व्हिएतनामी संगीत चित्रपट पहिल्यांदाच होणार हिंदीत प्रदर्शित

Total Views |
IFFI

पणजी : पणजी येथे नुकताच ५५वा ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ पार पडला. जगभरातील विविध भाषेतील चित्रपटांनी आपले प्रदर्शन जागतिक स्तरावर करत आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, यावर्षी इफ्फीमध्ये ‘फ्रजाईल फ्लॉवर’ हा व्हिएतनामी भाषेतील चित्रपट ( Musical Film ) सादर झाला असून, हा चित्रपट पहिल्यांदाच भारतात हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मायथ्यू विएन यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधत भारतात व्हिएतनामी चित्रपट का प्रदर्शित करावासा वाटला याबद्दल माहिती दिली.

‘फ्रजाईल फ्लॉवर’ हा चित्रपट युएसमध्ये आपली संगीत कला सादर करणार्‍या व्हिएतनामी संगीतकार महिलेच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि निर्मात्या मायथ्यू अधिक माहिती देत म्हणाल्या की, “आतापर्यंत हा चित्रपट व्हिएतनामी, फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत परदेशात प्रदर्शित करण्यात आला. मात्र, चित्रपटाची कथा ही संगीतसृष्टीवर आधारित असल्यामुळे भारतीय प्रेक्षक आणि भारतातील एकूणच संगीत क्षेत्राची कारकीर्द पाहता आम्ही भारतात हिंदी भाषेत हा चित्रपट हिंदी गाण्यासह प्रदर्शित करणार आहोत. त्यासाठी भारतातील एबीके मिडिया यांनी आम्हाला सहकार्य केले असून व्हिएतमानी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘फ्रजाईल फ्लॉवर’ हा पहिला व्हिएतनामी चित्रपट असेल जो भारतात हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.”

तसेच, या चित्रपटाने आतापर्यंत बर्‍याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये १६ पुरस्कारदेखील पटकावले आहेत. विशेष बाब म्हणजे भारतात ‘नवी दिल्ली चित्रपट महोत्सव’ आणि ‘जयपूर चित्रपट महोत्सवा’त या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे.

“फ्रजाईल फ्लॉवर’ या चित्रपटाची कथा एका सुरेल गायिकेचे जीवन सांगणारी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला संगीताचा अलौकिक वारसा लाभला आहे आणि त्यामुळे भारतीय प्रेक्षक या संगीत चित्रपटाला नक्कीच प्रतिसाद देतील,” अशी अपेक्षा मायथ्यू यांनी व्यक्त केली. “भारतात हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय भारतीय प्रेक्षकांना व्हिएतनामी चित्रपटात हिंदी गाणे पाहण्याचीदेखील आम्ही संधी देणार आहोत,” असे चित्रपटाच्या अभिनेत्री आणि निर्मात्या डॉ. जॅक्लिन यांनी सांगितले.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.