटेच राहू लागले. वय तरी किती केवळ १८ व. विजय खासगी शिकवणी घेऊ लागले. शिकणे, शिकवणे याव्यतिरिक्त घरची सगळी कामे स्वत:च करायची. कधी आजारी पडले, तर स्वत:साठी अन्न शिजवायलाही होत नसे. अशा अनेक वेळी ते रात्री पाणी पिऊन झोपले. अशावेळी त्यांना त्यांच्या आईची खूप आठवण येत असे. तसेच, त्याकाळी त्यांच्या वयाची अनेक मुले त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागले होते. त्यांच्या जीवनात स्थैर्य होते. मात्र, त्यांच्याच वयाच्या विजयच्या जीवनात मात्र, त्यावेळी भाकरीचा संघर्ष अटळ होता. त्या कोवळ्या वयात विजय यांना कधी तरी वाटे ’आपले कोण आहे? आपण आत्महत्या करावी का?’ पण, त्याक्षणी तथागत गौतम बुद्धांचे विचार विजेसारखे त्यांच्या मनात चमकत. ते विचार म्हणजे
 
अत्ता हि अत्तनो नाथो,
को हि नाथो परी सिया
 
याचा अर्थ - ”तुमच्या जीवनाचे तुम्हीच शिल्पकार किंवा मालक आहात, दुसरा कुणीही नाही.” या प्रेरणादायी विचारांमुळे त्यांच्या मनातली निराशा पुन्हा आशेमध्ये परावर्तित होई. आपण आपले आयुष्य घडवूया, म्हणत ते निराशेच्या गर्तेतून बाहेर येत.
 
आज तेच विजय मोहिते मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय येथे पाली भाषा विभागाचे प्रमुख आहेत. पाली भाषा आणि समाजाच्या विकास संवर्धनासाठी काम करणार्‍या ‘प्रतिमा प्रतिष्ठान’ या संस्थेचे विश्वस्त आहेत. तसेच, ‘चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समिती’च्या शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. विचारवंत, कवी, साहित्यिक आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांचा ‘पंचनामा’ नावाचा कवितासंग्रहदेखील प्रकाशित झाला आहे. मुंबई ही तशी आंदोलनाची नगरी. विविध चळवळींचा उगम आणि लढा याच मुंबईतला. ८०च्या दशकापासून अशा एकंदर सर्वच सामाजिक आंदोलनाचा, लढ्याचा तत्त्वनिष्ठ मागोवा घेत, त्यातून समाजहित चिंतणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय मोहिते होय. डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स क्लब, वांद्रेचा ‘डॉ. बाबासाहेब समाजकार्य पुरस्कार’, ‘पंचशील जनसेवा संघा’चा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक कार्य पुरस्कार’, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार’, ’कोकणातील उद्योगधंदे काल, आज आणि उद्या’ या विषयावर संशोधनपर लेखाला ‘इतिहास संशोधन मंडळाचा पुरस्कार’, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथचा ‘ब्राईट बुद्धिस्ट पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. नायगावच्या बीडीडी चाळीतला केवळ पाणी पिऊन अनोश्या पोटी झोपणारा आईबाबाविना पोरका पोर ते विचारवंत कवी, पाली भाषेचा अभ्यासक, समाजमार्गदर्शक हा विजय यांचा प्रवास सोपा नाही. जावे त्यांच्या वंशी.
 
३०च्या दशकात विजय मोहितेंच्या आजोबांनी डॉ. बाबासाहेबांचे ‘शहरात चला’ हे भाषण ऐकले होते. त्यानंतर त्यांनी चिपळूणमधील द्रोणवली गाव सोडले आणि ते मुंबईत आले. त्यांचा मुलगा कृष्णा आणि सुनबाई द्रौपदी यांना एक मुलगा तो म्हणजे विजय. नायगावच्या बीडीडी चाळीतील १० बाय १२च्या खोलीत कृष्णाच्या कुटुंबासोबत इतर ३३ जण भाडेकरू राहायचे. मुंगी शिरायलाही जागा नसलेल्या घरात विजय यांचे बालपण गेले. बाबा जेमतेम कमवत असत आणि आई खाणावळी चालवत असे. पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत अथक कष्टाचे डोंगर ती उपसत असे. भाकरीचे पिठ मळून भाकर्‍या थापून, चपाती लाटून तिच्या हाताचे स्नायू वळले होते. पण, त्यातून सुटका नव्हती. या संपूर्ण कष्टातही या कुटुंबाने बाबासाहेबांच्या विचारांना जपले होते. घरात बाबासाहेबांचा फोटो होता. त्या फोटोकडे पाहत विजय यांचे वडील विजय यांना म्हणत, “हा बघ तुझ्या बापाचा बाप आहे.” विजय पाचवीला शिकत असताना जीजी पवार यांनी त्यांना ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे पुस्तक वाचायला दिले. तथागत बुद्धांची भाषा पाली होती. ती भाषा आपल्याला शिकायला हवी, ही जाणीव या पुस्तकामुळे विजय यांच्या मनात कोरली गेली. तसेच, त्यांना वाचनाची आणि कविता करण्याची आवड लागली. चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेले ‘बाबासाहेबांचा चरित्रात्मक खंड’ तसेच, कर्णाच्या जीवनावरची ‘मृत्युजंय’ कादंबरी याच काळात त्यांनी वाचले. पुस्तकांनी विजय यांचे किशोरमन संस्कारित झाले.
 
पण, आयुष्यात ती घटना घडली. इयत्ता दहावीला असताना विजय यांचे बाबा वारले. घरचा आधार गेला. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी आई वारली. तेव्हा विजय बारावीत शिकत होते. परिस्थितीने जगायला शिकवले. विजय यांनी बी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. पुढे अत्यंत समाजशील आणि कर्तृत्ववान अशा वृषाली धोत्रे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या सगळ्या काळात पाली भाषेच्या संवर्धनासाठी, तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या सामाजिक न्यायासाठी विजय काम करू लागले. ‘शिवराय ते भीमराय’ हा विषय घेऊन त्यांनी आजवर हजारो व्याख्यान केली. त्यांचे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत समाज-देशासाठी काम करत आहेत. सध्या विजय आर्यअष्टांग मार्गामधील सम्यक व्यायाम याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, या विषयावर ‘पीएचडी’ करत आहेत. यापुढे पाली भाषा संवर्धनासाठी आणि उत्कर्षासाठी काम करायचे, हे त्यांचे ध्येय आहे. प्रा. विजय मोहितेे म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या ‘अत्ता हि अत्तनो नाथो’ सूत्राचे मूर्त स्वरूपच होय.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.