गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदमदेखील उपस्थित होती. चित्रपटाबद्दल आणि ‘इफ्फी’च्या प्रवासाबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने छाया कदम आणि गजेंद्र अहिरे यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा विशेष संवाद...
‘स्नो फ्लॉवर’ चित्रपटाची कथा मुळात कशी सुचली? आणि चित्रपटाच्या नावाचं गमक काय?
‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटाची कथा सूचण्याचं कारण म्हणजे ‘पिंपळ’ हा मी दिग्दर्शित केलेला चित्रपट, ज्यामध्ये प्रिया बापट आणि दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत होते, तर जिथे त्या चित्रपटाची कथा संपते, तिथून मला ‘स्नो फ्लॉवर’ ही कथा सूचली. कारण, अलीकडे मुलं मोठी होतात आणि परदेशात शिकण्यासाठी जातात आणि तिथेच कालांतराने स्थायिकही होतात. पण, त्यांचं मूळ म्हणजे ‘पिंपळ’ हे कुठेतरी भारतात असतं. कारण, त्यांचे वयोवृद्ध आईवडील भारतातच त्यांची वाट पाहत असतात. पण, आपल्याच झाडाच्या फांद्यांप्रमाणे असणारी आपली मुलं परदेशात आपलं करिअर जरी घडवत असली, तरी त्यांची नाळ ही भारतातच जोडली गेली आहे. त्यामुळे एका कुटुंबाची कथा सांगत आजी भारतात आणि नात रशियात असूनही, त्यांचा आत्मिक जिव्हाळा कसा जोडून राहू शकतो, याची गोष्ट ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळताना दिसत नाही? त्याविषयी काय सांगाल?
मराठी चित्रपटांचा नायक मुळात कथा असते. मराठी चित्रपटांना हिंदी किंवा अन्य भाषिक चित्रपटांप्रमाणे ‘सुपरस्टार’चा चेहरा नाही. मराठी लेखक, दिग्दर्शिक, निर्माते नातेसंबंध, संस्कृती यांना जोडून चित्रपट तयार करतात आणि त्यामुळे मराठी चित्रपट किंवा कथा प्रेक्षकांच्या मनाला एकतरी भिडते किंवा भिडत नाही. पण, एकदा चित्रपट प्रदर्शित झाला की आपलं काम पूर्ण झालं, असं होत नाही. त्यानंतर तो चित्रपट महाराष्ट्रातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचेल, यासाठी त्याची प्रसिद्धी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, सध्या मराठी चित्रपटसृष्टीचा हिंदीसह दाक्षिणात्य आणि इंग्रजी भाषिक चित्रपटांशीही आमना-सामना होत असल्याकारणाने आपला या शर्यतीत निभाव लागण्यासाठी मराठी चित्रपटांनी प्रसिद्धीवरही भर देणं गरजेचं आहे आणि तसं केल्यास बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळण्यास नक्कीच मदत होईल.
छायाताई, तुम्ही आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. पण, ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटातील भूमिका किती जवळची आणि किती वेगळी आहे?
आधी मला एक विशेष आठवण सांगायची आहे. ज्यावेळी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा मी विचार केला, त्यावेळी एकदा तरी गजेंद्र अहिरे यांच्या दिग्दर्शनाखाली मला संधी मिळावी, अशी इच्छा होती आणि बर्याच वर्षांनी ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. मुळात इतक्या वर्षांचा दांडगा दिग्दर्शकीय अनुभव असणार्या व्यक्तीसोबत काम करताना अभिनेत्री म्हणून आपण घडतोच, पण त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आपण माणूस म्हणूनही नकळतपणे घडत जातो आणि या चित्रपटामुळे माझ्याबाबतीत तेच घडलं. चित्रपटात पात्र साकारताना त्या भूमिकेचा आत्मा शोधता आला पाहिजे आणि या चित्रपटाने मला तो अधिक तीव्रतेने शोधण्याची जिद्द माझ्यात निर्माण केली. शिवाय, या चित्रपटात केवळ आजी आणि नातीची गोष्ट नव्हती, तर दोन देशांची म्हणजे भारत आणि रशिया या देशांच्या मैत्रीचीदेखील अनोखी गोष्ट नातेसंबंधाच्या एका वेगळ्या प्रवासातून उलगडत जाते. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव घेता आला. शिवाय, कोकणातील एका छोट्याशा गावातील ही कथा असल्यामुळे माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे आजवर छाया कदम म्हणून जी कामं केली, त्यांपैकी यातील पात्र माझ्या मनात कायमस्वरुपासाठी माझ्याबरोबर राहणार आहे.
नवोदित आणि स्वतंत्र कलाकारांसाठी ‘इफ्फी’चं व्यासपीठ किती महत्त्वाचं आहे? याबद्दल तुम्हा दोघांची काय मतं आहेत?
‘इफ्फी’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ स्वतंत्र दिग्दर्शक, निर्माते यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘इफ्फी’मध्ये जे चित्रपट दाखवले जातात, त्यामुळे तुमची कलाकृती प्रकाशझोतात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमची ओळख निर्माण झाल्याचा शिक्का खरं तर ‘इफ्फी’ देतो. मुळात कथा, दिग्दर्शक, सादरीकरण, अभिनय, तंत्रज्ञांचा अचूक वापर यांचा दर्जा उत्तम असेल, तरच ‘इफ्फी’ या चित्रपट महोत्सवात कलाकारांच्या कलाकृती निवडल्या जातात. त्यामुळे एकदा का नवोदित किंवा स्वतंत्र कलाकाराचा चित्रपट ‘इफ्फी’मध्ये स्क्रिन झाला, की त्याच्या करिअरमध्ये त्याने एक मोठी पायरी चढल्याचा शिक्का लागतो आणि त्यानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग थोडा सुकर होतो. तसेच, ‘इफ्फी’मधील फिल्म बाजार हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, तिथे परदेशातील दिग्गज गुंतवणूकदार आल्यामुळे निर्माते मिळण्यास फार मदतदेखील होते, तर नवोदित अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचा अभिनय अवघ्या काही तासांमध्ये सातासमुद्रापार ‘इफ्फी’मुळे पोहोचतो आणि इतर भाषिक चित्रपटसृष्टीतही नवे चित्रपट किंवा प्रोजेक्ट मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होतो.
चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे भवितव्य नेमके काय असते? आणि त्यांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काय करणं गरजेचं आहे?
कोणताही चित्रपट ज्यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत पोहोचतो किंवा त्याचं स्क्रिनिंग केलं जातं, तेव्हा त्या चित्रपटाला, दिग्दर्शकाला, निर्मात्यांना जागतिक स्तरावर आणि चित्रपटसृष्टीत ओळख मिळते. पण, त्यानंतर चित्रपटगृहात तो चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांपर्यंत तो चित्रपट पोहोचवणं हा महत्त्वाचा भाग आहे. मुळात मराठी चित्रपटसृष्टीत फारसे निर्माते नाहीत. गुंतवणूकदार आणि निर्माते यांच्यात असलेली तफावत आधी सर्वच कलाकारांनी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे चित्रपट महोत्सवानंतर त्या ठराविक चित्रपटाचा नवा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, तो अधिक गांभीर्याने पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. चित्रपट ज्या ठराविक प्रेक्षकवर्गासाठी तयार केला आहे. त्यांच्यापर्यंत प्रमोशनच्या विविध माध्यमांतून तो पोहोचवला पाहिजे. प्रेक्षकांचे अभिप्राय घेतले पाहिजे, तरच तुमची कलाकृती तग धरू शकते.
छायाताई, दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्याचा तुमचा काही विचार आहे का?
माझ्या मते, अभिनय, लिखाण, दिग्दर्शन, निर्मिती हे प्रत्येक विभाग जबाबदारीने सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुळात दोन ते तीन गोष्टी एकाचवेळी करून गोंधळ करण्यापेक्षा एकाच कामात नीट लक्ष देऊन काम करण्यावर माझा वैयक्तिकरित्या भर असतो. पण, चित्रपटाचं किंवा नाटकाचं दिग्दर्शन करणं ही फार मोठी जबाबदारी आहे, असं मला वाटतं. त्यामुळे इतक्यात तरी मी दिग्दर्शन किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात जाण्याचा विचार केलेला नाही. मला माझ्या अभिनयात अधिक सखोल अभ्यास करून प्रेक्षकांपर्यंत नव्या भूमिका सादर करण्याची इच्छा आहे.