दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेत बीएसएनएल सरस; केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले कारण!

    27-Nov-2024
Total Views |
telecom-debt-bsnls-debt-very-low


नवी दिल्ली :
      देशातील बड्या दूरसंचार कंपन्यांवर मोठी कर्जे असल्याचे समोर आले आहे. ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज देशभरातील बड्या दूरसंचार कंपन्यांवर असल्याचे केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सांगितले. यात सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल(भारत संचार निगम लिमिटेड)वर सर्वात कमी कर्ज असल्याचे दिसून आले आहे. बीएसएनएलचे कर्ज २३,२९७ कोटी रुपये इतके आहे.


दरम्यान, बीएसएनएलला मिळालेले सरकारी समर्थन व पुनरुज्जीवन पॅकेजच्या मदतीने कर्ज कमी करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री पेम्मासानी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशातील चार मोठ्या दूरसंचार कंपन्यांवर २०२४ या आर्थिक वर्षात एकूण ४,०९,९०५ कोटी रुपयांचे कर्ज होते. यामध्ये सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचे सर्वात कमी कर्ज दिसून आले आहे.

पेम्मासानी पुढे म्हणाले, सरकारने बीएसएनएलला ४ जी आणि ५ जी सेवांसाठी ८९,००० कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम वाटप केले. तसेच, केंद्र सरकारच्या मदतीने बीएसएनएलने २०२०-२१ पासून ऑपरेटिंग नफा मिळवण्यास सुरुवात केली आहे, असेही पेम्मासानी यांनी यावेळी लोकसभेत सांगितले. देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या असलेल्या व्होडाफोन आयडिया(२.०७ लाख कोटी रुपये), भारती एअरटेल(१.२५ लाख कोटी रुपये), जिओ इन्फोकॉम(५२,७४० कोटी रुपये) कर्जे असल्याची माहिती समोर आली आहे.