बाळासाहेब म्हणाले होते, उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल... : कालिदास कोळंबकर

    27-Nov-2024
Total Views |
Kalidas Kolambkar

मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे सगळे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. अनेक जिल्ह्यांतून उबाठा गट हद्दपार झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना याबाबत आधीच ताकीद दिली होती. बाळासाहेब म्हणाले होते, “उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल...” बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, असा गौप्यस्फोट महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आ. कालिदास कोळंबकर ( Kalidas Kolambkar ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला. “माझ्या चौथ्या टर्मला उमेदवारी देण्यात उद्धव ठाकरेंनी आडकाठी आणली होती,” असेही त्यांनी सांगितले. सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून विश्वविक्रम केल्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद...

सलग नऊवेळा विधानसभा निवडणूक जिंकून तुम्ही विश्वविक्रम केला आहे. बाळासाहेबांच्या मुशीत तुम्ही घडलात, पुढे नारायण राणेंसोबत गेलात आणि आता देवेंद्र फडणवीसांसोबत भाजपमध्ये कार्यरत आहात. अशावेळी आज मागे वळून पाहताना काय भावना आहेत?

यंदा विश्वविक्रम व्हावा, ही माझी इच्छा होती. वडाळा-नायगावमधील माझ्या मतदारांनी ती पूर्ण केली. आजपर्यंतच्या प्रवासात, माझ्या सुख-दुःखात इथल्या जनतेने दिलेली साथ मी कधीच विसरू शकत नाही. राज्यातील सर्व २८८ आमदारांमध्ये आज मी सगळ्यात वरिष्ठ आमदार आहे. केवळ राज्यात नव्हे, तर देशात सलग नऊवेळा आमदार म्हणून कुणी निवडून आलेला नाही. माझ्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्द नाही. कोणतीही कामे मी हातात घेतली की, ती पूर्ण होतातच. मला राजकीय जन्म बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. त्यामुळे त्यांचे दर्शन घेऊनच कोणत्याही निवडणुकीला सामोरा जातो. ही प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. कारण हे दिवस बाळासाहेबांनी दाखवले. आज मी भाजपमध्ये कार्यरत आहे, तो देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांनी माझी सगळी राजकीय स्वप्ने पूर्ण केली. त्यामुळे राजकीय आयुष्यात फार समाधानी आहे.

वडाळा विधानसभेत सुमारे ३५ हजार मुस्लीम मतदार आहेत. त्यांना आपल्याकडे वळवून कालिदास कोळंबकर यांचा पराभव करावा, अशी रणनीती विरोधकांनी आखली होती. पण, ते त्यात सपशेल अपयशी ठरले. तुम्ही अशी काय जादू केली, की विरोधक गारद झाले?

ही माझी नववी टर्म आहे. असे प्रसंग प्रत्येक निवडणुकीत आले. काही वेळा यापेक्षा भयंकर प्रसंगांना मी तोंड दिले आहे. मी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता, सर्वसामान्यांच्या कल्याणाकरिता अहोरात्र मेहनत केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागून बीडीडी, पोलीस हाऊसिंगसारखे अनेक अशक्यप्राय प्रकल्प मार्गी लावले. गिरणी कामगारांना घरांचे क्षेत्रफळ वाढवून देण्यात मी यशस्वी ठरलो. या मतदारसंघात अतिभव्य जलतरण तलाव उभारू शकलो. त्यामुळे इथले मतदार माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि विक्रमी मताधिक्याने मला निवडून दिले.

उद्धव ठाकरेंचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. एक जुना शिवसैनिक म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटते?

माझ्या चौथ्या टर्मला उमेदवारी देण्यात उद्धव ठाकरेंनी आडकाठी आणली. कोळंबकरांचे डिपॉझिट जाणार, असे कोणीतरी त्यांच्या कानात सांगितले होते. मुंबईतील सगळ्या जागा जाहीर झाल्या, पण माझी आणि सुरेश गंभीर यांची उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यावेळेस रत्नागिरीत भास्कर जाधव यांनी पक्षाविरोधात आव्हान उभे केले होते. त्यामुळे मुंबईत गडबड होऊ नये, यासाठी आमची दोघांची उमेदवारी जाहीर झाली आणि दोघेही निवडून आलो. बाळासाहेब सुरुवातीपासून आमच्या बाजूने होते. कोळंबकर आणि गंभीर हे दोघेही तळागाळातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर अन्याय होता नये, अशी त्यांची भूमिका होती. निवडून आल्यानंतर बाळासाहेबांना भेटायला गेलो. त्यावेळी उद्धव ठाकरेंना बोलावून घेत बाळासाहेबांनी ताकीद दिली, “उद्धव, हे ग्रासरुटचे कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्यांना भविष्यात सांभाळू शकला नाहीस, तर संघटना कुठे जाईल, हे मी सांगू शकत नाही.” त्यावेळी साहेबांनी सांगितलेले आज खरे ठरले आहे.

यंदा विश्वविक्रम झाल्यामुळे कालिदास कोळंबकर यांना मंत्रिपद मिळावे, अशी वडाळ्यातील जनतेची इच्छा आहे. ती पूर्ण होईल, असे वाटते का?

याबाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. भाजपमध्ये अशा प्रकारे जाहीर मागण्या करून काही साध्य होत नसते. आमच्या पक्षाची एक शिस्त आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाहीर बोलून मी माझे नेते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणणार नाही.

वडाळ्यातील जनतेने तुम्हाला नवव्यांदा कौल दिला आहे. अशा वेळी पुढच्या पाच वर्षांकरिता या मतदारसंघासाठी तुमचे ‘व्हिजन’ काय असणार आहे? मुंबईला पुढच्या पाच वर्षांत तुम्ही कोणत्या उंचीवर पाहता?

मुंबईतील ‘बेस्ट’ आणि तिच्या मोक्याच्या जागा काही उद्योगपतींच्या घशात घालण्याचा काहींचा डाव आहे. मी ते अजिबात होऊ देणार नाही. ‘बेस्ट’ वसाहतींकडे ७५ एकर जमीन आहे. तेथे ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना शासकीय दरात घरे द्यावीत. उर्वरित भूखंडातून येणारे पैसे ठेवींच्या स्वरुपात जतन करून, त्यातून ‘बेस्ट’ला आर्थिक हातभार लावला. दुसरे म्हणजे, माझ्या मतदारसंघातील वाहतुककोंडीवर मात करण्यासाठी पार्किंगच्या सुविधा वाढवण्यावर मी भर देत आहे.